डॉ गोपालकृष्ण गावडे
इंद्रधनुष्य
☆ पिंडी ते ब्रम्हांडी – ब्रम्ह ऊर्जा… भाग-१ ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆
प्रोटॉन-न्युट्रॉनने बनलेले अणुकेंद्रक आणि सभोवताली वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन मिळून एक अणू (Atom) तयार होतो. जसे, सर्वात लहान अणुमध्ये म्हणजे हायड्रोजनमध्ये अणूच्या केंद्रकात एक प्रोटॉन असतो आणि त्याच्याभोवती एक इलेक्ट्रॉन कक्षेमध्ये फिरत असतो. कुठलीही गोष्ट फिरवायला ऊर्जा लागते. म्हणजे प्रत्येक अणुमध्ये उर्जा असते. ही उर्जाच इलेक्ट्रॉन, न्युट्रॉन, प्रोटॉन वा स्वतः अणुचे वागणे (गुणधर्म) ठरवते. कुणाकडून काय कार्ये करून घ्यायची याबाबत ऊर्जेला ज्ञान असते. अशाप्रकारे प्रत्येक अणुमध्ये ठराविक ज्ञान साठवलेले असते.
एकाच प्रकारचे अणू एकत्र येवून एक पदार्थ बनतो. पदार्थाच्या घटक अणुमधील माहिती आणि ऊर्जेनुसार तो पदार्थ कसा वागेल हे ठरते. त्यानुसार त्या पदार्थाचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म ठरतात. वेगवेगळे अणू एकत्र येवून रेणू (Molecule) तयार होतात. एका प्रकारचे रेणु एकत्र येऊन जटिल पदार्थ तयार होतो. त्या जटिल पदार्थाचे गुणधर्मही त्यातील घटक रेणूमधील ऊर्जा ठरवते.
वेगवेगळे अणु-रेणू एकत्र येवून पेशीचा एक अवयव बनतो. शरीराच्या प्रत्येक पेशीला केंद्रक (nucleus), रायबोझोम, लायझोझोम, मायटोकोन्ड्रीया असे वेगवेगळे अवयव असतात. पेशीच्या प्रत्येक अवयवाचे कार्य तिच्या घटक अणु-रेणुमध्ये साठवलेली ऊर्जाच करत असते. पेशीच्या अनेक अवयवापासून एक पुर्ण पेशी बनते. पेशीचे गुणधर्म आणि कार्य तिच्या घटक अवयवांमध्ये साठवलेली उर्जा ठरवते.
अनेक पेशी एकत्र येवून समुद्रातील एखाद्या साध्या बहुपेशीय जीवाचे संपुर्ण शरीर तयार होते. वेगवेगळी कामे करणाऱ्या पेशी एकत्र येऊन उन्नत जीवाच्या शरीराचा एखादा अवयव तयार होतो. उदा- हृदय, फुफ्फुस, लिव्हर, किडनी, आतडे, इत्यादी. घटक पेशींच्या कार्यानुसार त्या अवयवाचे गुणधर्म आणि कार्य ठरलेले असते. उदा- हृदयाचे स्नायू आकुंचन प्रसरण पावून रक्त पंप करतात. त्यामुळे रक्ताभिसरणाचे कार्य घडते. फुफ्फुसांमध्ये हवेतील आणि रक्तातील आॕक्सिजन तसेच कार्बन डायऑक्साइड यातील आदलाबदल होण्याचे कार्य घडते.
अनेक अवयव एकत्र येवून एक जटील शरीर संस्था निर्माण होते. शरीर संस्थेच्या अवयवांमधील घटक पेशींमध्ये असणाऱ्या अणुरेणुंमध्ये साठवलेल्या ऊर्जेच्या माध्यमातून होणाऱ्या रासायनिक अभिक्रियांमुळे शरीर संस्था वेगवेगळे कार्य पार पाडत असते. उदा – तोंड, अन्न नलीका, जठर, लिव्हर, स्वादुपिंड, लहान आतडे, मोठे आतडे मिळून पचन संस्था तयार होते. पचनसंस्था अन्न पचनाचे कार्य करून शरीराला आवश्यक पोषणतत्वे शोषून घेते.
अनेक शरीर संस्था एकत्र येऊन मानवी शरीरासारखे एक महाजटील शरीर तयार होते. विविध शरीर संस्थांच्या कार्यांत समन्वय निर्माण होत त्यानुसार शरीराचे कार्य चालते. मेंदूतील पेशींमध्ये चालू असलेल्या रासायनिक उर्जेच्या खेळातून विद्युत करंट (Action potential) निर्माण होतात. ते मेंदूच्या पेशींमधून ठराविक मार्गाने फिरले की ठराविक विचार निर्माण होतात. विचारांमधून मानवी मन तयार होते. मनाचे कार्य या विचारांवर अवलंबून असतात.
अणु-रेणु एकत्र येवून मानवी शरीरासारखी एक किचकट मशीन तयार होते. कुठलेही मशीन उर्जेवर चालते. ATP सारख्या अणुरेणूंमध्ये साठवलेल्या उर्जेवर शरीररूपी मशीन चालते. अणूपासून संपूर्ण शरीरापर्यंत प्रत्येक घटकामध्ये नेमके कुठले कार्य घडवून आणायचे याचे ज्ञान असलेली ऊर्जा कार्यरत आहे. ब्रह्म म्हणजे ज्ञान. ज्ञानाने संपन्न या जीवनउर्जेला ब्रम्हउर्जा असे म्हणता येईल. ही ब्रम्हऊर्जाच आपल्या अस्तित्वाचे मूळ कारण आहे. आपले अस्तित्व या ज्ञानउर्जेमुळेच शक्य झाले आहे.
मानवी जीवनास कारणीभूत ठरणाऱ्या ब्रम्हउर्जेचे एक जटिल स्वरूप म्हणजेच अनुवंश. तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत होत असतो. मागील अनेक जन्मांपासून अनुवंश चालत आला आहे आणि पुढे अनेक जन्म तो चालत राहणार आहे. आता अनुवंश म्हणजे नक्की काय ते पाहू. मानवी शरीर ३७ लाख कोटी पेशींनी बनलेले आहे. प्रत्येक पेशीमध्ये एक केंद्रक (Nucleus) असते. या केंद्रकामध्ये ४६ गुणसुत्र म्हणजे chromosomes असतात. त्या ४६ गुणसुत्रांपैकी 23 गुणसुत्र आईकडून तर 23 वडिलांकडून आलेले असतात. हे गुणसुत्र म्हणजे दुसरे तिसरे काही नसून DNA चा एक बंडल असतो. हा DNA एक प्रकारचा दोरीसारखा लांब जटिल रेणू आहे. प्रत्येक मानवी पेशीमध्ये एकुण 2.2 मीटर लांबीचा DNA असतो. एवढा मोठा DNA सूक्ष्म पेशीच्या अतिसूक्ष्म केंद्रकात कसा मावणार? त्यासाठी DNA चा एक एक तुकडा स्वतःभोवती गुंडाळून गुंडाळून एका गुणसुत्राच्या रूपाने आकाराने अतिसूक्ष्म केला जातो. DNA चे ४६ बंडल म्हणजे आपले ४६ गुणसुत्र. ते इतकी कमी जागा व्यापतात की पेशीकेंद्रक या 10 micro meter इतक्या लहान जागेत सर्व ४६ गुणसुत्रे मावतात.
DNA मध्ये अनुवांशिक माहिती जीन्सच्या स्वरूपात साठवलेली असते. एक ठराविक प्रथिन (Protein) तयार करण्याची माहिती लांबलचक DNA च्या एका ठराविक तुकड्यात कोडच्या स्वरूपात साठवलेली असते. ठराविक प्रथिनं तयार करणाऱ्या DNA च्या त्या ठराविक तुकड्याला एक जनुक वा जीन असे म्हणतात. प्रत्येक जनुकामधील कोडनुसार एक प्रथिन तयार होते. ते प्रथिन शरीरात ठराविक काम करते. आपले संपूर्ण शरीर आणि त्याला नियंत्रित करणाऱ्या यंत्रणा या मुख्यत्वे प्रथिनांपासून बनलेल्या असतात. अशा प्रकारे DNA मधील अनुवंशाचे शरीर आणि मनाच्या कार्यावर पूर्ण नियंत्रण असते. मनुष्याचे दिसणे, विचार करणे, बोलणे, वागणे इत्यादी सर्व अनुवंशानुसार घडते. DNA पासून प्रथिने तयार होण्याची प्रक्रिया रसायनांमध्ये साठवलेल्या ब्रम्हउर्जेशिवाय शक्य नाही. पुढे प्रथिने ब्रम्हउर्जेचाच उपयोग करून शरीरातील विविध कार्य पार पाडतात.
— क्रमशः भाग पहिला
© डॉ गोपालकृष्ण गावडे
सिंहगड रोड, पुणे
मो 9766325050
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈