?इंद्रधनुष्य? 

☆ सारागढीची लढाई.. श्री राजेश खवले ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

जीवनाची लढाई जिंकण्‍यासाठी सारागढीच्‍या शिख सैनिकांप्रमाणे लढा ! 

सध्‍याच्‍या पाकिस्‍तानातील समाना पर्वतरांगेतील कोहाट जिल्‍हयातील सारागढी हे एक छोटेसे गाव होते. २० एप्रिल, १८९४ रोजी कर्नल जे कुक यांच्‍या अधिपत्‍याखाली ब्रिटीश सैन्‍यातील ३६ वी शीख रेजिमेंट निर्माण करण्‍यात आली. ऑगस्‍ट १८९७ मध्‍ये या शीख  रेजिमेंटच्‍या पाच कंपन्‍या ले.कर्नल जॉन हटन यांच्‍या अधिपत्‍याखाली उत्‍तर-पश्चिम प्रांत अर्थात खैबर-पश्‍तुनखॉ येथील समाना टेकडया, कुराग, संगर, सहटोपधार आणि सारागढी येथे हलविण्‍यात आल्‍या.

या भागात महाराजा रणजीतसिंग यांच्‍या कार्यकाळात बांधण्‍यात आलेल्‍या किल्‍यांची एक शृंखला होती. यामध्‍ये लोखार्टचा किल्‍ला आणि किल्‍ले गुलिस्‍तान हे अत्‍यंत महत्‍वपूर्ण होते. लोखार्टचा किल्‍ला हिंदुकुश पर्वतातील समाना डोंगररांगात, तर गुलिस्‍तान किल्‍ला सुलाईमान पर्वतरांगेत स्थित होता. या दोन किल्‍ल्‍यामधील अंतर फक्‍त काही मैल होते. हे किल्‍ले जवळ-जवळ असले तरी मध्‍ये उंचवटा असल्‍यामुळे एका किल्‍ल्‍यावरून दुसरा किल्‍ला दिसत नसे. दोन्‍ही किल्‍ल्‍यामध्‍ये संदेशवहन व्‍हावे म्‍हणून मधल्‍या उंचवट्यावर सारागढीची चौकी बांधण्‍यात आली होती. हेलीकोग्राफीच्‍या माध्‍यमातून हे संदेशवहन करण्‍यात येत असे. ग्रीकभाषेत ‘हेलीआस’ म्‍हणजे सूर्य. ‘ग्राफीन’ म्‍हणजे लिहिणे. हेली‍कोग्राफीमध्‍ये मोर्स कोडचा वापर करुन आरशाद्वारा सूर्यकिरणे परावर्तीत करुन संदेश पाठविला जात असे. ही सांकेतिक भाषा सॅम्‍युअल मोर्सने (१७९१-१८७२) शोधून काढली होती. मोर्स हा अमेरीकी चित्रकार आणि संशोधक होता.

सारागढीची चौकी उंच खडकावर बांधण्‍यात आली होती. तिच्‍याभोवती तटबंदी होती. हेलिकोग्राफी संदेशवहनाकरीता एक उंच मनोरादेखील बांधण्‍यात आला होता. या भागात अफगाण,  पश्‍तून, आफ्रीदी टोळया सक्रीय होत्‍या. ब्रिटीश सैन्‍यावर आणि चौक्‍यांवर त्‍या वारंवार हल्‍ले करत असत. १८९७ च्‍या सुमारास अफगाणांचे सार्वत्रिक उठाव या भागाकरीता नित्‍याचे झाले होते.

३ आणि ९ सप्‍टेंबर, १८९७ रोजी अफगाण  टोळयांनी किल्‍ले गुलिस्‍तान जिंकून घेण्‍याचा प्रयत्‍न केला. पण किल्‍ले लोखार्टमधील सैनिक किल्‍ले गुलिस्‍तानच्‍या मदतीला धावून गेले. त्‍यांनी अफगाण  टोळयांना हुसकावून लावले. लोखार्टचे सैनिक परत जातांना त्‍यांनी सारागढीची सुरक्षा मजबूत केली. तेथे एक हवालदार आणि २० सैनिक तैनात केले. हे सर्व शीख सैनिक होते.

१२ सप्‍टेंबर, १८९७ रोजी सुमारे १० हजार अफगाण -पश्‍तुनांनी सारागढीच्‍या चौकीवर हल्‍ला केला. यावेळी गुरुमुखसिंग नावाचा सैनिक हेलीकोग्राफ हाताळत होता. लोखार्ट किल्‍ल्‍यावर कर्नल हटन स्थित होता. गुरुमुखसिंहाने हेलीकोग्राफच्‍या सहाय्याने कर्नल हटनला हल्‍ल्‍याची बातमी कळविली. परंतु आपण तातडीने मदत करण्‍यास असमर्थ आहोत असा उलट संदेश हेलीकोग्राफीद्वारा हटनने पाठविला. आता सारागढीच्‍या त्‍या  २१ सैनिकांना लढणे किंवा शरण जावून चौकीचे दरवाजे खूले करून देणे असे दोनच पर्याय उपलब्‍ध होते. एक शीख सैनिक विरुध्‍द शत्रुचे ५०० सैनिक असा हा सामना होता. त्‍या २१ सैनिकांचा प्रमुख होता ‘हवालदार ईश्वरसिंह’.  त्‍याने आणि त्‍याच्‍या सहकारी सैनिकांनी रक्‍ताचा शेवटचा थेंब सांडेपावेतो लढण्‍याचा निर्धार केला.

अफगाणांनी सारागढीवर जोरदार गोळीबार सुरु केला. त्‍यात भगवानसिंह या सैनिकाला गोळी लागून तो गंभीररित्‍या जखमी झाला. अफगाणांचा नेता सारागढीतील शीख सैनिकांना सारखा ओरडून सांगत होता की, ” तुम्‍ही शरण या, चौकीचे दरवाजे उघडा तुम्‍हाला काहीही इजा होणार नाही.”  पण शीख सैनिक बधले नाहीत. हवालदार ईश्‍वरसिंहाने अतुलनीय शौर्याचा प्रत्‍यय आणून देत उर्वरीत सैनिकांना आतल्‍या तटबंदीतून लढायला पाठविले, आणि स्‍वतः पुढच्‍या तटबंदीवरून शत्रूवर ‘मार्टीनी-हेन्‍री’ रायफलीनी गोळया चालवायला सुरुवात केली. त्‍याने कित्‍येक अफगाणांना  ठार केले. चौकीच्‍या तटबंदीवरून होणारा मारा इतका तीव्र होता की, अफगाणांना सारागढीच्‍या तटापर्यंत पोहोचणे मुळीच जमत नव्‍हते.

क्रमशः….

श्री राजेश खवले 

संग्राहक : सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments