श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

उधमपूर रेल्वे स्टेशन.. कश्मिर !

येथूनच तरणाबांड तुषार पुण्याला निघाला असताना त्याचे आई-बाबा, भाऊ त्याला निरोप द्यायला आले होते काहीच वर्षांपूर्वी! त्यांच्या विरोधाला न जुमानता पोरगं नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये सैन्य अधिकारी व्हायला निघालं होतं. बालहट्टापुढे काही चालतं का आईबापाचं? आणि आज त्याच स्टेशनवर ते त्याला घ्यायला आलेले आहेत… अखेरचे! तो आलाय… तिरंग्यात स्वत:ला गुंडाळून घेऊन… त्याचं स्वप्न साकार करून ! 

उधमपूर मध्ये शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्राचार्य देव राज यांचा हा धाकटा मुलगा. जन्म २० एप्रिल, १९८९ चा. थोरला मुलगा इंजिनिअर व्हायचं म्हणत होता. पण तुषार मात्र अगदी लहानपणापासून म्हणायचा… मला लष्करात जायचंय आणि अतिरेक्यांना ठार मारायचंय…. शाळेतल्या निबंधातही तुषार हेच लिहायचा ! त्याने कश्मिरातील अतिरेकी कारवाया आपल्या डोळ्यांनी पाहिल्या होत्या. देशाच्या दुश्मनांना आपण यमसदनी पाठवावे, असे त्याला मनातून सतत वाटे. 

भगवंताला अनन्य भावाने शरण येणाऱ्या भक्ताचे एक वैशिष्ट्य सांगताना माऊली ज्ञानोबारायांनी म्हणून ठेवलं आहे…” तैसा मी वाचूनि कांही, आणिक गोमटेंचि नाहीं। मजचि नाम पाहीं, जिणेया ठेविलें “

॥ ३३६ ॥ – याला माझ्यावाचून अन्य काहीच गोमटे, चांगले वाटत नाही. याने त्याच्या आयुष्याला माझेच नाव दिलेले असते. मी म्हणजेच तो ! इथे देव म्हणजे देश आणि भक्त म्हणजे तुषार महाजन. आपल्या संपूर्ण जीवनाला तुषारने जणू देशाचेच नाव दिले होते.

अत्यंत परिश्रमपूर्वक शिक्षण पूर्ण करून तुषार २००६ मध्ये एन. डी. ए. मध्ये दाखल झाले. नंतर पुढील उच्च लष्करी शिक्षणासाठी त्यांनी २००९ मध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवला आणि तुषार महाजन लष्करी अधिकारी झाले… अतिरेक्यांना ठार मारण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचे त्यांचे मनसुबे आता प्रत्यक्षात उतरणार होते —- त्यांना लगेचच त्यांच्या आवडीचं काम मिळालं. जम्मू-कश्मिरमध्ये अतिरेकी विरोधी अभियानात ते नेमाने सहभागी होऊ लागले. 

२० फेब्रुवारी, २०१६. पंपोर येथून सी.आर.पी.एफ. चे जवान अशीच एक अतिरेकी विरोधी मोहिम फत्ते करून तळावर परतत होते. इतक्यात त्यांच्या वाहनांवर अतिरेक्यांनी तुफान हल्ला चढवला. अकरा जवान गंभीर जखमी झाले! आपल्या सैन्याने अतिरेक्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलेच. पण ते चार अतिरेकी भर गर्दीतल्या एका बहुमजली इमारतीत आश्रयाला गेले. तिथे कित्येक लोक होते, त्यांच्या जीवाला मोठा धोका होता.—- जवानांनी त्या इमारतीला वेढा दिला. आतून अतिरेक्यांकडून अत्याधुनिक शस्त्रांनी तुफान गोळीबार होत होता. आपल्या जवानांनी जीव धोक्यात घालून इमारतीतून शंभरेक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले. पण तोपर्यंत अतिरेक्यांच्या गोळीबारात स्पेशल फोर्सचे कॅप्टन पवन कुमार साहेब हुतात्मा झाले…. फार मोठी हानी होती ही.. अर्थात चार पैकी एक अतिरेकीही टिपला होता पवन कुमार साहेबांनी मरता मरता.

दिवस पुढे सरकत होता. आतून गोळीबार कमी होण्याची चिन्हे नव्हती. स्पेशल फोर्सची तुकडी पाठवून इमारतीवर रात्री हल्ला करण्याची योजना आखण्यात आली. ह्या हल्ल्यात सर्वांत पुढे असणार होते…. स्पेशल फोर्स कमांडो बनलेले कॅप्टन तुषार महाजन. 

रात्र पडली… त्यांचे कमांडो पथक गोळ्या अंगावर झेलत इमारतीत घुसले… त्यांच्यापुढे अतिरेक्यांना टिकाव धरता येईना… ते सर्व अतिरेकी इमारतीच्या आणखी आतील भागाकडे पळून गेले. तुषार साहेब त्यांच्या मागावर राहिले… त्यांनी अगदी समोरासमोर जाऊन त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला….. ती इमारत आगीने वेढली गेली… अतिरेक्यांनी आयईडीचे स्फोट घडवून आणले. आणि या भयावह लढाईत महाजन साहेबांनी स्वत:च्या छातीवर चार गोळ्या झेलल्या… जीवघेण्या जखमा करीत गोळ्या शरीरात घुसल्या…. अतिरेकी यमसदनी पोहोचले होते… पण कॅप्टन तुषार महाजन साहेब अमरत्वाची वाट चालू लागले होते… वैद्यकीय उपचार सुरू असताना कॅप्टन साहेब हे जग सोडून गेले ! त्यांच्या सोबत असलेले लान्स नायक ओम प्रकाश हे सुद्धा हुतात्मा झाले — भारतीय लष्कराने नंतर निकराचा हल्ला चढवत उरलेले तिन्ही अतिरेकी ठार मारले !.. पण आपण आपले तीन वाघ गमावले होते !

मुलाची शवपेटी पाहताच कॅप्टन तुषार साहेबांच्या वडिलांनी– प्राचार्य देव राय यांनी सॅल्यूटसाठी हात उभारला… लेकाला मानवंदना म्हणून. पोराने आपले स्वप्न खरे करून दाखवले होते. 

आधीच्या सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर त्यांनी आपल्या फेसबुकवर स्टेटस ठेवलं होतं आणि म्हटलं होतं… “ सो जायेंगे कल लिपटकर तिरंगे के साथ ! “ 

गोकुळ अष्टमी ! आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस– या दिवशी उधमपूर रेल्वे स्टेशनचं नाव बदलून शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन असं करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे ! शहीदांच्या स्मृती अशाच जागत्या ठेवायला पाहिजेत…! 

हुतात्मा कॅप्टन तुषार महाजन साहेब… अमर रहें ! जय हिंद ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments