श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “पुण्याचे वैभव महात्मा फुले मंडई…” – ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

पुण्याचे वैभव समजली जाणारी ‘ महात्मा फुले मंडई ‘ ही १४२ वर्षे पूर्ण होऊन १४३ व्या वर्षात पदार्पण करत आहे. 

इ. स. १८८० साली पुण्याची लोकसंख्या ९०,००० होती.  पुण्यात बंदिस्त जागेत एक मोठी मंडई उभी झाली पाहिजे, म्हणून सन १८८२ साली पुणे नगर पालिकेत एक ठराव झाला.  त्याला महात्मा फुले व चिपळूणकरांनी विरोध केला होता. पण बहुमताच्या जोरावर तो ठराव पास झाला. 

सरदार खासगीवाले यांची बाग-वजा ४ एकर जागा ही ४०,०००रुपयांना खरेदी केली गेली होती  व त्यावेळेचे बांधकाम अभियंते वासुदेव बापूजी कानिटकर यांनी केले होते. या कामासाठी ३ लक्ष रुपये खर्च आला होता. 

या कामासाठीचा  वाहतूक खर्च कमी व्हावा म्हणून पिंपरी चिंचवड येथून सिमेंट, चुना, बेसॉल्ट दगड आणले गेले होते. ह्यावरील खांबांवर ग्रीक पानांची नक्षी आहे. रोमन शैलीमध्ये हे बांधकाम केले गेले. ते अष्टकोनी असून मध्यभागी कळस आहे, जो ८० फूट उंचीचा आहे. 

१ ऑक्टोबर १८८६ रोजी  मुंबईचे गव्हर्नर जनरल रे यांच्या हस्ते या मंडईचे उद्घाटन झाले होते. त्यांच्याच नावावरून या मंडईला तेव्हा “ रे मार्केट “ हे नाव दिले गेले होते. पुढे सन १९३९/४० मध्ये आचार्य अत्रे यांनी तिचे “ महात्मा फुले मंडई “  असे नामकरण केले.

मंडईला ‘ मंडई विद्यापीठ ‘ हे नाव काकासाहेब गाडगीळ यांनी दिले,  कारण इथे खरेदी करायला येणारा असो की व्यवसाय करणारा असो,  कुणीच कधीच व्यवहारात चुकत नाही, अशी तेव्हा या मंडईची ख्याती होती. नंतर बऱ्याच वर्षांनी ही इमारत अपुरी पडायला लागल्याने या मूळ इमारतीच्या शेजारीच आणखी एक मोठी जागा घेऊन तिथेही भाजी बाजार भरायला सुरुवात झाली, ज्याला सुरुवातीला ‘ नवी मंडई ‘ असे म्हटले जात असे. 

या जागेला लागूनच असलेल्या एका प्रशस्त जागेत गेली अनेक वर्षे सार्वजनिक मंडई मंडळाचा गणपती ठेवला जातो. आणि श्री शारदेसह झोपाळ्यावर बसलेली ही मोठी गणेश मूर्ती हे अनेक पुणेकरांचे एक श्रद्धास्थान आहे, जिथे गणेशोत्सवात दर्शनासाठी पुणेकर प्रचंड गर्दी करतात. 

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments