?इंद्रधनुष्य?

☆ नदाव बन येहुदा … लेखक : श्री मनीष मोहिले ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

आजच व्हॉटसअप वरती एक पोस्ट वाचनात आली. इस्राएलचा चोवीस वर्षीय युवा गिर्यारोहक नदाव बन येहूदा ह्याने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट अर्थात सागरमाथा सर करायला फक्त तीनशे मीटर बाकी राहीले असताना देखील शिखर सर करण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि तरीही आज जगात ही बातमी वाचलेल्या सर्वांच्या कौतुकाचा विषय तो बनून राहिला असेल हे नि:संशय.

कारण नदावने दुसऱ्या एका गिर्यारोहकाचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या वैयक्तिक विक्रम, कीर्ती, उपलब्धि ह्या गोष्टीना दुय्यम स्थान देत मूल्य आणि मूल्य संस्कार ह्याना श्रेष्ठ मानत “योग्य” गोष्ट केली.

त्याच्याच शब्दात सांगायचे तर “एव्हरेस्ट वरील माझ्या चढाईच्या मार्गात मला दोन मृतदेह दिसले की जे गिर्यारोहक नुकतेच मृत झाले असावेत. मी ज्या दोराच्या आधाराने चढत होतो त्यालाच ते लटकलेले होते. अंगातील त्राण संपल्यामुळे आहे तिथेच स्वतःला anchor करून ते तिथे थांबले आणि कदाचित कोमात जाऊन मृत झाले. त्यांना पार करून सर्व पुढे जात होते. आणि नंतर मला तो दिसला – तुर्कस्तानचा आयदिन इरमाक. आम्ही खाली कॅम्पमध्ये भेटलो होतो आणि आता तो हेल्मेट नाही, ऑक्सिजन मास्क नाही, ग्लोव्हज नाहीत, अशा परिस्थितीत शेवट होण्याची वाट पहात होता. इतर काही गिर्यारोहक त्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेले. मात्र मी दुर्लक्ष करू शकलो नाही, आणि मी वैयक्तिक विक्रम आणि दुसऱ्या एका मनुष्याचे प्राण ह्यात दुसऱ्या गोष्टीची निवड केली.”

नदावने हा निर्णय घेतला खरा; पण तो अमलात आणणे हे तितकेच कठीण काम होते. बेशुद्ध पडलेल्या आयदिनला उचलून खाली आणणे कर्मकठीण होते, कारण त्याचे आणि स्वत:चे दोघांचे ओझे सांभाळत उतरायचे होते. आयदिन बेशुद्ध असल्यामुळे जास्त भारी वजनाचा भासत होता. अधूनमधून त्याला शुद्ध यायची, पण त्यात तो वेदना असह्य होऊन ओरडायचा. अशा परिस्थितीत खाली येताना नदावचा स्वतः चा ऑक्सिजन मास्क फाटला. ग्लोव्हज काढावे लागले. त्यामुळे त्याला स्वतः ला बोटांना हिमदंश झाला. वाटेत त्याला अजून एक मलेशियन गिर्यारोहक भेटला की जो सुद्धा मरण्याच्या मार्गावर होता. वर जाणाऱ्या काही climbers कडून नदावने त्या दोन अत्यवस्थ climbers साठी ऑक्सिजन सिलिंडर मिळवली आणि नऊ तासांच्या भगीरथ प्रयत्नानंतर त्या दोघांना घेऊन कॅम्पपर्यंत पोचण्यात तो यशस्वी झाला. तेथून हेलिकॉप्टरने त्यांना काठमांडू येथे नेऊन इस्पितळात दाखल केले आणि उपचार सुरू झाले. दोन जीव वाचवण्यात नदाव यशस्वी झाला.

जीवनात काही असे परीक्षेचे क्षण येतात जिथे तुम्ही कशा प्रकारचे मनुष्य आहात, तुमची मूल्य व्यवस्था कशी आहे आणि त्या मूल्यांसाठी तुम्ही किती मोठा त्याग करू शकता वा किंमत देऊ शकता हे स्वतः शीच नक्की करावं लागतं. अशा परीक्षेच्या क्षणी नदावने, एव्हरेस्ट सर करणारा सर्वात कमी वयाचा इस्रायली गिर्यारोहक ह्या सन्मान व कीर्तीचा त्याग करत मानवतेच्या सर्वोच्च मूल्याला प्राथमिकता दिली आणि जगासाठी एक धडा दिला. गिर्यारोहणाच्या धाडसी खेळातील अत्युच्च मूल्य ओळखून त्याप्रमाणे वागत एक अनोखे धैर्य दाखवले. 

एकीकडे मानसन्मान, वैयक्तिक महत्वाकांक्षेची पूर्तता, सर्वोच्च शिखर सर करण्याची वैयक्तिक स्वप्नपूर्ती हे सारे, आणि दुसरीकडे दुसऱ्या मनुष्याचा जीव वाचवण्याचा अशक्यप्राय प्रयत्न ज्यात वरील मानसन्मान, कीर्ती, स्वप्नपूर्ती, महत्त्वाकांक्षापूर्ती ह्या गोष्टींच्या त्यागावरोबरच एक अजून भयंकर शक्यता होती आणि ती म्हणजे स्वतः चा जीव गमावण्याची. पण नदाव नियतीने पुढे वाढून ठेवलेल्या अती कठीण परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि with flying colors he passed.

आज भले नदावला सागरमाथा सर करता आला नसेल. भविष्यात तो हे लक्ष्य गाठेल किंवा नाही गाठू शकणार. मात्र तो कायम स्वतः ला ताठ मानेने आरशात बघू शकेल, त्याच्या कुटुंबियांना, मित्रांना डोळ्याला डोळा भिडवून भेटू शकेल आणि दुसऱ्याचा जीव वाचवण्याचे जे अलौकिक समाधान आहे ते कायम त्याच्या उराशी असेल.

आज सागरमाथा सर न करता सुद्धा, “ नदाव बन येहुदा “ सर्व जगातील लोकांच्या मनात सर्वोच्च शिखरावर विराजमान झाला असेल ह्यात शंका नाही.

लेखक : श्री मनीष मोहिले

प्रस्तुती : माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments