श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ विज्ञान विशारदा — डॉ. कमलाबाई सोहोनी… लेखिका – सुश्री वसुमती धुरू ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

इसवी सन १९३३. बंगलुरू (बंगलोर ) येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही शास्त्रीय संशोधनाला वाहून घेतलेली नावाजलेली संस्था. द्रष्टे उद्योगपती श्री यश यांनी १९११ साली स्थापन केलेल्या या संस्थेमध्ये फक्त निवडक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असे.

इन्स्टिट्यूटच्या खूप मोठ्या आवारामध्ये घनदाट झाडीने वेढलेली दगडी इमारत शोभून दिसत होती. तिथल्या प्रशस्त ऑफिसमध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी व्ही रामन हे  संस्थेचे डायरेक्टर राखाडी रंगाचा सूट टाय आणि डोक्याला फेटा बांधून रुबाबदारपणे बसले होते. चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज झळकत होते. नारायणराव भागवत आपली लेक कमला हिला घेऊन सर रामन यांना भेटायला आले होते.  स्वतः नारायणराव व त्यांचे बंधू माधवराव हे दोघेही इथेच संशोधन करून एम. एससी झाले होते. संस्थेच्या स्थापनेपासून त्या दिवसापर्यंत एकही विद्यार्थ्यांनी तिथे आली नव्हती.

सर सी. व्ही. रामन यांनी स्पष्टपणे त्या दोघांना सांगितले की,  शास्त्रीय संशोधन हे स्त्रियांचे क्षेत्र नाही म्हणून कमलाला प्रवेश नाकारण्यात आला आहे.’

लहानसर चणीची, नाजूक, गोरी, व्यवस्थित नऊवारी साडी  नेसलेली, केसांची घट्ट वेणी घातलेली कमला धीटपणे ,शांत पण ठाम  स्वरात म्हणाली,

‘सर, मी बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये बी. एससी फर्स्ट क्लास फर्स्ट आले आहे. इथल्या प्रवेशाचा निकष पूर्ण केला आहे. मला पुढील शिक्षणाची संधी नाकारून तुम्ही माझ्यावर आणि माझ्यानंतर इथे शिकू इच्छिणाऱ्या इतर मुलींवर अन्याय करीत आहात. मी मुंबईला परत जाणार नाही. इथेच राहणार. तुमच्या दारापुढे सत्याग्रह करीन.’

सर रामन यांनी या मुलीतले वेगळेपण ओळखले. कमलाला इन्स्टिट्यूटमध्ये एक वर्षासाठी प्रोबेशनरी स्टुडन्ट म्हणून प्रवेश मिळाला. साधीसुधी दिसणारी ही मराठी मुलगी, श्रीनिवासय्या या तिच्या गुरूंनी घेतलेल्या अनेक कठोर परीक्षांमध्ये  उत्तम पद्धतीने उत्तीर्ण झाली. दिवसाकाठी १८ तास बौद्धिक व शारीरिक काम त्यांना करावे लागे. संध्याकाळचे दोन तास  कमलाबाईंना त्यांचे आवडते टेनिस खेळण्यासाठी मिळत.  पार्टनर म्हणून  त्या तिथल्या मदतनीसाबरोबरच खेळत असत .

नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांचे प्रबंध वाचून त्या टिपणे काढीत.  शंका निरसनासाठी त्या परदेशी  शास्त्रज्ञांना पत्र लिहून प्रश्न विचारत. एखाद्या मित्राला समजवावे अशा पद्धतीने या शास्त्रज्ञांनी त्यांचे शंकानिरसन केले.  कमलाच्या अभ्यासातली तळमळ त्यांना जाणवली होती. शंभराहून अधिक सायन्स रिसर्च पेपर्स कमलाबाई यांच्या नावावर आहेत.

कमलाबाईंचे कर्तृत्व पाहून सर रामन यांनी कमलाबाईंजवळ मोकळेपणाने कबूल केले की,’आता मी माझी चूक सुधारणार आहे. यापुढे इन्स्टिट्यूटचे दरवाजे लायक विद्यार्थीनींसाठी नेहमी खुले राहतील.’ शिवाय ते स्वतः कमलाबाईंबरोबर टेनिसचे दोन- चार सेट्स खेळू लागले. 

पुढे केंब्रिजमध्ये अध्ययन करून कमलाबाईंनी पीएच. डी मिळविली. तिथेच राहून काम करण्याची संधी  नाकारून त्या भारतात परतल्या.

बंगलोरला असताना त्यांनी, ज्या बालकांना मातेचे स्तन्य मिळत नाही त्यांच्यासाठी गाढविणीच्या दुधाचा विशिष्ट घटक विशिष्ट प्रमाणात मिळवून पोषणमूल्य असलेल्या  दुधाचा शोध लावला . कडधान्य व त्यातील प्रथिने यावर संशोधन केले. कुन्नूर येथे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन’ मध्ये त्यांनी ब समूहातील जीवनसत्वावर काम केले. नीरा या नैसर्गिक रुचकर पेयातील तसेच ताडगूळातील पोषक घटक शोधला. १९६७ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट संशोधनाचे राष्ट्रपती पदक मिळाले .महाराष्ट्र सरकारच्या आरे मिल्क डेअरी प्रकल्पासाठी त्यांनी एकही पैसा मानधन न घेता संपूर्ण मार्गदर्शन केले. दुधाची प्रत व गुरांचे आरोग्य सांभाळण्याचे मार्गदर्शन केले.

कमलाबाईंनी मुंबईला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये जीव रसायनशास्त्र विभाग नव्याने उघडला तिथे १९४९ ते १९६९ अशी वीस वर्षे संशोधन व अध्यापन केले. एमएससी पीएच.डीच्या अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कमलाबाई व दुर्गाबाई या सख्या बहिणी. लहानपणीच मातृसुखाला पारख्या झालेल्या दोघींच्यातला जिव्हाळा मैत्रिणीसारखा होता. आणि बुद्धी तेजस्वी होती.

दिल्ली येथील ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या सुवर्ण महोत्सवात त्यांचा सत्कार करून  मानपत्र व पारितोषिक देण्यात आले. सत्काराला उत्तर देताना,  ‘शास्त्रीय संशोधनाचा देशासाठी पूर्ण उपयोग करा. ते लोकांच्या व्यवहारात आणा’ असे त्यांनी तळमळीने सांगितले. नंतर तिथल्या चहापानापूर्वीच कमलाबाई अकस्मात कोसळल्या आणि तिथेच वयाच्या ८६ व्या वर्षी मृत्यू पावल्या . कमला नावाच्या ज्ञानदेवीला सरस्वतीच्या दरबारात भाग्याचे मरण आले.

भारतात कमलाबाईंमुळे शास्त्रीय संशोधन क्षेत्राचे दरवाजे स्त्रियांसाठी उघडले गेले. जगभर अनेक  स्त्रिया शास्त्रीय संशोधन क्षेत्रात महत्त्वाचे काम  करीत आहेत. परंतु या क्षेत्रात महिलांना कमी महत्त्व मिळते. त्यांनी सिद्ध केलेले स्थानसुद्धा त्यांना नाकारले जाते ही वस्तुस्थिती आहे.

१९३३ साली आपल्या बुद्धिमान लेकीच्या, शास्त्रीय संशोधन करण्याच्या इच्छाशक्तीला सक्रिय पाठिंबा देणारे, विश्वासाने तिला एकटीला  इन्स्टिट्यूटच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या हवाली करून रातोरात मुंबईला परतणारे नारायणराव भागवत, पिता म्हणून नक्कीच आदरास पात्र आहेत.

लेखक – सुश्री वसुमती धुरू 

संग्रहिका –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments