सुश्री सुलु साबणेजोशी
इंद्रधनुष्य
☆ “आईनस्टाईनचा जिना” – लेखक : राजेंद्र वैशंपायन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
हृषीकेश मुखर्जी या प्रतिभासंपन्न दिग्दर्शकाने 70 च्या दशकात एक अप्रतिम चित्रपट केला होता. त्या चित्रपटाचं नाव “बावर्ची”. एक प्रगल्भ प्राध्यापक ‘बावर्ची’ म्हणजे स्वयंपाकी बनून एका अशांतीने भरलेल्या कुटुंबात येतो आणि साध्या साध्या प्रसंगातून नातेसंबंधात प्रेम आणि कुटुंबात शांती आणि आनंद कसा निर्माण करता येतं, हे कथाबीज केंद्रस्थानी ठेवून बांधलेला तो अफलातून चित्रपट.
त्या चित्रपटात त्या बावर्चीच्या पात्राच्या तोंडी रवींद्रनाथ टागोर यांचं एक वाक्य दिलं आहे ते असं;
“It’s very simple to be happy but its very difficult to be simple”
हा चित्रपट पाहिला होता तेव्हा ते वाक्य मनाला भिडून गेलं होतं आणि ते कायम स्मरणात राहिलं. त्यावर थोडं चिंतन झालं होतं पण त्या वाक्यातील खरं गूज मात्र लक्षात आलं नव्हतं.
दोन तीन दिवसांपूर्वी गुगलवर काही शोधत असताना एक चित्र डोळ्यासमोर आलं. आईन्स्टाईनने बुद्धिमत्तेच्या पायऱ्या सांगितल्या आहेत त्यापासून तयार झालेला एक जिना त्या चित्रात दाखवलेला होता.
त्यातल्या पायऱ्या अश्या ….
सर्वात खालच्या पातळीवर;
Smart – हुशार
त्याच्या वरची पायरी:
Intelligent – बुद्धिमान
त्याच्या वरची पायरी;
Brilliant – तल्लख किंवा तरल
त्याच्या वरची पायरी;
Genius – प्रतिभाशाली
आणि त्याच्याही वरची आईन्स्टाईनने सांगितलेली पायरी म्हणजे
Simple – सहज
आईन्स्टाईनच्या या बुद्धिमत्तेच्या पायऱ्यांच्या जिन्याचं चित्र बघितलं आणि पू. रवींद्रनाथ टागोर यांच्या वाक्यामागचं गुह्य अचानक उमगलं. त्या वाक्याचा मराठीतील भावानुवाद करायचा तर तो असा होईल;
“आनंदी होणं खूप सोपं किंवा सहज असतं. पण सहज होणं अतिशय कठीण असतं.”
त्या वाक्याच्या गुह्यातील काही मुद्दे आइन्स्टाईनच्या जिन्याच्या संदर्भातून मला लक्षात आले.
पहिली गोष्ट ही की कुठल्याही विषयात सहजता मिळवणं ही कठीण गोष्ट आहे कारण ती मिळवण्यापूर्वी हुशार ते प्रतिभासंपन्न हा बुद्धिमत्तेच्या पायऱ्यांचा प्रवास खूप कठीण, कष्टसाध्य आहे जो अनेक तपं करत रहावा लागतो. त्यामुळे संगीत असो, साहित्य असो, इतर व्यवसाय असो, किंवा जीवनातील आनंदसाधना असो, या पायऱ्या साधण्याच्या दृष्टीने अथक प्रयत्न केल्याशिवाय ते साध्य होणार नाही आणि म्हणूनच एखाद्या विषयात ‘सहज’ ही पातळी गाठणं कठीण आहे.
दुसरा मुद्दा असा लक्षात आला की हुशार ते प्रतिभाशाली या पायऱ्या कष्टसाध्य आहेत. प्रयत्नांनी त्या साधल्या जाऊ शकतील पण सहजता मिळवायची असेल तर?
यावर चिंतन करताना असं लक्षात आलं की
” प्रतिभा जेव्हा भगवंताशी शरणागत होते, तेव्हा ती सहज होते “.
प्रतिभा मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांमागचा रजोगुणी अहंकार जेव्हा एका स्थितीला भागवंतापुढे शरणागत होऊन लयाला जाईल तेव्हा भगवंताच्या कृपेनेच सहजता येईल.
याचाच दुसरा कंगोरा असा की केवळ प्रयत्नांनी सहजता मिळणार नाही आणि प्रयत्नांशिवाय केवळ शरणगातीनेही सहजता मिळणार नाही. म्हणून खूप प्रयत्न केल्यानंतरही भागवंतापायी शरणागती नसेल तरीही चालणार नाही आणि प्रयत्न केल्याशिवाय नुसतंच शरणागत होऊनही चालायचं नाही. इतकंच नव्हे तर प्रयत्नांशिवाय जर मी शरणागत होण्याची भावना बाळगत असेन तर ती कोरडी शरणागती असेल, त्या शरणागतीतही सहजता नसेल.
यासाठी प्रयत्नांची परिसीमा गाठल्यावर, केवळ प्रयत्नांनी साधत नाही हे लक्षात आल्यावर, स्वाभाविकपणे घडणारी संपूर्ण शरणागती, यानेच केवळ सहजता प्राप्त होईल हेही लक्षात आलं.
या विचाराबरोबरच योगवासिष्ठ्य या अद्भुत ग्रंथात सांगितलेल्या प्रयत्नवादावरच्या काही सिद्धांतांचीही थोडीफार उकल झाली.
हा सगळा उहापोह मनात झाल्यावर एक मात्र झालं. आइन्स्टाईनच्या त्या जिन्यावर मी कुठे आहे हे जरी सांगता आलं नाही तरी कुठे जायचं आहे हे मला लक्षात आलं आहे यानेच अतीव समाधान अनुभवत आहे.
लेखक : राजेंद्र वैशंपायन
मो – ९३२३२ २७२७७
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
मो – 9421053591
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈