श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (सातवी माळ) – देणारे हात … ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
मी बाई ! माझं नावच बाई. बाईचं नाव बाईच ठेवायचं आईबापाला का बरं सुचलं असावं हे काही सांगता यायचं नाही मला. लग्न झालं तेव्हा तशी लहानच होते मी म्हणायचं. कारण काहीही समजत नव्हतं संसारातलं. पण ‘ संसार काय आपोआप होतच राहतो… परमार्थ करावा लागतो‘.. असं आई म्हणायची.
तसे मला दोन आईबाप. एक जन्म दिलेले आणि दुसरे पंढरीतले. सासरची शेती रग्गड आणि ती कसायला माणसं कमी पडायची. घामाच्या धारांनी शिवारं पिकायची.. पण माझं पोटपाणी पिकलंच नाही…पदरी एक तरी लेकरू घालायला पाहिजे होतं विठुरायानं. पण त्याच्या मनातलं जिथं रखुमाईला ओळखता येत नाही तिथं माझं म्हणजे .. पायीची वहाण पायी बरी अशातली गत. तक्रार नव्हती आणि मालकांनी सवत आणली तिचा दु:स्वासही नाही. देवाच्या दोन्ही भार्यांची एकमेकींत धुसफूस होत असेलही, मात्र आम्ही एका जीवाने राहिलो. पण दैवाने मालकांना भररस्त्यातून माघारी बोलावलं आणि आमच्या दोघींच्याही कपाळांवरचे सूर्य मावळून गेले. जमलं तसं रेटलं आयुष्य. राहता वाडा ऐसपैस होता आणि माझ्यासाठी वाडयातल्या आतल्या खोल्या पक्क्या करायचं हाती घेतलं होतं. पण ते राहून गेलं आणि आता तर मला त्यात काही राम वाटत नाही. विठ्ठलच नाही राऊळात तर ते राऊळ सजवायचं तरी कशाला?
सवयीने शेतात जात राहिले, धान्य घरात येऊन पडत राहिलं. पण या सर्वांत लक्ष कुठं लागतंय. ‘ देव भक्तालागी करू न दे संसार ‘असं तुकोबारायांनी म्हणून ठेवलं आहेच. त्यांना तरी कुठं नीट रमू दिलं होतं त्यानं. इथं तर माझा तुकोबा वैकुंठाला निघून गेला होता आणि कुणासाठी कमवायचं, कुणासाठी स्थावर जंगम माघारी ठेवून जायचं हा प्रश्न होताच. भाकरीच्या दुरडीतली जास्तीची भाकरी देतोच की आपण, मग ही जास्तीची कमाई आपला जीव आहे तोवर ज्याची त्याला दिलेली काय वाईट? पण द्यायची तरी कुणाला आणि का म्हणून? लोक देवाकडं धाव घेतात. देवाशिवाय माणसांनी दुसरीकडं कुठं जाऊच नये, असं मला सारखं वाटत राहतं. देवाला द्यायचं म्हणते खरं मी, पण देवाला कुठं कशाची कमी असते. देवस्थानं म्हणजे दवाखानेच की जणू. शरीराला बरं करणारे दवाखाने पुष्कळ असतील आणि असायला पाहिजेत. पण मनालाही बरं करायलाच पाहिजे की. म्हणून मी ठरवलं .. जमतील त्या देवस्थानांना काही न काही द्यायचं. आधी धान्य पाठवून देत होते. अक्कलकोटच्या स्वामी महाराजांच्या प्रसादासाठी लाखो लोक येतात कुठून कुठून. प्रसादाच्या स्वयंपाकाला आणखीन चांगली भांडी पाहिजेतच की…दिली मला जमली तेव्हढी. द्यायला लागले तसं देण्याची सवय वाढायला लागली. मंदीरांचे कळस झाले, रंगरंगोटी झाली, बांधकामं झाली, ती मी दिलेल्या खारीच्या वाटयातून झालेली या डोळ्यांनी पाहिली.
वय झालंय आता…देहाचा भरवसा नाही. कधी जाईल काही नेम नाही. सवतीच्या वाटचं तिचं तिला मिळालेलं आहेच की. तिचं गणगोत आहे, त्यांची ती कष्ट करून खाताहेत…..त्यांचा त्यांना संसार आहेच. माझ्या माघारी माझं उरेल त्यावरून कुणी तंडायला नको. म्हणून गंगेतून भरून घेतलेली ओंजळ, तहान भागल्यावर उरलेलं तीर्थ इकडं तिकडं शिंपडून न टाकता परत गंगामायला अर्पण केलेलं काय वाईट? आता माझा पैसा…माझ्या मालकानं माझ्यासाठी मागे ठेवलेला मला देवाला द्यावासा वाटतो त्यात कुणाचं काय जातं?
एकटीच्या पोटाला लागतीय तेवढी जमीन हातात ठेवली आणि बाकीची देऊन टाकली. पैशांतलं काही कळत नाही. पण नातू आहेत चांगले..कागदाची कामं करून देतात. नाहीतर एवढे लाखा-लाखाचे व्यवहार मला अंगठा बहादरणीला कसं जमलं असतं,तुम्हीच सांगा !
मी म्हणलं…मला माझ्या बापाला सोन्याचा करदोडा घालायचाय….आईला मंगळसूत्र घालायचंय. बाप म्हणजे विठोबा आणि आई म्हणजे रखुमाई माझी. होऊन गेलं हातून…हिशेब अठरा लाखावर गेलाय म्हणतात. कुणी म्हणतंय आजवर पन्नास लाख गेले असतील म्हातारीच्या हातून. जाईनात का !
हे फेसबुक का काय म्हणतात,त्यामुळे मी माहिती झाले सर्वांना. तशी खरं तर गरज नव्हती. देवानं मला एवढं भरभरून दिलं तेव्हा कुठं सर्वांना तो सांगत सुटला? लोकांना माहित नव्हतं तेच बरं होतं. कुणी म्हणतं या पैशांतून दुसरं बरंच काहीबाही करता आलं असतं. लाख तोंडं आणि त्यांची मतं. पण मी म्हणते माझ्या बुद्धीनुसार मला वाटलं ते मी केलं .. आणि आणिक करणार आहेच शेवटपर्यंत. मला काळ्या दगडातला विठोबा सगुण साकार वाटतो, त्याच काळ्या दगडातली गोरी रखुमाई आवडते…त्यांना सजवायला नको? मी काही कुठं बाहेर देवाला जात नाही…पण दुस-या मुलखातल्या देवांची श्रीमंती ऐकून आहे की मी. होऊ द्या की आपलेही देव ऐश्वर्यवान…अहो, पंढरीश…पंढरीचा राजाच आहे नव्हे का? राजासारखाच दिसला पाहिजे माझा बाप.
आता देवस्थानांनी भक्तांसाठी काय काय करायचं हे सांगायला जाणती माणसं आहेतच की जागोजाग. त्यांनी सांगावं आणि देवस्थानांनी ऐकावं म्हणजे झालं. माझ्यासारख्या अडाणी बाईचा हा अडाणी विचार. .. मी माझं माझ्या देवाला देते आहे…तो तुम्हांलाही देईलच.
देवाच्या दयेने माझे हात देणारे आहेत…आणि माझ्या देवाच्या हातात झोळी नाही…मी त्याच्या चरणाशी वाहते ते त्यानेच माझ्या हवाली केलेलं….देणा-याने देत रहावे !
(बाई लिंबा वाघे….मराठवाड्यातल्या एका खेड्यातली शेतकरी वृद्धा…मनाने, विचाराने, वर्तनाने देवभक्त. त्यांनी त्यांच्या पदरात असलेलं दान पुन्हा देवाच्या पायाशी ठेवलं. आपण त्यांना नमस्काराशिवाय काय देऊ शकतो. जुन्या पिढीच्या रक्तात अजूनही विठूचा अंश आहे…तो असाच कायम रहावा, देवस्थानांनी आणखी लोकाभिमुख व्हावं, अशी प्रार्थना त्या देवस्थानांच्या आराध्य देवतांकडे करूयात का? या नवरात्रात ही एक सातवी माळ अशी श्रीमंत ठरली.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈