श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ अवघ्या चाळीस दिवसांचा उशीर ☆ श्री संभाजी बबन गायके 

मी प्रथम. प्रेमाच्या माणसांसाठी मी यश. मी सुद्धा आपल्या भारताच्या तिन्ही सेनादलांच्या प्रमुख महामहिम राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना मोठ्या अभिमानाने कडक सल्यूट बजावला असता ३० नोव्हेंबरला सकाळी आमच्या पासिंग आऊट परेड मध्ये आणि अंतिम पग पार करून सैन्याधिकारी झालो असतो… पुढे आणखी प्रशिक्षणासाठी गेलो असतो, आणि काही वर्षांत देशाच्या सीमेवर जाऊन उभा राहिलो असतो… पण आता मी नाहीये त्या माझ्या बॅचमेटसच्या शिस्तबद्ध, रुबाबदार रांगेत. माझी जागा दुसरा कुणीतरी भरून काढेलच…. सैन्य थांबत नाही कुणासाठी.

बारा-पंधरा वर्षे हृदयात घट्ट रुतवून ठेवलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरायला केवळ चाळीसच दिवस उरलेले होते… आणि एवढ्यातच प्राणांचं पाखरू उडून गेलं..!

आईला मानलं पाहिजे माझ्या, आणि वडिलांनाही. दोघंही व्यवसायाने शिक्षक. मी एकुलता एक. पण मी लष्कराच्या वाटेने जायचं म्हणालो तेंव्हा त्यांनी नाही अडवलं मला. खेड्यात राहून शिकलो सुरुवातीला, आणि मग सैनिकी शाळेत जागा पटकावली. तसा मी काही फार बलदंड वगैरे नव्हतोच कधी, पण लढायला आणि सैनिकांचं नेतृत्व करायला आवश्यक असणारी मानसिक कणखरता, शास्त्र आणि शस्त्रांचं ज्ञान मात्र मी कष्टपूर्वक प्राप्त केलं होतं एन. डी. ए. मधल्या खडतर प्रशिक्षणात….. थोडीथोडकी नव्हेत तर तब्बल चार वर्षे.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पासिंग आऊट परेड व्हायची बातमी आई-बाबांना कळाली तेंव्हापासून त्यांनी एन.डी.ए. मध्ये ही परेड पाहण्याची, माझ्या खांद्यावर, छातीवर ऑफिसरची पदकं पाहण्याची स्वप्नं रंगवायला आरंभ केला होता….. फक्त महिना-सव्वा महिन्यांची तर प्रतिक्षा होती. दोघांच्या पगारातून रक्कम शिल्लक ठेवत ठेवत त्यांनी माझा आतापर्यंतचा खर्च भागवला होता. मी अभ्यासात हुशार होतोच, सहज इंजिनियर, डॉक्टर झालो असतोच म्हणा. पण मला लष्करी वर्दीचं आकर्षण लहानपणापासून… नव्हे, तसा माझा हट्टच होता… आणि आई-बाबांनीही या एकुलत्या एका लेकाचं मन नाही मोडवलं.

माझी एन.डी.ए. मध्ये निवड होणं ही किती मोठी गोष्ट असेल हे ज्यांनी प्रवेश परीक्षा, मुलाखत, वैद्यकीय चाचणी, ही दिव्यं पार पाडली असतील त्यांना जास्त चांगले समजू शकेल. आईबाबांना मात्र आपला मुलगा सैन्याधिकारी होणार याचीच मोठी अपूर्वाई होती. प्रशिक्षणास दाखल होताना बाबांनी फॉर्मवर सही करताना वाचलंही होतं…. ‘प्रशिक्षणादरम्यान काही झालं तर, अगदी मृत्यू झाला तरी ‘माजी लष्करी अधिकारी’ अशी ओळख आणि नुकसानभरपाई मिळणार नाही….’ तसा कायदाच आहे लष्कराचा. आता हा नियम मोठ्या लोकांनी तयार केला आहे आणि आजही हा नियम लागू आहे, म्हणजे त्यांनी काहीतरी विचार केला असेलच की!

त्या फॉर्मवर सही करताना बाबांनी आईकडे एकवार पाहिलंही होतं ओझरतं… पण असं काही आपल्या प्रथमबाबतीत होईल असा विचारही त्यांचं मन करू धजत नव्हतं. मूळात सैन्य म्हणजे मृत्यूची शक्यता हे समीकरण त्यांनाही माहीत होतंच… त्यांनी काळजावर दगड ठेवून मला एन.डी.ए. च्या पोलादी प्रवेशद्वारातून निरोप दिला…. “यश यशस्वी हो!” दिवस होता १८ एप्रिल,२०२१.

१९४९ मध्ये स्थापन झालेल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इतिहासात प्रशिक्षणार्थी सैन्याधिकाऱ्यांचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू होण्याच्या तीन घटना घडून गेल्या होत्या…. २ जुलै, २००९ रोजी कॅडेट नितिश गौर, ६ जानेवारी,२०१२ रोजी कॅडेट के. विघ्नेश, ३ फेब्रुवारी,२०१३ रोजी कॅडेट अजितेश अतुल गोएल हे ते तिघे. आता मी चौथा १८ नोव्हेंबर,२०२३ ला या तिघांना जॉईन झालो! लक्ष्य गाठण्याच्या सर्वांत जवळ येणाऱ्यांत मात्र मी प्रथम आलो…

केवळ सव्वा महिना! लष्करात गेलो असतो, लढलो असतो आणि वीरगतीस प्राप्त झालो असतो तर देहाचं सोनं झालं असतं आणि मुख्य म्हणजे आई-बाबांना माझ्या जाण्यानं दु:ख झालं असतं तसा अत्यंत अभिमानही वाटला असता! अर्थात आताही त्यांना माझा अभिमानच वाटत असेल… मी पूर्ण प्रयत्न केले याबद्दल. बाकी एकुलता एक लेक गमावण्याचं त्यांचं दु:ख इतर कुणी समजूही शकणार नाही, हेही खरेच. असो. ईश्वरेच्छा बलियेसी!

असंच काहीसं बोलला असता ना प्रथम ऊर्फ यश महाले जर त्याला आपल्याशी तो आपल्यातून निघून गेल्यानंतरही बोलता आले असते तर?

आजवर एकट्या एन.डी.ए. मधून सुमारे ६००० हजार प्रशिक्षणार्थ्यांपैकी सुमारे २.०६% प्रशिक्षणार्थी विविध वैद्यकीय कारणांनी पुढे प्रशिक्षण सुरू ठेवण्यापासून आणि अर्थातच अधिकारी बनण्यापासून वंचित राहिलेले आहेत. आणि ही गोष्ट अपरिहार्य सुद्धा आहेच… देशाच्या संरक्षणाचा प्रश्न आहे…. पण या मुलांचं पुढे काय होतं? हे फारसं कुणाला ठाऊक नाही असं दिसतं. ही मुलं साधी, सामान्य का असतात? लाखोंमधून शेलकी निवडून काढलेली असतात. त्यांचे पालक काळजावर दगड ठेवून त्यांना लष्करात धाडत असतात. लष्करात घेताना एकही व्यंग चालत नाही आणि तोच लेक आईला परत देताना धड दिला जाईल किंबहुना धडासह दिला जाईल, याची शाश्वती कुणासही देता येत नाही!

प्रशिक्षणादरम्यान उदभवलेल्या वैद्यकीय कारणांनी किंवा मृत्यू झाल्याने प्रशिक्षण पूर्ण झालेले नाही, सबब त्यांना माजी लष्करी कर्मचाऱ्याचा दर्जा देता येणार नाही, आणि अर्थातच माजी लष्करी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या पालकांना लागू होणारे आर्थिक लाभही देता येणार नाहीत… हे सकृतदर्शनी व्यावहारीकच वाटणे साहजिकच आहे…. पण थोडा अधिक विचार केला तर परिस्थिती भयावह आणि अत्यंत निराशाजनक आहे.. आणि मूळात समाजाला शोभणारी नाही.

ही तरणीताठी, बुद्धीमान, देशप्रेमी आणि धाडसी मुलं (आणि हल्ली मुलीही) देशासाठी मरणाच्या वाटेवर स्वत:हून चालायला निघतात…. ती काही स्वखुशीने जखमी होत नाहीत किंवा मरणही पावत नाहीत! जखमी होणाऱ्या या मुलांना देय असलेल्या रकमांचे आकडे पाहून काळजात कसंतरी होतं. विविध योजनांमधून रूपये साडे तीन हजार, रूपये सहा हजार नऊशे, सात लाख असे काहीसे आकडे आहेत हे… त्यात किती टक्के अपंगत्व हा भाग आहेच. शासकीय नोकऱ्यांमधील काही (विशेषत: निम्नस्तरावरील) पदांच्या भरतीत प्राधान्यही देतात! एवढं पुरेसं वाटतं आपल्या व्यवस्थेला. आणि ही व्यवस्था काही आजची नाही!

याच पार्श्वभूमीवर क्रिकेट खेळात बळी घेणाऱ्या आणि बळी जाणाऱ्या, धावा घेणाऱ्या क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या करमुक्त काहींना पाच लाख, काहींना सात-सात कोटी, मॅन ऑफ दी मॅचचे लाखभर रूपये, या रकमा नजरेत भरतात, यात नवल नाही. रणांगणावरील बळी आणि मैदानावरील बळी यात फरक असला पाहिजे.

शिवाय प्रशिक्षणात जखमी झालेल्यांना आयुष्यभर सोसावं लागणारं ‘दिव्यांगत्व’ हा तर निराळाच मुद्दा आहे. मृत प्रशिक्षणार्थ्यांच्या पालकांना काय देत असेल व्यवस्था हे ठाऊक नाही! असो.

गेल्या काही वर्षांत लोकसभेत आणि राज्यसभेत याबाबतीत तत्कालीन सरकारांना बिगरतारांकीत प्रश्न विचारण्यात आले होते. त्याची उत्तरेही दिली गेलीत. काही उपाययोजनाही केल्या गेल्या आहेत, असे समजते. पण त्या पुरेशा नाहीत असं समजायला वाव आहे.

आपल्या यश साठी आपण काही करू शकतो का? ही आर्थिक व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी व्यवस्थेला विनंतीपर पत्र, ईमेल, आवाहन करू शकतो. आपल्या प्रतिनिधींमार्फत आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवू शकतो.

महाराष्ट्र राज्यशासनही आहेच.

रस्ते अपघातात मरण पावलेल्यांच्या जवळच्या नातलगांना त्वरीत लाखो रूपयांची नुकसानभरपाई जाहीर केली जाऊन दिलीही जाते. यश महालेंच्या बाबतीत राज्य सरकारला असे काही करण्याचे सुचवू शकतो.

एक नागरीक म्हणून काही निधी उभारून यश अर्थात प्रथमचे यथोचित स्मारक उभारून, त्याच्या नावाने अकॅडमी स्थापन करून, उदयोन्मुख तरूणांना प्रशिक्षणासाठी आर्थिक साहाय्यासाठी आर्थिक तरतूद करता येईल. किंवा यांसारख्या अन्य सकारात्मक बाबींचा विचार करता येईल.

प्रथमच्या आईबाबांचे नुकसान मात्र आपण काहीकेल्या भरून देऊ शकणार नाही आहोत…. हे मान्य करतानाच आपण काहीतरी केले पाहिजे हे मात्र तितकेच खरे आहे…. कारण देशाला अशा यश आणि प्रथमची गरज कायमच भासणार आहे. यात आपली मुलं कधीच कमी पडणार नाहीत हे खरं असलं तरी आपण काय करणार आहोत… हेही महत्त्वाचे आहे.

दिवंगत Squadron Cadet Captain Pratham Mahale यांना भावपूर्ण श्रद्धांजली… जयहिंद सर ! 

(मी अनाधिकाराने वरील विचार मांडले आहेत.. व्यवस्थेविरोधी लेखन नाही…. पण काही सुचवू पाहणारे मात्र निश्चित आहे. आणि असा विचार असणारे अनेक लोक आहेत. त्यांनी एकत्र आले पाहिजे. लेखाच्या आरंभीचे लेखन मी यशच्या भूमिकेत जाऊन केले आहे. बाकी आपण सूज्ञ आहातच.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments