सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ रुक जाना नही… ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

(लेखक भावे भाटिया यांच्या पुस्तकावरून)

“आई, मी उद्यापासून शाळेत जाणार नाही. सगळेजण मला ‘आंधळा, आंधळा’ असं चिडवतात”.

आईने कुशीत घेऊन भावेशला समजाविले की,’तू जग पाहू शकतोस की नाही याने काहीही फरक पडत नाही. मात्र तू असे काम करून दाखव की सारे जग तुझ्याकडे पाहू लागेल’

आईचा उपदेश हृदयावर कोरून छोट्याशा भावेशने जीवनात निश्चयपूर्वक वाटचाल चालू केली.

भावेश भाटिया यांना’रेटिना मस्क्युलर डिजनरेशन’या आजारामुळे  बालपणीच दृष्टी गमवावी लागली.  जिद्द, निश्चय व मेहनतीच्या बळावर त्यांनी स्वतः बनविलेल्या विविध आकाराच्या, आकर्षक, सुगंधी, रंगीत मेणबत्यांची विक्री महाबळेश्वर इथे एका हातगाडीवर सुरू केली . आज त्यांची ‘सनराइज कॅन्डल्स’ही कंपनी देश-विदेशात कोट्यावधी रुपयांची उलाढाल करीत आहे.

सुरवातीला भावेश यांचे वडील गोंदिया इथल्या सिमेंट वर्क्समध्ये अकाउंटंट म्हणून काम करीत होते.  गोंदिया येथील गुजराती नॅशनल हायस्कूलमध्ये भावेश यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. आई वडिलांनी त्यांना सर्वसामान्य मुलाप्रमाणे वागविले. शाळेत फळ्यावरील काही दिसत नसल्याने आई त्यांना सर्व अभ्यास तसेच त्यांची आवडती कॉमिक्सची पुस्तके वाचून दाखवीत असे. कपडे धुणे, भांडी घासणे, स्वयंपाक करणे अशी दैनंदिन कामे शिकवून  आईने त्यांना स्वयंपूर्ण केले. वडील त्यांना सिनेमाला नेत. सायकलवरून सर्व ठिकाणी फिरवून तिथली माहिती सांगत. वडिलांना शास्त्रीय संगीताची व गझल ऐकण्याची आवड होती.  गझलमधील अनेक शब्द त्यांच्या विशेष भावार्थासह ते भावेशला समजावून सांगत. तीच आवड भावेश यांच्यामध्येही उतरली.  भावेश यांनी घरातच त्यांनी जमविलेल्या कॉमिक्सची लायब्ररी सुरू केली. त्यामुळे अनेक मुलांबरोबर त्यांची छान मैत्री झाली. सिमेंट फॅक्टरीमधल्या वाळूमध्ये खेळणे, ओल्या वाळूतून वेगवेगळे प्राणी बनविणे,  लाकडाच्या वखारीतून बांबू आणून ते तासून त्याच्या वस्तू बनविणे , झाडांवर चढणे ,शेतात भटकणे, निरनिराळ्या पक्ष्यांची किलबिल ऐकणे यात त्यांचं बालपण गेलं. फॅक्टरीमध्ये सिमेंटचे पाईप बनविताना त्याचे डाय  कसे वापरले जातात हेही त्यांनी समजावून घेतलं.

भावेश यांचे मोठे भाऊ जतीन यांना कुत्रा चावल्यामुळे मृत्यू आला. त्यामुळे खचलेल्या आईला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी नातेवाईकांनी  शिवणक्लासमध्ये घातलं. भावेश आईबरोबर तिथे जात. तिथे कला कौशल्याच्या वस्तूही बनवायला शिकवत. छोट्या भावेशने स्पर्शाच्या सहाय्याने अनेक आकार शिकून घेतले व कापडाची खूप खेळणी बनविली.

कॉलेजमध्ये असताना त्यांनी दोन मित्रांबरोबर सायकलवरून गोंदिया ते काठमांडू असा दोन हजार किलोमीटर्सचा   प्रवास केला. त्यावेळी त्यांना आलेले अनुभव , मनुष्य स्वभावाचे अनेक नमुने, वाटेतील अडचणी या साऱ्यांना तोंड देऊन त्यांनी धाडसाने  तो प्रवास कसा पूर्ण केला हे सर्व मुळातून वाचण्यासारखे आहे.

काही काळाने वडील  महाबळेश्वरला कच्छी समाजाच्या आरोग्य भवन इथे  व्यवस्थापक म्हणून काम करू लागले. तिथल्या आवारात त्यांना एक लहानशी खोली राहायला मिळाली.

आईच्या कॅन्सरच्या आजारात भावेश यांनी शर्थीने पैशांची जमवाजमव  करून मुंबईला टाटा हॉस्पिटलमध्ये अनेक खेपा घातल्या. आईच्या मृत्यूनंतर त्यांना खऱ्या अर्थाने दृष्टिहीन झाल्यासारखे वाटले.

मुंबईला वरळी येथील नॅब(National association for blind) इथे त्यांना ब्रेल लिपी आणि इतर जीवनावश्यक गोष्टींचे शिक्षण मिळाले. तिथेच त्यांनी मेणबत्ती बनवण्याचे शिक्षणही घेतले.

अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी महाबळेश्वर येथे भाड्याने हातगाडी घेऊन सुंदर, सुगंधी, विविध आकारातील मेणबत्यांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला त्यावेळी भावेश अर्थशास्त्र घेऊन एम. ए. झाले होते.

सुट्टीसाठी म्हणून महाबळेश्वरला आलेल्या नीता, उत्स्फूर्तपणे भावेश यांना त्यांच्या मेणबत्ती विक्रीच्या कामात मदत करू लागल्या. मदतीचा हात देताना त्या , रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या भावेश यांच्या प्रेमात पडल्या.  सुशिक्षित, धनाढ्य कुटुंबातील एकुलती एक मुलगी असलेल्या, बी.कॉम झालेल्या नीताच्या या ‘आंधळ्या प्रेमाला’ सहाजिकच घरच्यांचा विरोध होता. जेव्हा नीता यांनी भावेश यांच्यापुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा ते अंतर्बाह्य थरारून गेले. पण भावेश यांना फक्त सहानुभूती नको होती . नीता तिच्या या विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयावर  ठाम होती.   घरच्यांचा विरोध असूनही फक्त आईच्या पाठिंब्यावर अगदी साधेपणाने हे लग्न झाले.  भावेश यांची एकच अट होती की, नीताने माहेरचा एकही पैसा त्यांच्या घरात आणायचा नाही. 

नीता यांनी भावेशना सर्वार्थाने डोळस साथ दिली. खरं म्हणजे नीताच्या रत्नपारखी नजरेने भावेश यांच्यामध्ये लपलेला लखलखणारा हिरा पाहिला आणि त्याला पैलू पाडून जगासमोर आणला.  उत्तम पद्धतीने संसाराची घडी बसवली. अनेक मानसन्मानासहित नीताने स्वतःसह भावेश यांना खूप उंचीवर नेऊन ठेवले. ‘अंध व्यक्तीशी लग्न करण्याचा वेडेपणा करून तू आत्महत्या करीत आहेस’ या माहेरच्या मताला नीताने स्वकर्तृत्वाने  उत्तर दिले. लग्नानंतर दोन वर्षांनी कुणाल या त्यांच्या अव्यंग, सुदृढ अपत्याच्या जन्म झाला .सासर माहेर एक झाले.

महाभारत काळात  गांधारी आयुष्यभर डोळ्यांवर पट्टी  बांधून वावरली हा फार मोठा त्याग समजला जातो. भावेश यांच्या मताप्रमाणे गांधारीने डोळ्यांवर पट्टी न बांधता, महाराज धृतराष्ट्रांचे डोळे बनून राहणं अधिक आवश्यक होतं. गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधली नसती तर कदाचित महाभारताचे युद्धही झाले नसते. नीताने गांधारीपेक्षाही अनेक पटीने त्याग केला आहे. ती केवळ भावेश यांचे डोळे झाली नाही तर तिच्या तेजस्वी  डोळ्यांनी तिने भावेश यांना सुंदर जगाचा परिचय करून दिला. उभयतांनी अनेक प्रदर्शनांमध्ये भाग घेऊन भावेश यांची कला जगासमोर आणली.

भावेश आणि नीता यांचा उद्देश केवळ स्वतःची प्रगती साधण्याचा नव्हता.  इतर दृष्टिबाधित मित्रांना रोजगार मिळून ते स्वयंपूर्ण व्हावेत यासाठी दोघांनीही अथक प्रयत्न केले. महाबळेश्वर येथे राहत्या घराजवळ एक छोटी जागा भाड्याने घेऊन त्यात अंध मुला-मुलींच्या राहण्याची  सोय केली. त्यांना मेणबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले आणि स्वतःच्या पायावर उभे केले. मेणबत्ती व्यवसाय शिकण्यासाठी वाढत्या संख्येने येणाऱ्या  दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी त्यांनी महाबळेश्वर- सातारा रोडवर मोळेश्वर येथे एक जागा विकत घेतली आणि दीडशे मुला- मुलींचे वसतीगृह उभारले. जागा मिळविणे आणि वसतीगृह बांधणे यासाठी अनंत अडचणी उभ्या राहिल्या. त्यावेळी अनेक सुहृदांनी  अनंत हस्ते  त्यांच्या या सत्कार्याला मदत केली. प्रतीथयश व्यक्तींचे पूर्णाकृती पुतळे बनवून त्यांनी एक वॅक्स म्युझियमही उभारले आहे.  अनेक लोक त्याला आवर्जून भेट देतात.

कॉम्प्युटर इंजिनियर झालेला कुणाल याचे या कामात खूप मोठे योगदान आहे. भारतातील अनेक प्रांतातील  दृष्टिहीन मुला-मुलींना त्यांच्या घरीच मेणबत्त्या बनविणे, कागदी पिशव्या बनविणे व इतर  उद्योग शिकण्यासाठी कुणालने अनेक ॲप्स विकसित केली आहेत. त्याचा भारतभरच्या अंध विद्यार्थ्यांना फायदा होतो. तसेच कुणाल परदेशी निर्यातीचे सर्व काम सांभाळतो.

भावेश यांनी त्यांची मैदानी खेळाची आवड जपली आणि नीताच्या सक्रिय सहाय्यामुळे वाढविली. गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, पॉवर लिफ्टिंग, फुटबॉल, कबड्डी, अशा स्पर्धांमध्ये राष्ट्रीय पॅरालिंपिक व इंडियन ब्लाइंड स्पोर्ट्स असोसिएशनची एकूण ११४ पदके त्यांनी जिंकली आहेत. त्यामध्ये ४० सुवर्ण पदके आहेत. ते अनेक वेळा प्रतापगड, सिंहगड चढून गेले आहेत. इतकेच नाही तर कळसुबाई शिखरावरही तीन वेळा गेले आहेत. डॉक्टर भावेश यांचे असे म्हणणे आहे की, खिलाडू  वृत्ती आपल्याला परिपूर्ण बनवते, अंतर्बाह्य माणूस बनविते.  शरीर सुदृढ असेल तर मेंदू आणि मन हे सुद्धा सुदृढ राहतात. यशस्वी उद्योजक आणि दृष्टिहीनांसाठी कार्यरत असलेल्या भावेश यांना तीन वेळा राष्ट्रपती पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले आहे. कर्नाटक सरकारने चन्नमा विद्यापीठातर्फे भावेश यांना डॉक्टरेट ही पदवी दिली.

गुजराती समाजाच्या रक्तातच उद्योगधंद्याचं बाळकडू असतं. व्यापारासाठी जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची त्यांची तयारी असते. नीता यांचे बालपण पूर्व आफ्रिकेतील सोमालिया इथे गेले कारण वडील व्यापारासाठी तिथे गेले होते.

भावेश यांचे   पहिले मेणबत्ती प्रदर्शन टिळक स्मारक मंदिर पुणे इथे यशस्वीपणे पार पडले . त्यासाठी महाबळेश्वर येथील ‘आनंदवन’ या सुप्रसिद्ध हॉटेलचे मालक वैद्य कुटुंबीय यांनी खूप मदत केली ,मेहनत घेतली. अनेक गुजराती व्यवसायिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि त्यानंतर या धडपडणाऱ्या व्यवसाय बंधूला गुजराती समाजातून फार मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. त्यांच्या उद्योगधंद्याची भरभराट होण्यासाठी, दृष्टिहीनांसाठी वसतीगृह उभारण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्यात आली .’एकमेका सहाय्य करू’ हा गुजराती लोकांचा  विशेष गुण अनुकरणीय  आहे.

आज डॉ .भावेश यांना त्यांचे अनुभव आणि विचार ऐकविण्यासाठी सन्मानाने झारखंड येथील ‘टाटा स्टील’ पासून इतर सर्व मोठ्या उद्योगधंद्यामध्ये आवर्जून बोलावलं जातं. हा सर्व प्रवास महाबळेश्वरपासून ते एकट्याने करतात. त्यांचे अनुभव सांगताना भावेश सांगतात की अंध, अपंग व्यक्तींबद्दल नुसती सहानुभूती,दया दाखवून त्यांना मदत करू नका.  त्याऐवजी अंध अपंगांना सक्षम करण्यासाठी स्वतःच्या पायावर ते उभे राहतील अशा उद्योग धंद्यात मदत केलेली जास्त चांगली. अंध व्यक्तींची इतर  ज्ञानेन्द्रिये अधिक प्रगल्भ असतात. अशा व्यक्ती अधिक संवेदनशील असतात. या त्यांच्या गुणांचा फायदा घेऊन त्यांचा आत्मविश्वास जागृत करावा व योग्य ती मदत जरूर करावी. ‘सर्व शिक्षा अभियानां’तर्गत आता पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणे अंधांनाही सहज शक्य आहे. ते स्वानुभावावरून सांगतात की अंध, अपंग विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या शाळा नकोत तर त्यांना इतर  सर्वसामान्य मुलांबरोबर नेहमीच्या शाळेत शिक्षण मिळाले पाहिजे .

एखाद्या वाढदिवसानिमित्त किंवा काही कारणासाठी आपण अशा अंध, अपंग संस्थांमध्ये भोजन देणे, भेटवस्तू देणे असे करतो. भावेश यांना ते अजिबात पसंत नाही. कारण त्यामुळे या अंध, अपंगांना तुम्ही दुबळे करता, त्यांना घेण्याची सवय लावता असं ते अनुभवाने सांगतात.त्यांचं स्पष्ट मत असं आहे की अंध अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्थांपैकी फारच थोड्या संस्था तळमळीने काम करतात. इतर अनेक संस्थांमधील परिस्थिती भीषण असते. अंधांकडून काम करून घेतले जाते पण त्यांना पुरेसा आहार, पैसे दिले जात नाहीत. उलट संस्थाचालकंच ‘मोठे’ होत जातात. अंध निधीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा निधी गोळा केला जातो. प्रत्यक्षात त्यातील फार थोडा पैसा अंधांसाठी खर्च होतो. समाजाने जागृत होऊन योग्य ठिकाणी मदत केली पाहिजे. दृष्टीहीनांनी अभ्यासाबरोबर कौशल्य विकासाकडे लक्ष दिले पाहिजे असे ते सांगतात.

डॉक्टर भावेश यांच्या संस्थेतर्फे दृष्टीहीनांवर आधुनिक उपचार करून थोडे यश मिळत असेल तर तसा प्रयत्न केला जातो. लहान मोठी ऑपरेशन करण्यासाठी मदत केली जाते. समाजाने  नेत्रदान चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला  तर त्याचा अनेक दृष्टीहीनांना लाभ होईल असं डॉक्टर भावेश यांना वाटतं.

नीता या स्वतः दुर्गम भागात जाऊन दृष्टीबाधित भगिनींना भेटतात. घरातील सदस्यांना विश्वासात घेऊन, नीता त्या अंध भगिनींना प्लास्टिक हार, तोरणे, कागदी पिशव्या, डिटर्जंट बनविणे  अशी अनेक कामे शिकवतात.

डॉक्टर भावेशजींसारखं व्यक्तिमत्व ज्यांचं संपूर्ण आयुष्य ऊर्जा व सकारात्मकतेने परिपूर्ण आहे ते आणि आपण इतर डोळस यांच्यात खऱ्या अर्थाने दृष्टिबाधित कोण आहे असा प्रश्न  हे पुस्तक वाचताना नक्की पडतो .

डॉक्टर भावेश यांचे आयुष्य घडविणाऱ्या महत्त्वाच्या  दोन व्यक्तींमधील एक अर्थातच त्यांची आई! आईने त्यांच्या मनातील न्यूनगंड काढून टाकून त्यांना आत्मविश्वासाने उभे केले आणि दुसरी व्यक्ती म्हणजे पत्नी नीता! नीता यांच्या ‘डोळस प्रेमाची’ एक छोटी गोष्ट सांगून थांबते.

एका आंतरराष्ट्रीय शर्यतीत भाग घेण्यासाठी भावेश यांना दररोज पंधरा-सोळा किलोमीटर धावण्याची प्रॅक्टिस करणे जरुरी होते. नीता यांनी काय करावे? आपल्या चार चाकी गाडीला कॅरियर बसून घेतले. त्याला पंधरा फुटांची एक लांब दोरी घट्ट बांधली. दोरीचे दुसरे टोक भावेश यांच्या हातात दिले आणि दररोज त्यांना पोलो ग्राउंडवर नेऊन धावण्याची प्रॅक्टिस करता येईल अशा पद्धतीने गाडी चालवून त्यांचा सराव करून घेतला. महाबळेश्वरला आलेले पर्यटक आणि पोलो ग्राउंडवर आलेले खेळाडू यांनी हे दृश्य डोळे भरून पाहिले.

 गृहिणी सचिव सखी प्रिया… असलेल्या नीता यांना आदराने नमस्कार

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments