सुश्री सुलु साबणेजोशी
इंद्रधनुष्य
☆ “क्रौंचवध” – लेखिका – लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
काल देगलूरकर सरांच्या घरी एक अप्रतिम पेंटिंग पाहीले, त्यांना प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत ह्यांच्याकडून भेट म्हणून मिळालेले. कालपासून हे पेंटिंग डोक्यातून जात नाहीये. ज्या घटनेतून संस्कृतमधल्या पहिल्या छंदोबद्ध कवितेचा आणि पर्यायाने रामायणासारख्या महाकाव्याचा जन्म झाला, त्या क्रौंचवधाच्या घटनेचे हे चित्र, वासुदेव कामतांसारख्या सिद्धहस्त चित्रकाराच्या कुंचल्यातून उतरलेले.
मूळ कथा अशी आहे की गंगेची उपनदी असलेल्या तमसा नदीच्या तीरावर ऋषी वाल्मिकींचा आश्रम होता. एकदा भल्या पहाटे नित्याची आन्हिके उरकायला ऋषी वाल्मिकी भारद्वाज ह्या आपल्या शिष्यासह तमसातीरी आलेले असताना त्यांना प्रियाराधनात गुंग असलेली क्रौंच म्हणजे सारस पक्ष्यांची जोडी दिसली. हे पक्षी आयुष्यात एकदाच जोडीदार निवडतात आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहतात. त्यांचे प्रियाराधनाचे नृत्यही बघण्यासारखे असते. कितीतरी वेळ नर आणि मादी क्रौंच पक्षी स्वतःभोवती आणि एकमेकांभोवती गिरकी घेत नृत्य करत असतात. असेच नृत्य पहाटेच्या त्या धूसर, निळसर प्रकाशात ऋषी वाल्मिकींनी पाहिले असावे आणि त्या डौलदार, देखण्या नृत्याने ते क्षणभर हरवून गेले असावेत.
पण त्याच क्षणी कुणा व्याधाचा बाण वेगाने आला आणि एका क्रौंच पक्ष्याचा वेध घेऊन गेला. आपल्या जोडीदाराला पाय वर करून तडफडताना बघून मादी क्रौंच पक्षी करूण विलाप करू लागली. ते बघून ऋषी वाल्मिकींचे कवी हृदय द्रवले आणि त्यांच्या तोंडून अवचित शब्द उमटले,
‘मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम: शास्वती समा।
यत्क्रौंचमिथुनादेकमवधी: काममोहितम्।।’
म्हणजे, “हे निषाद, तुला कधीच प्रतिष्ठा लाभणार नाही, कारण तू ह्या काममोहित अश्या क्रौंच पक्ष्यांच्या जोडीची अकारण ताटातूट केली आहेस. ”
अतीव करुणेतून जन्मलेले हे संस्कृतमधले पहिले काव्य. स्वतःच्याच तोंडून निघालेला तो श्लोक ऐकून ऋषी वाल्मिकी भारद्वाजांना म्हणाले,
‘पादबद्धोक्षरसम: तन्त्रीलयसमन्वित:।
शोकार्तस्य प्रवृत्ते मे श्लोको भवतु नान्यथा।।’
म्हणजे शोकातून जन्मलेला हा श्लोक आहे, ज्याचे चार चरण आहेत, प्रत्येकात समान अक्षरे आहेत आणि एक नैसर्गिक छंदोबद्ध लय आहे.
करुणेतून जन्मलेले हे काव्य ऐकूनच साक्षात ब्रह्मदेवांनी वाल्मिकी मुनींना आदिकवी अशी पदवी दिली आणि त्यांना सांगितले की त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची कथा छंदोबद्ध काव्यातून जगाला सांगावी, जी जोपर्यंत या पृथ्वीतलावर नद्या वाहतील आणि पर्वत उभे असतील तोवर लोकांच्या मनातून नष्ट होणार नाही!
‘यावत् स्थास्यन्ति गिरय: लरितश्च महीतले।
तावद्रामायणकथा सोकेषु प्रचरिष्यति॥’
ह्या सुंदर आणि करुण कथेच्या त्या निर्णायक क्षणाचे हे चित्र आहे. पहाटेचा निळसर, धूसर, अस्फुट प्रकाश पसरलेला आहे, पण आभाळ अजून काळवंडलेलेच आहे. तमसेचा प्रवाहही निळसर, तलम, स्वप्नवत आहे. बाण वर्मी लागलेला क्रौंच पक्षी पाय वर करून पाण्यात पडलेला आहे, त्याच्या छातीवर रक्ताचा लालभडक डाग आहे, शेजारी मादी पक्षी चोच उघडून आक्रोश करते आहे. बाण लागल्यामुळे तडफडणाऱ्या पक्ष्याची पिसे वाऱ्यावर उडून गिरकी घेत खाली येत आहेत आणि ह्या विलक्षण करुण पार्श्वभूमीवर शुभ्र वस्त्रधारी तपस्वी ऋषी वाल्मिकी अर्घ्य देता देता थबकले आहेत. त्यांचा चेहरा वेदनेने विदीर्ण झालेला आहे. त्या वेदनेमागे सात्विक संतापही आहे आणि त्या भावनेतून जन्मलेला जगातला पहिला काव्यमय शोक श्लोकरूपात उमटत आहे असे हे चित्र!
ऋषी वाल्मीकींच्या चेहऱ्यावरची रेषा न रेषा बोलतेय. त्यांचे दुःख त्या पहाटेच्या निळसर आभाळाइतकेच विशाल आणि सर्वसमावेशक आहे. चित्रकार वासुदेव कामत हे त्यांच्या पोर्ट्रेट्ससाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. पोर्ट्रेट किंवा व्यक्तिचित्र काढताना केवळ ’हुबेहूब व्यक्तीसारखेच चित्र काढणे’ हा इतकाच निकष कधीच नसतो.
व्यक्तिचित्र काढताना ते तांत्रिकदृष्ट्या निर्दोष तर असावेच लागते, पण ज्या व्यक्तीचे चित्र ज्या क्षणी काढले गेले, त्या क्षणाची भावस्थिती अचूक टिपणे हे सोपे नसते आणि त्याहीपेक्षा महत्वाचा असतो तो त्या चित्राचा पाहणाऱ्या रसिकाच्या हृदयाला थेट भिडणारा अनुभवही, जो चित्र चांगले की अत्युत्तम हे ठरवतो. क्रौंचवधाच्या ह्या चित्रात हे तिन्ही घटक सुरेख जुळून आलेले आहेत. हे चित्र आणि त्याचा परिणाम दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतो आणि चित्र पाहणा-या माणसाचे मनही ह्या चित्रातल्या अपार करुणेने ओलावल्याशिवाय राहवत नाही.
लेखिका : सुश्री शेफाली वैद्य
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
मो – 9421053591
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈