श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया ! — पहिली माळ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
मला पाहून ती थबकली….जागच्या जागी खिळून राहिली जणू ! अजून अंगाची हळदही न निघालेली ती….दोन्ही हातातील हिरव्या बांगड्या सुमधूर किणकिणताहेत. केसांमध्ये कुंकू अजूनही ताजंच दिसतं आहे. तळहातावरील मेहंदी जणू आज सकाळीच तर रेखली आहे…तळहातांचा वास घेतला तर मेहंदीच्या पानावर अजूनही झुलणारं तिचं मन दिसू लागेल… तिनं केसांत गजराही माळलेला आहे….तिच्या भोवती सुगंधाची पखरण करीत जाणारा. तिने माझ्याकडे पाहिलं आणि तिचं लक्ष आधी माझ्या कपाळाकडे आणि नंतर आपसूकच गळ्याकडे गेलं….बांगड्या फोडल्या गेल्या त्यावेळी हातांवर झालेल्या जखमांचे व्रण तिच्या नजरेतून सुटले नाहीत….आणि तिच्या चेह-यावरच्या रेषा सैरावैरा होऊन धावू लागल्या….एकमेकींत मिसळून गेल्या….एक अनामिक कल्लोळ माजला तिच्या चेह-यावर !
ती शब्दांतून काहीही बोलली नसली तरी तिची नजर उच्चरवाने विचारत होती….. ही अशी कशी माझ्या वाटेत येऊ शकते? खरं तर हिने असं माझ्यासारखीच्या समोर येऊच नये….उगाच अपशकुन होतो. मी सौभाग्यकांक्षिणी होते आणि आता सौभाग्यवती….सौभाग्याची अखंडित कांक्षा मनात बाळगून असणारी! सौभाग्याची सगळी लक्षणं अंगावर ल्यायलेली. कपाळी कुंकू, नाकात नथ, कानांत कुड्या, दोन्ही हातांत हिरवा चुडा, बांगड्यांच्या मध्ये सोन्याच्या बांगड्या, बोटांत अंगठ्या, केसांमध्ये कुंकवाची रेघ, पायांत जोडवी आणि गळ्यात मंगळसूत्र….त्याचा आणि माझा जीव एका सूत्रात बांधून ठेवणारं मंगळसूत्र. आज घटस्थापनेचा मुहूर्त….आणि त्यात हिचं येणं…काहीच मेळ लागत नाही !
मी म्हणाले…तुझ्या कपाळाचं कुंकू माझ्या कुंकवानं राखलंय…माझ्या कपाळीचं पुसून. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र कायम रहावं म्हणून तो माझं मंगळसूत्र तोडून निघून गेलाय मला शेवटचही न भेटता. कडेवर खेळणा-या लेकात आणि माझ्या पोटात वाढणा-या बाळात त्याचा जीव अडकला नसेल का? बहिणींच्या राख्या त्याला खुणावत नसतील का? दिवसभर कमाई करून दिवस मावळताच पाखरांसारखं घरट्यात येऊन सुखानं चार घास खाणं त्याला अशक्य थोडंच होतं..पण त्यानं निराळा मार्ग निवडला…हा मार्ग बरेचदा मरणाशी थांबतो.
पण मीच कशी पांढ-या कपाळाची आणि पांढ-या पायांची? माझं कपाळ म्हणजे जणू माळरान आहे जन्म-मरणातील संघर्षाचं. इथं मैलोन्मैल काहीही नजरेस पडत नाही. रस्त्यात चिटपाखरू नाही आणि सावलीही. झळा आणि विरहाच्या कळा. मनाचं रमणं आणि मरणं….एका अक्षराचा तर फेरफार ! मन थोडावेळ रमतं आणि बराच वेळ मरतं.
मी सुद्धा अशीच जात होते की सुवासिनींच्या मेळ्यांमध्ये. एकमेकींची सौभाग्यं अखंडित रहावीत म्हणून प्रत्येकीच्या कपाळी हरिद्रम-कुंकुम रेखीत होतेच की. मग आताच असं काय झालं? कपाळावरचा कुंकुम सूर्य मावळला म्हणून माझ्या वाटेला हा अंधार का? माझ्या कपाळी कुंकू नाही म्हणून का मी दुसरीला कुंकू लावायचं नाही? माझ्याही पोटी कान्हा जन्मलाय की….माझ्या पोटी त्यांची ही एक कायमची आठवण! मी कुणा गर्भार सुवासिनीची ओटी भरू शकत नाही.
कुणाच्या मरणावर माझा काय जोरा? मरणारा कुणाचा तरी मुलगा,भाऊ,मामा,काका इत्यादी इत्यादी असतोच ना? मग त्याच्या मरणानं मी एकटीच कशी विधवा होते? नव-याच्या आईचा धनी जगात असेल तर तिला कुंकवाचा अधिकार आणि जिने आपले कुंकू देशासाठी उधळले तिच्या कपाळावर फारतर काळ्या अबीराचा टिपका?
मूळात हा विचार कदाचित आपण बायकांनीच एकमेकींच्या माथी चिकटवलेला असावा, असं वाटतं. आता हा विचार खरवडून काढायची वेळ आलेली आहे…कपाळं रक्तबंबाळ होतील तरीही. मातृभूमीच्या रक्षणासाठी मरण पत्करणा-यांच्या आत्म्यांना अंतिमत: स्वर्ग देईन असं आश्वासन दिलंय भगवान श्रीकृष्णांनी. मग या आत्म्याच्या जीवलगांना देव अप्रतिष्ठेच्या,अपशकूनांच्या नरकात कसं ठेवील…विशेषत: त्याच्या पत्नीला? त्याच्या इतर नातलगांना हा शाप नाही बाधत मग जिने त्याचा संसार त्याच्या अनुपस्थितीत सांभाळला तिला वैधव्याच्या वेदना का? का जाणिव करून देतोय समाज तिला की तु सौभाग्याची नाहीस? सबंध समाजाचं सौभाग्य अबाधित राखण्यासाठी ज्याने सर्वोच्च बलिदान दिले त्याच्या सौभाग्याचं कुंकू असं मातीमोल करून टाकण्याचा अधिकार कुणी का घ्यावा आपल्या हाती?
उद्या पहिली माळ….जगदंबा उद्या युद्धाला आरंभ करेल…दानवांच्या रुधिराच्या थेंबांनी तिचं अवघं शरीर माखून जाईल आणि कपाळ रक्तिम..लाल दिसू लागेल. जगदंबा अखंड सौभाग्यवती आहे…कारण देवांना मृत्यूचा स्पर्श नसतो होत. मग तिच्या लेकींना तरी या पिवळ्या-लाल रंगाच्या रेखाटनाविना कशी ठेवेल ती?
जगदंबेची लढाई तर केंव्हाच संपून गेली….दानव धुळीस मिळवले तिने. तिच्या देहावरील रक्त केंव्हाच ओघळून जमिनीत मुरून गेलंय. आता आपण अनुभवतो तो स्मरणाचा आणि राक्षसांच्या मरणाचा सोहळा. नवरात्र हे प्रतीक आहे त्या रणाचं. आया-बायांनो,बहिणींनो,सौभाग्यवतींनो..आजच्या पहिल्या माळेला तुम्ही किमान माझ्यासारखीच्या भाळावर तरी हळदी-कुंकवाची दोन बोटं उठवलीत ना तर हुतात्म्यांचे आत्मे तृप्त होतील, सीमेवर लढणारी इतरांची सौभाग्यं आणखी प्राणपणानं झुंजतील. कारण आपल्या माघारी आपल्या नावाचं सौभाग्य पुसलं जाणार नाही ही जाणीव त्यांना प्रेरणा देत राहील.
स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवरायांनी जिजाऊ मांसाहेबांना शहाजीराजेसाहेबांच्या मागोमाग सती नाही जाऊ दिलं….त्यांच्या चितेच्या समोर हात पसरून उभं राहून त्यांनी आईसाहेबांना रोखून धरलं. राज्याभिषेकातल्या होमातील रक्षा जिजाऊंनी आपल्या कपाळी लावली. जिजाऊ राहिल्या म्हणूनच स्वराज्याच्या कपाळावर स्वातंत्र्याचा कुंकुमतिलक सजू शकला.शूर धुरंधराची स्वाभिमानी पत्नी आणि लाखो कपाळांवरील कुंकू टिकावं म्हणून जीवाचं रान करणा-या शूर सुपुत्राची माता म्हणून जिजाऊसाहेबांचा मान उभ्या महाराष्ट्राने राखला. असाच मान आजही हुतात्म्यांच्या पत्नींना,मातांना,लेकींना मिळावा हे मागणं फार नाही !
आज मी निर्धारानेच आले आहे आईच्या गाभा-यात…तुम्हां भरल्या कपाळांच्या पावलांवर पाऊल टाकून. .. पण आज मी ठरवलं….देवीसमोर जाऊन तिच्याकडे आणखी काहीतरी मागायचं….एक आठवण आहे सौभाग्याची माझ्या पदरात..त्यांचा लेक….त्यालाही मातृभूमीच्या सेवेत धाडायचं !
*************************************
रास्ते मे विधवा वीर-वधू को देख;
एक नववधु ठिठक गई !
यह विधवा मेरे रस्ते में;
क्यों आकर ऐसे अटक गई?
तुम यहां कहां चली ;आई हो भोली !
यह नववधुओं की तीज सखी;
यह नहीं अभागन की टोली !
यह सुनकर वह वीर पत्नी बोली
मुझको अपशकुनी मत समझो
मैं सहयोगिनी उसे सैनिक की;
जो मातृभूमि को चूम गया !
तुम सब का सावन बना रहे;
वो मेरा सावन भूल गया!
तुम सब की राखी और सुहाग;
वो मंगलसूत्र से जोड़ गया !
तुम सब की चूड़ी खनकाने;
वो मेरी चूड़ी तोड़ गया !
मेरी चुनरी के लाल रंग;
वो ऐसे चुरा गया!
उनकी सारी लालिमा को;
तुम्हारी चुनरी में सजा गया !
उनकी यादों की मंदिर में;
मैं आज सजने आई हूं !
मेरा बेटा भी सैनिक हो;
भगवान को मनाने आई हूं !
विधवा प्रथेला मूठमाती देण्याचा स्तुत्य उपक्रम काही सामाजिक संस्थांनी हाती घेतला आहे. सैनिक आणि त्यांच्या परिवारांसाठी कार्यरत असणा-या जयहिंद फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने हुतात्मा सैनिकांच्या शूर सौभाग्यवतींसाठी आणि इतर भगिनींसाठी विधवा प्रथेला मूठमाती देऊन वीरपत्नींना सन्मानित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यातीलच एका वीर सैनिक – वीर पत्नीची कहाणी वाचून हा लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. उपरोल्लेखित हिंदी कविता त्यांच्याच लेखात आहे. आज नवरात्रातली पहिली माळ….चला उजाड कपाळांवर सौभाग्याचा सूर्य रेखूया….जयहिंद !
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈