श्री संदीप काळे
इंद्रधनुष्य
☆ न केलेल्या पापाचे धनी? – भाग – 2 ☆ श्री संदीप काळे ☆
(आई, वडील, बहीण या सगळ्यांना मी मुकलो होतो. आता असे वाटते, ही शिक्षा संपूच नाही. आपण इथेच संपून जावे. एवढे सारे कमावले होते, ते एका क्षणात संपवले.’’) – इथून पुढे.
आपल्या कुटुंबाच्या आठवणी सांगत लक्ष्मण यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बाजूला बसलेली त्यांची दोन्ही मुले ही वाघासारख्या बापाला रडताना पाहून भावुक झाले होते. स्वतःला सावरत लक्ष्मण म्हणाले, ‘‘आम्हाला शिक्षा झाली, आम्ही जेलमध्ये आलो. तेव्हा आम्ही बदला घेण्याची भाषा करत होतो. जसजसे दिवस जायला लागले, तसतसे कळायला लागले की कुणाचा बदला घ्यायचा, कशासाठी, ही आपलीच माणसे. आपण लहान होऊ, मोठ्या मनाने पुढे जाऊ.
हे सारे बळ इथल्या वातावरणाने दिले. आम्ही इथे नामस्मरणाला लागलो. ध्यान करतो, योगा करतो, ग्रंथ वाचतो, यातूनच माणसाकडे पाहण्याची नजर मिळाली.’’ गळ्यात रुद्राक्षाची माळ, कपाळावर अष्टगंध, अबीर-बुक्का, डोक्यावर टोपी आणि सतत चांगले बोलणे अशी लक्ष्मण यांची भावमुद्रा होती. बाप तशी मुलेही.
आमच्या बाजूला असलेले संतोष शेळके, अजय गव्हाणे, प्रमोद कांबळे हे तिघेजण विनयभंगाच्या प्रकरणामध्ये जेलमध्ये होते. काय तर त्यांनी एका महिलेकडे पाहिले म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली.
सोबत जे दोन पोलिस होते त्यामधले एकजण सांगत होते, विनयभंग आणि पोक्सो या दोन प्रकरणांमध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे.
आम्ही जेलमध्ये फेरफटका मारत कैद्यांशी बोलत होतो. एक जण ज्ञानेश्वरी वाचत बसले होते. आम्ही जाताच त्यांनी त्यांचे वाचन थांबवले. मला दोन्ही हात जोडत नमस्कार केला आणि म्हणाले, ‘‘बोला माऊली, काय म्हणताय.’’ आम्ही बसलो आणि एकमेकांशी बोलत होतो.
माझ्यासोबतचे पोलिस सहकारी जांभया देत होते. ते ज्ञानेश्वरी वाचणारे म्हणाले, ‘‘काय माऊली, भूक लागली की काय?’’
ते पोलिस म्हणाले, ‘‘होय, आता जेवणाची वेळ झाली आहे ना?’’
जे ज्ञानेश्वरी वाचत होते. त्यांचे नाव सचिन सावंत. सचिन बीडचे, त्यांनी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी, तिन्ही मुलींना, पत्नीला खल्लास केले. स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात ते वाचले. मुलीच्या रूपाने असलेला वंशाचा दिवा तर विझलाच होता, पण आता सचिन यांना म्हातारपणात कोणी पाणी पाजायलाही शिल्लक उरले नव्हते. बीडमधले ते सोन्यासारखे वातावरण ते जेलपर्यंतचा सचिनचा सगळा प्रवास ऐकून माझ्या अंगावर काटे येत होते.
बोलता बोलता सचिन म्हणाले, ‘‘मी तुकाराम महाराज तेव्हाच वाचले असते, तर असा राग केला नसता.’’ सचिन आपल्या तिन्ही मुलींनी लावलेली माया, त्यांची आठवण करून हुंदके देत रडत होते.
अहंकाराला घेऊन तुकाराम महाराज काय सांगून गेले हे सचिन आम्हाला अभंगांच्या माध्यमातून सांगत होते. आता रडायचे कुणासाठी, कुणाला माया लावायची. जेलमधून बाहेर जायचे तर कुणासाठी जायचे हा प्रश्न सचिन यांच्यासमोर होता.
कोणालाही भेटा, कोणाशीही बोला, प्रत्येकाची एक वेगळी कहाणी होती. त्या कहाणीला दोन कंगोरे होते. एक म्हणजे, मला विनाकारण आतमध्ये टाकले. माझा दोष नसताना, माझे नाव केसमध्ये घेतले. दुसरे, होय मी गुन्हा केला, पण त्यावेळी तो गुन्हा रागातून आणि द्वेषातून झाला, आता मी सुधारलोय, असे सांगणारे अनेक कैदी होते.
आम्ही बोलत होतो, तितक्यात ‘नमस्कार साहेब, नमस्कार साहेब’ असा आवाज आला. मी मागे वळून पाहतो तर काय, जाधव आमच्या दिशेने येत होते. अनेक जेलमध्ये जाधव यांनी अधिकारी म्हणून आपल्या सामाजिक कामाची छाप पाडलीय.
आम्ही जाधव यांच्या कार्यालयाकडे निघालो. जाताना मी जाधव यांना म्हणालो, ‘‘किती गंभीर आहे हे सर्व.’’
जाधव म्हणाले, ‘‘तुम्हाला सर्वांनी तसे फार वरवरचे सांगितले असेल, पण परिस्थिती त्याहूनही वाईट आहे. रागाच्या भरात आणि द्वेषातून ही माणसे इथे आलेली आहेत. आपल्या राज्यामध्ये ५४ पेक्षा अधिक कारागृह आहेत. या कारागृहामध्ये ३२ हजारांहून अधिक कैदी आहेत. त्या प्रत्येकाची कहाणी अशीच आहे, इतकीच बिकट आहे.’’
आम्हाला सोडायला आलेले सचिन आकाशाकडे पाहत हात जोडून म्हणाले, ‘‘ही माणसे एक निमित्त आहेत. करणारा करता धरता तो वर बसला आहे.’’
कुणी आईला घेऊन भावनिक होते, तर कुणी बहिणी, मुलांना घेऊन. अनेकांनी आपल्या झालेल्या बाळाचे तोंडही पाहिले नव्हते. जाधव यांच्यासाठी हे नवीन नव्हते. माझ्यासाठी नक्कीच हे नवीन होते.
मी जाधव यांच्यासमवेत अगदी जड पावलांनी त्यांच्या कार्यालयाकडे निघालो. मी जाधव यांना म्हणालो, ‘‘भाई, हे सर्व थांबणार कधी?’’
जाधव म्हणाले, ‘‘जोपर्यंत चंद्र, तारे, सूर्य आहे तोपर्यंत हे असेच राहणार आहे. फक्त यामध्ये प्रमाण कमी होऊ शकते. जर संस्कार चांगले असतील तर.”
मी जाधव यांना म्हणालो, “ज्यांचा दोष नाहीये, ते या जेलमध्ये आहेत, अनेक जणांनी पैसे भरले नाहीत, कागदपत्रे पूर्ण नाहीत म्हणून जेलमध्ये आहेत, त्यांना कोणी वाली नाही का?”
जाधव अगदी शांतपणे म्हणाले, ‘‘शासन, सामाजिक संस्था या लोकांना पाहिजे तशी मदत करतात, पण सगळ्यांपर्यंत ही मदत जाऊ शकत नाही. त्याला बराच अवधी लागेल.’’
मीही त्यांना प्रतिसादाची मान हलवली. मी तिथून निघालो, जेलमधल्या त्या सगळ्या घडलेल्या कहाण्या, त्या सर्व कैद्यांचे सुकलेले डोळे पाहून मीही अगदी उदास झालो होतो. काय बोलावे, कोणासमोर बोलावे आणि कशासाठी बोलावे हे प्रश्न माझे मलाच पडले होते.
छोट्या छोट्या वादामध्ये माणसांच्या आयुष्याचा सत्यानाश कसा होतो याची अनेक उदाहरणे मी अनुभवून आलो होतो. जेव्हा एखाद्याच्या हातून चूक घडते, तेव्हा आपले कोणीही नसते. जेव्हा कुणाला मदतीची गरज लागते तेव्हा त्याला कोणीही मदत करत नाही. चूक झाल्यावर मोठ्या मनाने माफ करायलाही कोणी पुढे पुढाकार घेत नाही. अशा परिस्थितीत जगणारी माणसे जिवंत आहेत का मेलेली हेच कळत नाही. मागच्या जन्मीचे पाप, नशिबाचे भोग, आई-वडिलांनी केलेले पाप, अशा कितीतरी वेगवेगळ्या शब्दांनी या कैद्यांनी आपल्या मनाचे समाधान करून घेतले. काय माहित या कैद्यांच्या अंधाऱ्या आयुष्यामध्ये कधी प्रकाशाचे किरण दिसणार आहे की नाही?
– समाप्त –
© श्री संदीप काळे
९८९००९८८६८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈