श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ आसवांचा चांद्रप्रवास ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
… अर्थात तीन वर्षे अकरा महिने आणि सोळा दिवसांची प्रतिक्षा !
७ सप्टेंबर,२०१९. या आधी त्या दोन डोळ्यांत कित्येक वर्षे फक्त चंद्रच चमकताना दिसायचा…अमावस्या असली तरी ! आज मात्र दोन्ही डोळ्यांत अमावस्या भरून राहिलेली आहे. हजारो किलोमीटर्स दूर आणि वर असणा-या चंद्राच्या अंतरंगातील ओलावा शोधून काढण्याच्या प्रयत्नात या माणसानं रक्ताचं पाणी केलेलं असताना त्या चंद्राने याच्याच डोळ्यांत दीर्घकाळ टिकून राहील असा ओलावा भरून टाकला !
सामान्य पुरुषाचं रडणं खरं तर भित्रेपणाचा,असहाय्यतेचं लक्षण मानलं जातं…पण शूर पुरुष जेव्हा रडतात तेव्हा त्यांचे अश्रू फुलांना जन्माला घालण्याचा प्रण करीत वाहात असतात. जगाला शंभर टक्के यशाचीच गोडी समजते. यापेक्षा कमी जग खपवून घेत नाही. शंभर आणि नव्व्याण्णव यामधील एकचा फरक नव्याण्णवची किंमत अगदी कमी करून टाकतो.
कैलासविदवू सिवन...एका सामान्य शेतक-याच्या पोटी जन्म. माध्यमिक शिक्षण मातृभाषा तमीलमध्ये घेतलेलं….खाजगी शिकवणी न लावताही अभ्यासात उत्तम गती. दैवाने प्रदान केलेल्या बुद्धीला कष्टाचं खतपाणी घालून देशाच्या सर्वोच्च अंतराळ संशोधन केंद्राचा प्रमुखपदी विराजमान होण्याची किमया. आणि हाती घेतलेलं चांद्रयानाचं व्रत. कोट्यवधी देशवासियांच्या अपेक्षांचं भलंथोरलं ओझं वागवत वागवत प्रचंड कष्टानं चांद्रयान-२ विक्रम लॅन्डर आणि प्रग्यान रोव्हर चंद्रावर, आणि तेही त्याच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याच्या कामात स्वत:ला झोकून दिलेला निगर्वी, मितभाषी माणूस. त्यादिवशी चंद्रालाही हळहळ वाटली असेल…अगदी जवळ येऊनही चांद्रयानाला चंद्राशी नीट गळाभेट घेता नाही आली ! खरं तर फक्त ही गळाभेटच शिल्लक राहिली होती…बाकी जवळजवळ सर्व कामगिरी उत्तम बजावली होती चांद्रयान-२ ने. मात्र ऐनवेळी अपयशाने पायांत खोडा घातला आणि जगाच्या लक्षात त्याचं केवळ कोसळणं लक्षात राहिलं. आमराईमधल्या सर्वांत डेरेदार आम्रवृक्षावर वीज कोसळावी आणि फळं जळून जावीत अशी स्थिती झालेली…
… तोंडातून शब्द फुटू शकत नव्हते तेव्हा आसवांनी शब्दांची जागा घेतली. टाळ्या वाजवण्याच्या बेतात असलेले अनेक हात खाली झाले, नजरा दूर झाल्या. उभ्या देशाचा विश्वास गमावल्याची भावना मनात जोरात शिरली…आणि आसवांचा बांध फुटला ! देशाच्या नेतृत्वाने सांत्वन केलं, धीराचे चार बोलही सांगितले. सबंध देश निराश झाला होताच…आणि ते साहजिकच होते. पण त्याचक्षणी पुढचं पाऊल टाकण्याचा निर्धार झाला. अगदी सेवानिवृत्त होईपर्यंत त्याच ध्यासाने काम केले…चुकांचा मागोवा घेतला आणि त्या सुधारण्याच्या योजना नव्याने आखल्या. दिवस निघून गेले, वर्षे निघून गेली….आणि १४ जुलै २०२३ चा दिवस उगवला आणि २२ जुलै २०१९चा दिवस आठवला !
आजच्या २३ ऑगस्टला सुद्धा ७ सप्टेंबर मनात घर करून होता. चांद्रयान-२ शेवटच्या काही मोजक्या मिनिटांत यशापासून दूर जाऊन कोसळलं होतं ! आज असं व्हायला नको…पण गतवेळी झालेल्या चुका, अपघात यांपासून नव्या दमाच्या शिलेदारांनी धडा घेतला आहेच…सर्व काही व्यवस्थित होईल अशी खात्री होती मनात….तसंच झालं….केवळ चांद्रयानच नव्हे तर के.सिवन नावाच्या या मोठ्या माणसाचं हळवं मनही चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरलं… डोळ्यांत पौर्णिमेचा चंद्र उतरला होता ! आताच्या आसवांना तीन वर्षे अकरा महिने आणि सोळा दिवसांपूर्वीच्या आसवांची याद आली…..मात्र त्या आणि या आसवांमध्ये पृथ्वी आणि चंद्र नव्हे तर जमीन-अस्मानाचा फरक होता….आताची आसवं आनंदाची होती…..!
कैलासविदवू सिवन साहेब…हा देश आपला सदैव ऋणी राहील ! आपले हार्दिक अभिनंदन !
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈