इंद्रधनुष्य
☆ “एका गांधी टोपीचा प्रवास …” ☆ श्री हेमंत तांबे ☆
आपण स्व. पु.ल.देशपांडे यांचं खिल्ली हे पुस्तक वाचलं असेलच.
त्यातील ” एका गांधी टोपीचा प्रवास ” पु.लं.च्या भाषेत देतो…..
स्वातंत्र्याला फक्त पंचवीस वर्षे झाली होती !
पु.ल. लिहितात……
राष्ट्रीय चळवळीत भाग घेतलेल्या एका वृद्ध स्नेह्याला मी विचारलं, ” गेल्या पंचवीस वर्षांत कशात जास्त परिवर्तन झालं, असं तुम्हाला वाटतं?”
” गांधी टोपीत ! ” ते म्हणाले.
” ते कसं काय? ”
” पूर्वी गांधी टोपी घालायला इंग्रज सरकारची भीति वाटत असे. आता आपल्याच जनतेची भीती वाटते.”
“असं का म्हणता? “
” तूच पाहा, गांधी टोपी, पायघोळ धोतर, खादीचा झब्बा आणि जाकीट घालून हातात कातडी ॲटॅची घेतलेल्या माणसाविषयी तुझं प्रथमदर्शनी काय मत होतं? “
पु.ल. बोलले नाहीत !
या गांधी टोपीचा प्रवास मला पु.लं.कडून नीट कळला आणि मोठं झाल्यावर मी अनुभव सुध्दा घेतला.
पण या टोपीचा उगम कसा झाला ? हा प्रश्न त्रास देत असे ! मग तो शोध सुरू झाला……
१) १९१९ साली मोहनदास रामपूरच्या नवाबाला भेटायला गेले होते. त्यावेळी डोक्यावर काहीतरी हवं म्हणून तिथल्याच एका दर्जीकडून त्यांनी एक टोपी शिवून घेतली होती… ती गांधी टोपी !
२) एका ठिकाणी कै. काका कालेलकर यांच्यासोबत मोहनदास बोलत असताना, आपल्या डोक्याला सूट होणारी टोपी शोधत असताना, या टोपीचा शोध लागला, असं मोहनदास म्हणतात….. असा तो जन्म !
ही टोपी मोहनदासांनी १९१९ — १९२१ घातली… लोकमान्य १९२० मध्ये स्वर्गवासी झाल्यावर स्वातंत्र्य चळवळ मोहनदासांच्या हातात आली…. तोपर्यंत टोपीचा उपयोग मोहनदासांनी शिकून घेतला होता !
१९२१ नंतरचा मोहनदासांचा टोपी घातलेला फोटो शोधून मिळत नाही…..
….
मला भविष्य सांगता येत नाही, पण भूतकाळ थोडा माहिती आहे.
ती जुनी, छान, ‘ टोपीवाला आणि माकडं ‘ ही गोष्ट तुम्हाला माहीत आहेच… तिची पुनरावृत्ती करत नाही !
पण त्या गोष्टीचा दुसरा भाग तुम्हाला माहीत नाही. तो असा —
तो मूळ टोपीवाला, म्हातारा होऊन मरण्यापूर्वी त्यानं आपल्या मुलाला ती गोष्ट सांगून बजावलं, ” कधी तुझ्यावर जर माझ्यासारखी वेळ आली, तर लक्षात ठेव आपल्या डोक्यावरील टोपी खाली काढून टाकायची, आपल्या सर्व टोप्या परत मिळतात.”….आणि त्या म्हाताऱ्यानं डोळे मिटले !
मुलगा टोप्यांचाच व्यवसाय करत होता. दररोज फिरून टोप्या विकत असे… एकदा फिरून थकला, भागला आणि एका झाडाखाली बसला. जेवून जरा झप्पी घेऊन उठला तर टोप्या गायब… वर पाहतो तर माकडांच्या डोक्यात टोप्या. त्याला बापानं माकडांची मानसिकता सांगितली होती…. त्यानं आपल्या डोक्यावरील टोपी काढून खाली टाकली… चटकन एक टोपी न मिळालेलं माकड खाली येऊन ती टोपी घेऊन झाडावर गेलं !
हा विचार करू लागला, ‘असं कसं घडलं? ….’ .तोपर्यंत ती माकडं टोप्या घेऊन जाताना दिसली. यानं विनवणी केली, ‘ असं करू नका, माझ्या टोप्या परत द्या, please.’
एक माकड थांबून म्हणालं, ” आता आपली भेट २०१४ साली, तोपर्यंत टोप्या आमच्या डोक्यावर ….. ! “
© श्री हेमंत तांबे
पाटगाव.
मो – 9403461688
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈