श्री सुहास सोहोनी
इंद्रधनुष्य
☆ “31 जुलै…” – श्री संदीप वेलणकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
३१ जुलै १९९५ रोजी भारतातील मोबाईल सेवा सुरू झाली, या गोष्टीला २८ वर्षे पूर्ण झाली.
आज जरी प्रत्येकाच्या हातात मोबाइल दिसत असला तरी देशाच्या एकूण लोकसंख्येच्या २४ टक्के लोकांकडे मोबाईल फोन आहे. तर एकूण लोकसंख्येच्या २८ टक्के लोकच इंटरनेटचा वापर करत आहेत.
ज्या कोलकात्यातून १६४ वर्षांपूर्वी पहिली तार पाठविण्यात आली होती त्याच कोलकात्यातून ३१ जुलै १९९५ रोजी पहिला मोबाईल कॉल लावण्यात आला, ही घटना ऐतिहासिक योगायोगाची. हा कॉल केला होता एका साम्यवादी नेत्याने. ज्योती बसू यांनी. ते तेव्हा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. मोबाइलचे जाळे देशात पहिल्यांदा कोठे अंथरले जाईल तर ते कोलकात्यामध्येच, हा त्यांचा हट्टाग्रह होता. ते सुरू झाले तेव्हा त्यांनी रायटर्स बिल्डींगमधून तेव्हाचे केंद्रीय दूरसंचारमंत्री सुखराम यांना पहिला मोबाईल फोन केला.
भारतातील पहिली मोबाईल ऑपरेटर कंपनी मोदी टेल्स्ट्रा (आताची स्पाईस) होती. त्याच्या सेवेचे नाव मोबाईल नेट असे होते. व यासाठी नोकिया-२११० हा हॅंडसेट वापरला गेला होता. त्यावेळी फ़क्त मूलभूत सुविधा असलेला मोबाईल तब्बल २५ ते ४५ हजारांना होता. देशातील पहिला मोबाईल कॉल याच नेटवर्कवरून करण्यात आला होता. मोदी टेल्स्ट्रा ही भारतातील मोदी ग्रुप आणि ऑस्ट्रेलियातील टेलिकॉम कंपनी टेल्स्ट्रा यांच्या भागिदारीतून निर्माण झाली होती. तेव्हा देशात एकूण ८ कंपन्या होत्या ज्या सेल्युलर सेवा देत होत्या.
अन्य देशांच्या तुलनेत भारतात मोबाईल सेवा अधिक लोकांपर्यंत पोहचण्यास वेळ लागला. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे महाग कॉल दर होते. सुरुवातीच्या काळात एका आऊटगोइंग कॉलसाठी प्रती मिनिटाला १६ रुपये मोजावे लागत. आऊटगोईंग कॉल्स बरोबरच इनकमिंग कॉल्ससाठी देखील पैसे द्यावे लागत होते.
जगाचा विचार केला तर पहिला मोबाईल कॉल मोटोरोलाचा कर्मचारी मार्टिन कुपर याने ३ एप्रिल १९७३ रोजी केला होता. भारतात मोबाईल फोन्स यायला ९०चे दशक उजाडावं लागलं होतं.
संदर्भ – इंटरनेट
लेखक : श्री संजीव वेलणकर
पुणे, मो ९४२२३०१७३३
संग्राहक : श्री सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈