सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

सीडी’ देशमुख !– रिझर्व्ह बॅंकेचे सर्वात तरुण पहिले भारतीय गव्हर्नर… लेखक : श्री संकेत कुलकर्णी ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

२ ऑक्टोबर. आज पुण्यतिथी आहे एका थोर माणसाची. ह्या माणसाचा जन्म १४ जानेवारी १८९६ चा – महाडजवळ ‘नाते’ गावात – हा माणूस १९१२ साली मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिक परिक्षेत पहिला आला (तीपण संस्कृतची ‘जगन्नाथ शंकरशेट’ शिष्यवृत्ती मिळवून!) – पुढे उच्च शिक्षणासाठी हा माणूस शिष्यवृत्ती घेऊन केंब्रिजला गेला – १९१५ साली त्याने वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, आणि भूगर्भशास्त्र ह्या तिन्ही विषयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत त्याची पदवी पूर्ण केली – १९१८ मध्ये वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी तो आयसीएस परिक्षेत चक्क पहिला आला – लोकमान्य टिळकांना भेटून त्यांच्याकडे ह्या माणसाने इच्छा व्यक्त केली की सरकारी नोकरी न करता त्याला देशकार्य करायची इच्छा आहे – पण लोकमान्यांनी त्याला सांगितले की ह्या नोकरीचा अनुभव स्वराज्यात कामी येईल – लोकमान्यांची ही विनंती शिरसावंद्य मानून ह्या माणसाने ही सरकारी नोकरी करायचे ठरवले – मध्य प्रांतात महसूल सचिव, वित्त सचिव अशी पदं भूषवली (ह्या पदांवर काम करणारा हा सर्वात तरूण आयसीएस अधिकारी होता!) – 

सुमारे २१ वर्ष ह्या माणसाने सरकारी नोकरी केली – १९३१ मध्ये गांधीजींबरोबर गोलमेज परिषदेला हा माणूस सचिव म्हणून गेला होता – १९४१ मध्ये तो रिझर्व्ह बॅंकेचा डेप्युटी गव्हर्नर बनला – ११ ऑगस्ट १९४३ रोजी बॅंकेचा गव्हर्नर जेम्स टेलरच्या मृत्यूनंतर हा माणूस रिझर्व्ह बॅंकेचा सर्वात तरूण आणि पहिला भारतीय गव्हर्नर बनला – दुसऱ्या महायुद्धाचे चटके जागतिक अर्थव्यवस्थेला बसत होते त्यावेळेस ह्या माणसाने योग्य उपाययोजना करून अर्थव्यवस्थेला योग्य प्रकारे हाताळले – ह्या कामाबद्दल २१ मार्च १९४४ रोजी ह्याला ब्रिटीश सरकारने ‘सर’ पदवीचा बहुमान दिला – बॅंकेच्या नोकरीत असतानाच भारतीय स्वातंत्र्याच्या संक्रमणकाळात हा माणूस व्हाईसरॉयज कौन्सिलवर वित्तप्रमुख म्हणून नेमला गेला – १९४९ मध्ये ह्या माणसाने बॅंकेच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पुन्हा इंग्लंडमध्ये जायची तयारी केली होती (कारण १९२० मध्येच त्याने रोझिना विलकॉक्सशी लग्न केले होते आणि त्यांना १९२२ साली मुलगीही झाली होती – तिचं नाव प्रिमरोझ) – पण नेहरूंनी पुन्हा विनंती केल्याने ह्या माणसाने रिझर्व्ह बॅंकेची धुरा पुन्हा सांभाळली – 

१९५२ साली हा माणूस कुलाबा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढला आणि जिंकलाही (कारण तो ‘कॉंग्रेस’चा सदस्य कधीच नव्हता!) – ह्या माणसाला नेहरूंनी अर्थमंत्री बनवलं – भाषावार प्रांतरचनेच्या मुद्द्यावरून नाराज होऊन ह्या माणसाने पुढे राजीनामा दिला – त्यानंतरही ‘विद्यापीठ अनुदान आयोग’ (युजीसी) चा पहिला अध्यक्ष म्हणून ह्याची नेमणूक झाली – शिक्षणक्षेत्रातही ह्या माणसाने भरपूर योगदान दिलं – आयुष्याच्या उत्तरार्धात हा माणूस हैदराबादला स्थायिक झाला आणि २ ऑक्टोबर १९८२ रोजी ह्याचं निधन झालं – हा माणूस म्हणजे सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख – उपाख्य ‘सीडी’ देशमुख !

त्यांच्या मृत्यूची फारशी दखलही भारतीय सरकारदरबारी घेतली गेली नाही. इतकी पदं भूषवलेल्या सीडींना साधी सरकारी मानवंदनाही मिळाली नाही. सीडींचे देशप्रेम मात्र निर्विवाद होते. आयुष्यभर देशासाठी ते झटले होते. आपली मूळ पाळंमुळं ते कधीच विसरले नव्हते. ह्याचं उदाहरण म्हणजे – सीडींनी इंग्लंडमध्ये एसेक्स परगण्यामध्ये ‘साऊथऐंड ऑन सी’ गावाजवळच्या ‘वेस्टक्लिफ ऑन सी’ गावात एक टुमदार बंगला बांधला होता आणि त्याचं नाव ठेवलं होतं ‘रोहा’ – कारण रायगड तालुक्यातलं रोहा हे सीडींचं मूळ गाव! रोह्याचं नाव इंग्लंडमध्ये ठेवणाऱ्या सीडींच्या जन्मगावात – महाडजवळ ‘नाते’ गावात – जिथे सीडींचा जन्म झाला होता – ते घर आजही बंद आणि पडझड झालेल्या अवस्थेत कसंबसं उभं आहे. देशभक्तांची आणि त्यांच्याशी निगडीत वास्तूंची अशी अनास्था करण्याची आपली सवयही तशी जुनीच आहे. हे चालायचंच !

आज ४१ व्या स्मृतीदिनी सर चिंतामणराव देशमुखांना सादर मानवंदना !

लेखक : श्री संकेत कुलकर्णी (लंडन)

(पहिला फोटो:  १९५२ साली एलिझाबेथ राणीच्या राज्यारोहणास गेलेल्या पाहुण्यात सीडी (सर्वात उजवीकडचे), इंग्रजी राजमुद्रा असणाऱ्या नोटेवर सीडींची गव्हर्नर म्हणून सही.) 

माहिती संकलन : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments