? इंद्रधनुष्य ?

☆ मोती साबणाचा जन्म… – माहिती संकलक : आशिष फाटक ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

तेलात स्थिरावल्यावर टाटांनी साबणाकडे लक्ष द्यायचे ठरवलं. तोपर्यंत भारतात आपापल्या घरी बनवलेल्या साबणापासून म्हणजे बेसनपीठ व दुधाच्या मिश्रणातून अंघोळी व्हायच्या. अंगणात विहीरीकाठी अंघोळ करणारे कधीकधी पाठ घासायला नारळाची शेंडी वापरत होते. साबण म्हणून असे काही असते हे माहिती नव्हते. वास्तविक १८७९च्या काळात उत्तरेत मीरतच्या आसपास पहिला साबण बनल्याची नोंद सापडते. पण तो प्रसिध्द झाला नाही.

अंघोळीची अशी तऱ्हा होती तर कपड्यांच्या साबणाचाही काही विषय नव्हता. १८९५ ला कलकत्ता येथील बंदरात इंग्लंडहून पहिला साबणसाठा आपल्याकडे आला, ‘सनलाईट सोप’ नावाचा. त्यावर लिहिलं होतं,  

‘मेड इन इंग्लंड बाय लीव्हर ब्रदर्स ‘. हा सनलाईट फार लोकप्रिय झाला आणि ती कंपनीही. लीव्हर ब्रदर्स म्हणजे आताची हिन्दुस्थान लीव्हर, ही कंपनी भारतात आली सनलाईट या साबणावर स्वार होऊन !

या लीव्हर कंपनीने नंतर डालडा आणला – वनस्पती तूप आणि भारतात ऐसपैस हातपाय पसरले. टाटांनी जेंव्हा भारतीय बनावटीचा साबण बाजारात आणायचे ठरवले तेव्हा लीव्हर कंपनीने त्यांना कडवा विरोध केला. एक तर तो काळ स्वदेशीचा होता. टाटा आपल्या जातिवंत उद्यमशीलतेनं नवनवी आव्हानं पेलत होते. वीज आली होती, पोलाद निर्मितीसाठी शोध चालू होते. पहिले पंचतारांकित हाॅटेल ताजच्या रुपाने उभे होते. नागपुरात एम्प्रेस मिल होती तर मुंबईत स्वदेशी जोरात सुरु होती.

आता साबणातही टाटा उतरले तर आपले नुकसान होणार हा अंदाज त्यांना आला होता. टाटा दर्जाच्या बाबतीत तडजोड करणार नाही हेही ठाऊक होते. टाटांना आव्हान द्यायचे असेल तर ते फक्त किंमतीच्या पातळीवरच देता येईल हे ते जाणून होते. टाटांनाही याची कल्पना होती. त्यामुळं टाटांनी आपला साबण बाजारात आणला तो लीव्हरच्या किंमतीत.. १० रुपयांना १०० वड्या ! 

नावही ठरलं.. ‘५०१ बार’ ! या नावामागेही एक कथा आहे. टाटांना स्पर्धा होती लीव्हरची. लीव्हर ही कंपनी मूळची नेदरलँडसची. ती झाली ब्रिटिश. टाटांना आपल्या साबणात ब्रिटिश काहीच नको होतं. लीव्हरची स्पर्धा होती, फ्रान्समध्ये तयार होणाऱ्या साबणाची. आणि त्या फ्रेंच साबणाचं नाव होतं ‘५००’. ते कळाल्यावर कंपनीचे प्रमुख जाल नवरोजी म्हणाले… मग आपल्या साबणाचे नाव ५०१ ! कारण त्यांच्या रक्तातच स्वदेशी होतं, त्यांचे आजोबा होते दादाभाई नवरोजी…! 

बाजारात आल्यापासून या साबणाचा चांगला बोलबाला झाला. त्यामुळे लिव्हरने सनलाईटची किंमत ६ रुपयांना १०० अशी कमी केली ! त्यात त्यांचा तेलाचा खर्चही निघत नव्हता. टाटांच्या साबणाला अपशकुन करण्यासाठी त्यांची ही चाल होती. टाटा बधले नाहीत, किंमत कमी केली नाही, तीन महिन्यांनी लीव्हरने परत सनलाईटची किंमत पहिल्यासारखी केली. टाटा या स्पर्धेत तरले. या कंपनीने पुढे अंघोळीसाठी ‘हमाम’ … तर दिवाळीसाठी जो आजही मोठ्या उत्साहानं वापरला जातो… त्या ‘मोती’ साबणाची निर्मिती केली.. ! 

इतिहास विषय नावडीचा असला तरी देशाभिमान महत्वाचा , म्हणून दिवाळी निमित्त करून ही पोस्ट महत्त्वाची.. !!

माहिती संकलक :श्री  आशिष फाटक 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments