इंद्रधनुष्य
☆ भक्तीचे कर्ज — एक बोध कथा… ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆
सावता माळी हा शेती करून पोट भरणारा एक भक्त होता. त्याचा पांडुरंगावर व पांडुरंगाचा त्याच्यावर खूपच लोभ होता. सोलापूर जिल्ह्यातील अरणगावी तो रहात असे. सावता माळी अभंग रचनाही करीत असे. काशिबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत. आज फक्त 37 अभंगच ज्ञात आहेत आपल्याला त्यांचे. पण तेवढेही पुरेसे आहेत भक्ती शिकायला. त्या अभंगांचं सार हेच की ‘प्रचंड उत्कट चिंतन केलं की भगवंत भेटतो.
तर हा सावता माळी त्याच्या शेतात गव्हाचं पिक घेत असे. एके वर्षी भरपूर पिक आलं होतं. त्याच सुमारास पंढरपूरकडे जाणारी वारक-यांची दिंडी त्याच्या शेतावरून जात असताना त्याने थांबवुन त्यांना भोजन घातलं. सगळे भोजनाने खूश तर झाले. पण मनोमनी दु:खी होते कारण त्या वारक-यांच्या गावी दुष्काळाने पिकं नष्ट झालेली होती. तेव्हा त्यांनी सावता माळ्याला विनंती केली की आम्हाला थोडं-थोडं धान्य द्या ना घरी न्यायला. सावता माळ्याने बायकोला विचारलं तेव्हा बायको म्हणाली की यांना धान्य वाटून सगळंच संपेल धान्य. मग आपण वर्षभर काय खायचं. तेव्हा तो तिला जे म्हणाला त्याने तिच्या डोळ्यात पाणीच आले. तो म्हणाला,”हे बघ,जर निर्जीव जमिनीत एक दाणा पेरला तर पांडुरंग आपल्याला शेकडो दाणे देतो, तर त्याच्या जिवंत भक्तांच्या पोटात आपण दाणे पेरले तर तो आपल्याला उपाशी ठेवेल का ?”
सर्वांना आनंदाने धान्य वाटणा-या या दांपत्याला पहायला व हसायला सारा गाव लोटला होता. लोकं नको-नको ते बोलत होते. कुटाळक्या,चेष्टा,टोमणेगिरी.पण हे आपले शांत होते. सारं धान्य वाटून संपलं. दुस-या दिवशी पुन्हा शेत नांगरायला सुरवात केली सावत्याने. पण त्याच्याकडे पेरणी करायलाही धान्य शिल्लक नव्हते. गावात उसनं मागायला गेला तरी कुणी दिलं नाही. एकाने मस्करीने त्याला भरपूर कडू भोपळ्याच्या बिया दिल्या पेरायला व म्हणाला की हे कडू भोपळे सकाळ संध्याकाळ भाजी बनवुन वर्षभर रोज खायला तुला पुरतील. सावताने त्या बिया घेतल्या व खरोखर पेरणीला सुरवात केली. सारा गाव हसत होता कारण कडू भोपळा तर गुरं पण खात नाहीत ! त्यावर्षी सावताच्या शेतात एक माणूस आत बसेल एवढे मोठे मोठे कडु भोपळे लागले वेलींना. साऱ्यांना आश्चर्य वाटले की असं कधी होतं का ? पण मग त्यावरूनही ते सावताची मस्करी करीत असत रोजच. कडु भोपळ्यांची राखण करण्याची जरूरच नव्हती. कारण कोण चोरणार ते. पण तरीही रोज सावता शेतावर जाऊन राखण करत भजन करीत असे पांडुरंगाचं. थोडी कुठे मोल मजुरी करून दुस-यांच्या शेतावर,मग घरी येत असे. होता-होता लोक विचारू लागले की तू हे भोपळे एवढे कुठे साठवणार ? एके दिवशी भाजी करायला सावताने एक भोपळा घरी आणला. सावताच्या बायकोने भोपळा चिरला आणि काय आश्चर्य, संपूर्ण भोपळा तयार गव्हाच्या टपो-या दाण्यांनी भरलेला होता गच्च व ते सगळे गहू सांडले सारवलेल्या जमिनीवर. सावताचे डोळे पाणावले.”किती रे देवा तुला काळजी माझी.”
मग दुस-या दिवशी पण भोपळ्यातून गहू निघाले. मग मात्र ही बातमी सगळ्या गावात वाऱ्यासारखी पसरली. सगळे जण हा चमत्कार बघायला येऊ लागले.कुणी भोपळा चोरून नेऊन चिरला तर त्यात गहू निघत नसे. ही बातमी त्यावेळेच्या मुसलमान राजाच्या कानावर गेली व तो स्वत: आला व सावताला भोपळा चिरून दाखवायला सांगितला. भोपळ्यातले गहू बघून तो मुसलमान राजाही गहिवरला व नमस्कार करून म्हणाला,”धन्य तुमची भक्ती!”. यानंतर सावता अधिकच विरक्त झाला. आपलं सर्वस्व देवाला दिलं की देवावरच भक्तीचं कर्ज चढतं. भक्तांचा चरितार्थ चालवण्यासाठी देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी. आपण सगळे कडू भोपळेच असतो. कुणा सावताचं भजन वा ज्ञान कानावर पडलं की आपल्या हृदयात भक्तीचे गव्हाचे दाणे तयार होत असतात. हा सगळा ना नामाचा महिमा आहे. तुमच्या मना भावली पंढरी, पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी…!
परोपकाराचा एक दाणा पेरला तर त्याची कितीतरी कणसे परतफेड म्हणून परत मिळतात.
परमार्थ हा संसारात राहूनही करता येतो त्यासाठी काही सोडावे लागत नाही. फक्त तो करताना तो भगवंताचा आहे,जे होते ते त्याच्या इच्छेनुसार होते हे ध्यानात ठेवावे.
प्रत्येक काम हे त्याचेच असून ते त्याच्या नामातच करावे. मग आपल्या वाईट संचिताचे,मागील पापाचे कडू भोपळे सुध्दा सात्त्विक पौष्टिक गव्हाने भरुन जातील.
बोध : देव माझे चांगलेच करेल हा ठाम विश्वास मनी असू द्यावा !
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈