श्री विश्वास विष्णु देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

१६ ऑगस्ट….  भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी …. त्यानिमित्ताने …….. 

अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणातलं एक निर्मळ आणि शुद्ध व्यक्तिमत्व. धर्म, जातपात, भाषा आदींच्या पलीकडे खऱ्या अर्थाने जाऊन अटलजींनी काम केले. राजकारणात ४५ वर्षे घालवून सुद्धा त्यांचे विरोधक देखील एकही आरोप त्यांच्यावर करू शकले नाहीत….. 

मेणाहूनि मऊ आम्ही विष्णुदास, 

कठीण वज्रास भेदू ऐसे. 

भले तरी देऊ कासेची लंगोटी, 

नाठाळाचे माथी हाणू काठी. 

… या तुकाराम महाराजांच्या उक्ती अटलजींच्या व्यक्तिमत्वाचं सार्थ वर्णन करतात. त्यांच्या या स्वभावाचे आणि निष्कलंक चारित्र्याचे मूळ त्यांच्यावर बालपणी झालेल्या सुसंस्कारात आहे. ग्वाल्हेर येथे त्यांचे शिक्षण झाले असले तरी उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बटेश्वर हे त्यांचे मूळ गाव. याच ठिकाणी त्यांचे आजोबा आणि पणजोबा राहत होते. त्यांचे आजोबा आणि पणजोबा हे अत्यंत विद्वान आणि धार्मिक होते. त्याच संस्कारात अटलजींचे वडील कृष्णबिहारी वाढले.अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला. कवी, लेखक, पत्रकार, राजकीय नेते असंअष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या अटलजींचा एका छोट्या राजकीय कार्यकर्त्यापासून ते पंतप्रधानपदापर्यंतचा झालेला प्रवास  थक्क करणारा आहे. कृष्णबिहारी संस्कृत,हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांचे उत्तम जाणकार तर होतेच, पण ते प्रख्यात कवीही होते. त्यांचेच काव्यगुण जणू वारशाच्या रूपाने अटलजींमध्ये उतरले. कृष्णबिहारी हे व्यवसायाने शिक्षक होते. त्यांच्या करड्या नजरेखाली अटलजींचे बालपण गेले. 

अटलजींच्या कवितांचं जेव्हा जेव्हा कौतुक केलं जाई, तेव्हा तेव्हा ते त्याचं सारं श्रेय आपल्या वडलांना देत असत. त्यांच्यापुढे मी काहीच नाही असे ते म्हणायचे. अटलजींचं नावही मोठं अर्थपूर्ण आहे. अटलबिहारी या नावातच विरोधाभास आहे. अटल म्हणजे न ढळणारा आणि बिहारी म्हणजे स्थिर नसलेला किंवा भ्रमण करणारा. राजकारणाच्या क्षेत्रातला हा अढळ तारा होता, आणि साहित्याच्या प्रातांत सतत मुशाफिरी करणारे हे व्यक्तिमत्व होते. अटलजींच्या बालपणीच्या आठवणी या त्यांच्या निसर्गरम्य आणि धार्मिक परंपरा लाभलेल्या छोट्याशा बटेश्वर गावाशी निगडित आहेत. आपल्या बालपणीच्या आठवणी जागवताना ते तेथील वातावरणाचा अतिशय रम्य उल्लेख करतात. ‘आओ मनकी गाठे खोले’ या कवितेत ते म्हणतात, 

यमुना तट, टिले रेतीले 

घास फूस का घर डाँडे पर,

गोबर से लीपे आँगन मे, 

तुलसी का बिरवा, घंटी स्वर 

माँ के मुहसे रामायणके दोहे- चौपाई रस घोले !

आओ मनकी गाठे खोले !

अटलजींच्या कवितेत तेथील वातावरण खऱ्या अर्थाने जिवंत होते. वडिलांच्या काव्यगुणांचा वारसा अशा रीतीने त्यांच्याकडे आला. अटलजींना तीन भाऊ आणि तीन बहिणी. त्यांची आई अत्यंत धार्मिक वृत्तीची आणि साध्या स्वभावाची गृहिणी होती. मात्र ती सुगरणही होती. आईच्या हातचे पदार्थ खायला अटलजींना अतिशय आवडत. अटलजी निरनिराळया खाद्यपदार्थांचे चाहते होते. पण तरीही आईच्या हाताची चव त्यांना सगळ्यात जास्त आवडणारी होती. अटलजींचे पुढील शिक्षण ग्वाल्हेरला झाले. ग्वाल्हेरच्या बारा गोरखी येथील गोरखी गावी सरकारी उच्चमाध्यमिक शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले त्यानंतरचे शिक्षण घेण्याकरीता ग्वाल्हेर  मधील व्हिक्टोरिया काॅलेज (आताचे लक्ष्मीबाई काॅलेज) मधे प्रवेश घेतला. हिंदी, इंग्लिश आणि संस्कृत विषयांमधे विशेष प्राविण्याने ते उत्तीर्ण झाले.याच सुमारास समर्पित संघ प्रचारक नारायणराव तरटे यांच्या संपर्कात ते आले आणि त्यांच्या प्रेरणेतून अटलजी संघकार्याशी जोडले गेले ते कायमचेच. नारायणराव तरटे हे अटलजींपेक्षा वयाने फार मोठे नव्हते. पण तरीही या दोघांचे गुरुशिष्याचे नाते अलौकिक असे होते. अटलजी त्यांना मामू म्हणत. याच नारायणरावांना अटलजी एक दिवस भारताचे पंतप्रधान होतील असा विश्वास होता. 

नारायणराव यांना अटलजी यांनी षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्ताने एक पत्र पाठवले होते. अतिशय सुंदर अशा या पत्रात अटलजींनी आपले जीवन कसे असावे याचे फार सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात ‘ बम्बई से प्रकाशित नवनीत ने दिवाली अंक के लिये पूछा था की मेरी मनोकामना क्या है ! पता नही आपके बौद्धिक वर्ग के भाव मुझे कैसे स्मरण आ  गये और मैने कह दिया : हसते हसते मरना और मरते मरते हसना यही मेरी मनोकामना है. ‘

य दरम्यान अटलजींवरील संघकार्याच्या जबाबदाऱ्या वाढू लागल्या होत्या. ते एक उत्तम वक्ता आणि कवी म्हणून देखील नावारूपास येत होते.  याच कालावधीत त्यांनी लिहिलेली ‘ हिंदू तनमन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय ‘ ही कविता सगळ्या संघ स्वयंसेवकांना इतकी स्फूर्तिदायक वाटली की ती सर्वत्र म्हटली जाऊ लागली. ते जिथे जात तिथे त्यांना ही कविता म्हणण्याचा आग्रह होऊ लागला. बरेचदा अटलजी संघ कार्यासाठी कॉलेजचे तास बुडवून जात. हे जेव्हा त्यांच्या वडिलांना कळे तेव्हा वडील रागावत. अटलजी त्यांना म्हणत तुम्ही माझे मार्क्स बघा, मग बोला. आणि खरंच अटलजी संघ कार्यासाठी वेळ देऊनही अभ्यासात कुठेही मागे पडत नसत. 

(त्यांच्यावरील हा लेख माझ्या अष्टदीप या पुस्तकातून. या पुस्तकाला तितिक्षा इंटरनॅशनल या संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच मिळाला आहे.)

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments