श्री सुहास रघुनाथ पंडित
इंद्रधनुष्य
☆ सामंजस्य – गदिमाडगुळकर आणि मजरुह_सुलतानपुरी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
मला कमालच वाटते देवाची! आणि दैवाचीही! एकाच वर्षी, एकाच महिन्यात, एकाच दिवशी… दोन बाळं जन्माला आली. एक महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात, तर दुसरं पार तिथे उत्तर प्रदेशातील निझामाबादेत. एकाचा जन्म हिंदू कुळातील… तर दुसर्याचा जन्म मुस्लिम घराण्यात. पण अखेर उमेदीच्या काळात, दोघेही कार्यरत झाले एकाच क्षेत्रात. एकाने मराठी चित्रपटसृष्टी गाजवून सोडली, तर दुसर्याने हिंदी चित्रपटसृष्टी दणाणून. एकाला मराठीचा ‘वाल्मीकी’ म्हणून ओळखत लोक, तर दुसर्याला इस जमानेका ‘गालिब’. खोर्याने गीतं लिहिली दोघांनीही, अगदी आपापल्या शेवटच्या श्वासापर्यंत. अर्थातच एक गेला ह्या इहलोकीची यात्रा संंपवून अंमळ लवकरच, त्या दुसर्याच्या मानाने.
एकाने लिहिलं…
‘तुझ्यावाचुनीही रात जात नाही
जवळी जरा ये हळू बोल काही
हात चांदण्यांचा घेई उशाला
अपराध माझा असा काय झाला ?’
तर दुसर्याने लिहिलं…
‘रातकली एक ख्वाब में आई
और गले का हार हुई
सुबह को जब हम नींद सें जागे
आँख तुम्ही सें चार हुई’
म्हणजे ही दोन गाणी अनुक्रमे ‘मुंबईचा जावई’ आणि, ‘बुढ्ढा मिल गया’ ह्या चित्रपटांतली. हे दोन्ही चित्रपट आले तेव्हा, ह्या दोघांनीही वयाची पन्नाशी ओलांडलेली. असे अगणित चमत्कार उतरलेयत ह्या दोघांच्या, सिद्धहस्त लेखणीतून… स्वतःच्या त्या त्या वेळच्या वयाला न जुमानता.
हेच बघा , आणिक एकेक वानगीदाखल…
‘सुटली वेणी, केस मोकळे
धूळ उडाली, भरले डोळे
काजळ गाली सहज ओघळे
या सार्याचा उद्या गोकुळी होइल अर्थ निराळा’
आणि
‘ये है रेशमी ज़ुल्फों का अँधेरा
न घबराइए
जहाँ तक महक है मेरे गेसुओं की
चले आइये…’
१ ऑक्टोबर रोजी ह्या दोघांचा जन्मदिन आहे… आणि दोघांचंही जन्मवर्ष एकच… १९१९.
# गदिमाडगुळकर
# मजरुह_सुलतानपुरी
आपापल्या आकाशात… स्वयंतेजाने तळपलेल्या ह्या दोन्ही सूर्यांना, आपल्या मनःपूर्वक अभिवादनाचं अर्ध्य.
प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈