सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ सोमवती अमावस्या… या नावामागची कथा ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सोमवारी येणाऱ्या अमावस्येला ” सोमवती अमावस्या ” म्हणतात. यासंदर्भात महाभारतात एक कथा आहे. 

कौरव-पांडव यांच्यात घनघोर युद्ध झाले. पांडवांचा जय झाला पण त्यासाठी त्यांना पूज्य गुरुवर्य व इतर कुटुंबीयांना मारावे लागले. या हत्या दोषाने ते व्यथित झाले व श्रीकृष्णाकडे आले. व पाप मुक्तीसाठी साकडे घातले. श्रीकृष्ण म्हणाले….. “नैमिषारण्यात जाऊन अखंड तपस्या करा. जेव्हा सोमवती अमावस्या येईल तेव्हा तेथील चक्रतिर्थावर स्नान, दान करा.” पांडवांनी बारा वर्षे तपस्या केली.  पण सोमवती अमावस्या आली नाही. तेव्हा त्यांनी तिला शाप दिला…  ” कलियुगात तुला दरवर्षी एकदा किंवा दोनदा यावेच लागेल व या दिवशी जे पवित्र स्नान, दान करतील त्यांना पाप मुक्त करावे लागेल.”

दुसरी कथा अशी आहे की कांचीपुरी गावात देवस्वामी व धनवती हे जोडपे राहत होते. त्यांच्या कन्येचे नाव गुणवती. एका साधूने सांगितले,…. ” ही सप्तपदीतच विधवा होईल. तो दोष टाळण्यासाठी तुम्ही सोमा पूजन करा. सिंहलद्वीप येथे “सोमा” नावाची परटीण आहे. तिला विवाहाला बोलवा.” …. गुणवती स्वत: तिथे गेली तिची सेवा केली व तिला घेऊन आली. गुणवतीच्या विवाहात सप्तपदी  सुरू झाली . नवरदेव चक्कर येऊन पडले. सोमाने आपले पुण्यबल देऊन त्याला जिवंत केले व ती घरी गेली. वाटेत सोमवती अमावस्या आली तिने विधीपूर्वक स्नान, दान व पिंपळ वृक्षाच्या छायेत विष्णू पूजन केले. ती घरी पोहोचली तर तिचा नवरा, मुलगा व जावई मृतावस्थेत दिसले. तिने आपले पुण्य बळ देऊन त्यांना  जिवंत केले…. तेव्हापासून तिचे हे व्रत सर्वजण करू लागले. दिव्यांची पूजा, पिंपळाची पूजा व भगवान शिव शंकराची पूजा करा. सात्विक अन्न, नैवेद्य, शक्यतो मौनव्रत,भाविकता असावी.व खालील प्रार्थना करावी….. 

दीपज्योती परब्रम्ह

दीपज्योतीर्जनार्दन

दीपो हरतु मे पापम् 

दीपज्योतीर्नमोस्तुते.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments