श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “मृत्यूनंतरही अवयवदानाने जिवंत राहा…” – लेखक : श्री निरेन आपटे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

आपण जीवनभर इतरांच्या उपयोगी पडत असतो. आपण मृत्यूनंतरही इतरांच्या उपयोगी पडू शकतो. त्यासाठी उपाय आहे अवयवदान किंवा देहदान!

आपल्या मृत्यूनंतर आपले , चांगल्या स्थितीत असलेले अवयव , दुसऱ्याला दान करण्याची किंवा संपूर्ण मृतदेह दान करण्याची व्यवस्था तुम्ही करू शकता. त्याबद्दल सांगत आहेत निरेन आपटे. 

ग.दि. माडगूळकरांनी गीतरामायणात लिहिले आहे, 

“मरण कल्पनेशी थांबे, तर्क जाणत्यांचा. 

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.”

माणूस जे काही जगतो, तर्क लावतो, शोध लावतो ते मृत्युपाशी येऊन थांबतात. मृत्यूनंतर पुढे काय होतं, हे कोणालाही माहित नाही. कारण आपण पराधीन आहोत. तरीही आपले डोळे, त्वचा, किडनी, यकृत, हृदय, फुफ्फुस, आतडी, स्वादुपिंड, हात, पाय दुसऱ्याला देऊन आपण आपल्या मृत्यूनंतरही अवयवाद्वारे ह्या जगात राहू शकतो. आपला मृत्यू नैसर्गिकपणे मेंदू बंद होऊन (ब्रेन डेड) झाला असेल तर आपण एकूण ९ व्यक्तींना विविध अवयव देऊ शकतो. अवयवदान करून झाल्यानंतर मृत व्यक्तीचा देह त्याच्या नातलगांकडे सोपवला जातो. जेणेकरून ते अंत्यविधी करू शकतील. संपूर्ण शरीर दान केलं असेल तर मात्र मृतदेह नातलगांकडे सोपवत नाहीत. ज्या हॉस्पिटलमध्ये किंवा मेडिकल काॅलेजमध्ये शरीर दान केलं ते हॉस्पिटल साधारणपणे ५ वर्षे तो देह जपून ठेवतात. देह टिकाव म्हणून त्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. असा देह वैद्यकीय प्रशिक्षण व संशोधनासाठी उपयोगात आणतात. त्यानंतर काळजी व सन्मानपुर्वक मृतदेहाची विल्हेवाट लावतात. हा मृतदेह वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतो. ते विद्यार्थी मृत शरीर उघडून प्रत्येक अवयव प्रत्यक्ष पाहू व हाताळू शकतात. पुढे तेच डॉक्टर बनतात आणि वैद्यकीय सेवा पुरवून मानवी जीवन सुखकर बनवतात. 

एका आकडेवारीनुसार दरवर्षी ४,००,००० व्यक्ती अवयवाची वाट पाहत असतात. अवयव मिळाला नाही तर नाईलाजाने मृत्यू स्वीकारतात. त्यांच्याकडे एकच उपाय असतो तो म्हणजे अवयव मागणाऱ्यांच्या प्रतिक्षा यादीमध्ये नाव नोंदवणे! प्रत्यारोपणासाठी अवयव न मिळाल्यामुळे दर दोन मिनिटाला एक भारतीय माणूस आपले प्राण गमावत असतो. अवयव मागणाऱ्यांच्या प्रतिक्षा यादीत जरी नाव नोंदवले तरी अवयव दान करणाऱ्यांची संख्या खूप कमी असल्यामुळे अवयव मिळत नाहीत. १९९५ सालापासून आतापर्यंत मेंदू बंद पडून मृत झालेल्या फक्त १४,००० व्यक्तिंनी अवयव दान केले आहेत. सामान्य भारतीय माणूस अवयव दान करायला राजी होतं नाही. कारण अवयव दान केल्यामुळे पुढील जन्मी दान केलेल्या अवयवाशिवाय जगावे लागेल, मृत व्यक्तीचे शरीर खराब होईल, ज्येष्ठ व्यक्तीचे अवयव दान करता येत नाहीत, मृत व्यक्तीच्या घरी सरकारी ऍम्ब्युलन्स अवयव काढून घ्यायला येते असे बरेच गैरसमज आहेत. मात्र ह्यातील काहीही खरं नाही. एखादी व्यक्ती मृत पावली तर त्याचे शरीर जाळून किंवा पुरून टाकतात. मरणारा व्यक्ती आपला देह इथेच सोडून जातो. त्याची राख होते. पुढील जन्म असेल तर ते शरीर तो सोबत नेत नाही. थोडक्यात त्याचे शरीर वाया जाते. अवयवदान किंवा देहदान केलं तर शरीराचा चांगला उपयोग होऊ शकतो. 

अवयव किंवा देहदानाला वयाची मर्यादा नाही. २४ तास, ७ दिवस केव्हाही दान स्वीकारले जाते, मात्र मृत्यूनंतर ठराविक अवधीत, शक्य तितक्या लवकर दान करावे लागते. त्यासाठी फक्त मृत व्यक्तीच्या जवळच्या नातलगांनी परवानगी द्यावी लागते. हाॅस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर असतानाच मेंदू बंद पडून मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे हाॅस्पिटलचे अधिकृत मार्गदर्शन व सेवा उपलब्ध असते. हृदय बंद पडून घरी मृत्यू आल्यास दानासाठी संबंधित संस्थेला किंवा व्यक्तीला कळवावे लागते (NGO). त्यांना कळवल्यानंतर त्वचादान व नेत्रदान स्वीकारण्यासाठी त्वचापेढी व नेत्रपेढीचे त्यांचे (Skin / Eye Bank) डॉक्टर घरी येऊन दान स्वीकारतात. मात्र दान दिल्यानंतर त्याबदल्यात पैसे मिळत नाहीत. हे दान निस्वार्थी मनाने करावे लागते. देहदानासाठी मृतदेह जवळील मेडिकल काॅलेजच्या एनाटॉमी डिपार्टमेंट मध्ये नेऊन द्यावा लागतो. (त्यासाठी काही मोजक्या मेडिकल काॅलेजकडून शववाहिनी पाठवली जाते). तसेच १८ वर्षांपुढील कोणतीही व्यक्ती दान करण्यासाठी आपलं नाव नोंदवू शकते. नाव नोंदवले नसेल तरीही हे दान करता येते. 

अवयव दान करण्यासाठी प्रत्येक अवयवाचे “शेल्फ लाईफ” ठरवलेले आहे. “शेल्फ लाईफ” म्हणजे माणूस मृत झाल्यानंतर त्याचे अवयव काढून गरजू व्यक्तीवर ठराविक तासात प्रत्यारोपित करण्याचा कालावधी. त्वचा आणि डोळे दान करायचे असतील तर मृत्यूनंतर ५ ते ६ तासात काढून घ्यावे लागतात. हे अवयव काढून घेताना मृत व्यक्तीचं एक थेंबही रक्त सांडत नाही. त्वचा दान केली असेल तर ती आग, विद्युत अपघातात त्वचा गमावलेल्या व्यक्तीला जीवघेण्या संसर्गापासून बचावासाठी उपयोगी पडू शकते. त्वचा दान केल्यानंतर ती पुढील ५ वर्षे जतन करून ठेवता येते. 

डोळे दान केल्यावर ते ४८ तासांमध्ये अंध व्यक्तीला देता येतात. दान केलेल्या डोळ्यांचे प्रत्यारोपण केल्यामुळे त्या व्यक्तीला दिसू लागते. हात दान केला असेल तर तो १२ तासांमध्ये गरजू व्यक्तीला द्यावा लागतो. अवयव किंवा देहदान करण्यासाठी मृत्यूचे कारण तपासले जाते. तसेच, गरजू व्यक्तीचा रक्तगट जुळून येणे इत्यादी गोष्टी तपासल्या जातात. सुदैवाने, विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की एका व्यक्तीचे अवयव दुसऱ्या व्यक्तीला लावण्यात फार अडचण येत नाही. 

देहदानासाठी १९४९ साली आणि अवयवदानसाठी १९९४ साली कायदा झाला. पण पुरेशी जनजागृती नसल्यामुळे फार कमी प्रमाणात दान दिले जाते. मुळातच मृत्यूवर फारशी चर्चा होत नाही. अशी चर्चा करणे अशुभ मानले जाते. आपोआपच मृत्यूनंतर इतरांच्या उपयोगी पडणाऱ्या अवयवांचं काय करायचं हा विचार मनात येणं कठीण असतं. 

लिव्हर, आतडी, स्वादुपिंड हे आपले अवयव आपला मेंदू बंद पडल्यानंतरही काम करू शकतात हे अनेकांना माहित नाही. जर जनजागृती झाली, मोठ्या प्रमाणावर दान झाले तर एकट्या नेत्रदानामुळे देशातील सर्व 

” कॉर्नियल अंध” व्यक्तींना दृष्टी मिळेल. ते हे सुंदर जग पाहू शकतील. 

मृत्यू दोन प्रकारे होतो. सामान्यपणे हृदय बंद पडून मृत्यू होतो. दुसरा प्रकार आहे मेंदू बंद पडून मृत्यू होणे. अवयवांना सतत रक्तपुरवठा लागतो. म्हणून हृदय बंद झाल्यानंतर काही अवयव निकामी होतात तर त्वचा, डोळे, हाडे हे अवयव कामी येऊ शकतात. हे अवयव मृत्यू झाल्यानंतर ५ तासांमध्ये काढून घ्यावे लागतात. त्वचेचे ३ थर असतात. त्वचा दान केली असेल तर मांडी व पाठीची त्वचा काढून घेतली जाते आणि त्यानंतर मृतदेह नातलगांकडे दिला जातो. ज्यांना अवयव दिले जातात त्यांची नोंद किंवा निवड सरकारी नियमानुसार होते. त्यात पारदर्शकता असते. 

मृत्यूनंतर संपूर्ण देह दान केला असेल तर रसायने वापरून हा देह ५ वर्षापर्यंत टिकवला जातो. एक देह डॉक्टर बनणाऱ्या १० विद्यार्थ्यांना उपयोगी पडतो. हे डॉक्टर दिवसाला किमान एका व्यक्तीचा जीव वाचवतात. 

४० वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत, ते सर्व मिळून १,२०,००० जणांचे प्राण वाचवू शकतात. म्हणजे मृत झाल्यानंतरही आपला देह इतक्या लोकांच्या उपयोगाला येतो! फक्त अपघातामुळे निधन पावलेल्या, किंवा पोस्टमॉर्टेम झालेल्या वा मृत्यूसमयी बेडसोर झालेल्या व्यक्तींचे मृतदेह आणि गँगरीन, हेपिटायटिस, एड्स, डेंगू, कोरोना इत्यादी कारणांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह देहदानासाठी स्वीकारले जात नाहीत. 

पुराणामध्ये दधिची ऋषींनी मृत्यूनंतर आपल्या अस्थी दान केल्याचा उल्लेख सापडतो. म्हणजे प्राचीन काळीही अवयवदानाची संकल्पना होती. कविवर्य बा.भ. बोरकर ह्यांनी असे म्हटले की मी आयुष्यभर मासे खाल्ले. माझा मृत्यू झाल्यावर, माझा देह समुद्रात फेकून द्यावा. जेणेकरून मासे मला खातील. अवयवदान किंवा देहदानाचा विचार आधीही झाला होता. आता विज्ञानाच्या प्रगतीमुळे तो शक्य होत आहे. ही एक मोठी चळवळ बनावी ह्यासाठी हा लेख पुढेही फॉरवर्ड करा. 

अवयवदान आणि देहदानासंबंधी आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही खालील क्रमांकावर फोन करू शकता, आपले नक्कीच स्वागत होईल. 

श्री आपटेकाका: + 91 9820078273 

सौ. नीला आपटे: 08291019157

लेखक : श्री निरेन आपटे

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments