सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
इंद्रधनुष्य
☆ ती वेळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
आज गोकुळात नंदा घरी मोठी गडबड उडाली होती ! यशोदा अस्वस्थ होती येणाऱ्या बाळाच्या प्रतीक्षेत ! घरातील मंडळी आणि तिच्या सख्या तिची काळजी घेत होत्या. कधी एकदा ते बाळ जन्माला येतंय याची सारे गोकुळ वाट बघत होते ! बाहेर श्रावणाच्या सरीवर सरी येत होत्या. सारं रान कसं हिरवंगार झालं होतं ! गोपगोपाळ आनंद घेत होते सृष्टीचा ! मुक्त, भारलेले, चैतन्यमय वातावरण गोकुळात होते !
त्याउलट मथुरेत कंसाच्या कारागृहात वसुदेव- देवकी सचिंत बसले होते. देवकीचे दिवस भरत आले होते. कंसाचे मन अस्वस्थ होते. कंसाने आत्तापर्यंत जन्मलेली सातही बालके जन्माला आल्याक्षणीच मारून टाकली होती. प्रत्येक जन्माला येणारे बाळ त्याचा ‘आठवा’, त्याला मारणारा ‘काळ’असेल का? या भीतीने प्रत्येक बाळ त्याने यमसदनास पाठवले होते. पण खऱ्या ‘आठव्या’ चा जन्म आज होणार होता. तेही बाळ मारलं गेलं तर …म्हणून वसुदेव देवकी दुःखी होते….
… पण आज परमेश्वरी लीलेचा अवतार होणार होता ! बंद कारागृहाच्या आत नवचैतन्य घेऊन ते बाळ जन्माला येणार होते. हुरहुर होती ती अशांना की, येणारा जीव परमेश्वरी अंश असणार आहे हे माहीत नसणाऱ्याना !
रात्रीचे बारा वाजले. बाहेर पावसाची धुवांधार बरसात चालू होती !.देवकीने जन्म दिला होता एका बाळाला ..सुकुमार, सुकोमल अशा… आता कंसाला सुगावा लागण्याच्या आत ते बाळ बाहेर काढायला हवे होते !वसुदेवाने एक टोपली घेतली. त्यात मऊ शय्या तयार केली .देवकीने ते गोजिरवाणी बाळ हृदयाशी धरले. त्या इवल्याश्या जिवाला तिला सोडवेना ! बाळाला कुशीत घेऊन त्याचे पटापट मुके घेतले. मन घट्ट करून तिने बाळाला टोपलीत ठेवले. मऊशार वस्त्राने पांघरले. जणू तिने आपल्या मायेचे आवरण त्याच्यावर घातले, की ज्यामुळे ते कोणत्याही संकटापासून दूर राहणार होते ! तो गोंडस जीव तिला हसत होता. जणू म्हणत होता, ‘ अगं,मी तर जगाचा त्राता ! काळजी करू नकोस, मी सुरक्षित राहीन !’
वसुदेव बाळाची टोपली घेऊन यमुनातीरी आला. यमुना दुथडी भरून वाहत होती. ‘ या बाळाला मी कसं नेणार पार?’ असा विचार त्याच्या मनात येत होता. टोपली डोक्यावर घेऊन मोठ्या धीराने त्याने नदीच्या पाण्यात पाय टाकला. समोरचा जलमार्ग कापून जायचे होते त्याला ! पण जसा टोपलीतील बाळाच्या पायाला पाण्याचा स्पर्श झाला तसे पाण्याचा प्रवाह त्याच्यासाठी मार्गच बनला जणू ! ती वेळ त्याची होती. दोघेही यमुना पार झाले. तिकडे नंदाच्या घरी यशोदेच्या कुशीत नुकतेच जन्माला आलेले कन्यारत्न होतेच. यशोदेच्या कुशीत त्या बाळाला ठेवून तिच्या बाळाला नंदाने वसुदेवाच्या स्वाधीन केले. आपल्या कुशीत नुकतंच जन्माला आलेला बाळ दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचं ! किती वाईट वाटलं असेल यशोदेला ! आणि हेही माहीत होतं की, हे बाळ आपल्याला परत दिसणार नाहीये ! यशोदेची लाडकी मथुरेत आली वसुदेवाबरोबर !
देवकी प्रसूत झाल्याचे कळताच कंस कारागृहात आला. बाळाचा जन्म होऊन दुसरं बाळ तिथे आणण्याच्या या प्रक्रियेत किती वेळ गेला असेल देव जाणे ! पण कृष्ण सुरक्षित स्थळी पोचला आणि यशोदेची कन्या देवकीकडे आली ! त्यागाची, कसोटीची वेळ होती प्रत्येकाच्या ! वसुदेव- देवकीने मनावर दगड ठेवून आपलं बाळ दुसरीकडे सोपवले होते, तर नंद- यशोदेने आपली छोटी लेक दुसऱ्याच्या हाती दिली होती !
तो बालजीवही त्यागासाठी सिद्ध होता जणू ! वसुदेव देवकीला उघड्या डोळ्यांनी त्या बालिकेच्या मृत्यूला पहावे लागणार होते ! जीवनातील एक कसोटी पूर्ण करावी लागणार होती.
… या सगळ्यांना खेळवत होता तो ‘ परमात्मा ‘ .. ज्याचा जन्म, दुष्टांच्या संहारासाठी झाला होता. त्यासाठी बालरूप घेऊन तो पृथ्वीवर अवतरला होता ! त्याच्या नवीन जन्माची हीच ती ‘ वेळ ‘ होती.
कृष्ण जन्माष्टमी साजरी करताना कृष्णाचे हे आश्वासन आपल्या मनात कायम रहाते,
‘यदा यदाहि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत,
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्..’
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈