सौ कुंदा कुलकर्णी
इंद्रधनुष्य
☆ गणेशविद्या – भाग 1 – प्रा. अनिल गोरे ☆ प्रस्तुती – सौ कुंदा कुलकर्णी ☆
गणपतीने ज्या वर्णसंचातून महाभारत लिहिले असे मानतात त्या वर्णसंचात स्वर, व्यंजनांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आहे. त्या संचासाठी वेळोवेळी नवी चिन्हे निर्माण केली गेली. त्या चिन्हांच्या सध्याच्या संचाला देवनागरी लिपी म्हणतात. ही लिपी वेगाने तसेच उच्चारानुसार लिखाणासाठी अत्यंत सोयीची आहे.
यातील अ ते ज्ञ अक्षरे वळणदार, वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ० ते ९ अंक देखणे आहेत. कोणताही देवनागरी अंक लिहिताना सुरुवातीला टेकवलेली लेखणी अंक लिहून होईपर्यंत उचलावी लागत नाही. या लिपीतील चिन्हे १८ स्वर, ३३ व्यंजने व ३ संयुक्त व्यंजने यांचे प्रतिनिधित्व करतात.
५२ मुळाक्षरांच्या परस्पर संयोगाने जोडाक्षरे, बाराखड्यांच्या स्वरुपात लाखो स्वतंत्र अक्षरसमूह चिन्हे लिहिता येतात. भारतीय भाषांसाठी योजलेल्या लिप्या वगळता जगातील इतर अनेक लिप्यांमध्ये अशी संपन्नता नाही. गणपतीने म्हणजे देवाने ही लिपी नागरिकांसाठी बनविली या समजुतीने तिला देवनागरी लिपी म्हणतात.
ही समजूत कशी झाली याबाबत एक आख्यायिका प्रचलित आहे.
महर्षी व्यासांनी महाभारत लिहिण्यासाठी गणपतीला पाचारण केले. गणपतीने त्यांना एक अट घातली की, व्यासांनी महाभारत इतक्या सलगपणे सांगावे की, लिहिताना खंड पडू नये. व्यासांनी ही अट मान्य करतानाच एक अपेक्षा व्यक्त केली की, गणपतीने ध्वनीवर आधारित तसेच उच्चार आणि लेखन यात संपूर्ण सुसंगती असेल अशा वर्णसंचात लेखन करावे. गणपतीने महाभारत लेखन करताना असा नवा वर्णसंच निर्माण केला. उच्चार मुखातून बाहेर पडत असले तरी उच्चाराचा संबंध शरीरातील कोणत्या भागांशी आहे का याचा गणपतीने अगोदर वेध घेतला. वेगवेगळे ध्वनी उच्चारताना मानवी शरीरातील पाठीच्या वेगवेगळ्या मणक्यांत तसेच मुखात संवेदना जाणवतात असे गणपतीच्या लक्षात आले. प्रत्येक मणक्याशी अशा प्रकारे जोडल्या गेलेल्या प्रत्येक स्वतंत्र ध्वनीसाठी गणपतीने एक चिन्ह निर्माण केले. अशा प्रत्येक चिन्हाला एक वर्ण म्हणतात. मानवी मणक्यांची संख्या ३३ आहे म्हणूनच गणपतीने आरेखित केलेली मणक्यांशी संबंधित वर्ण चिन्हे देखील ३३ होती. या ३३ वर्णांनाच आपण सध्या व्यंजने म्हणतो. या व्यंजनांचा उच्चार होताना जीभ मुखात कोठे ना कोठे टेकते असे लक्षात आल्यामुळे व्यंजनांचे कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य असे पाच प्रकार गणपतीला आढळले. या शिवाय काही उच्चारांचा मणक्यांशी संबंध नसून मुखाशी असलेल्या संबंधातही एक वैशिष्ट्य आहे हे गणपतीच्या लक्षात आले. या उच्चारांच्या वेळेस जीभ मुखात कोठेही टेकत नाही असे गणपतीला आढळले. अशा वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण उच्चारांसाठी गणपतीने जी वेगळी चिन्हे निर्माण केली त्यांना आपण आता स्वर म्हणतो. हे स्वर १६ आहेत. गणपतीने अशा प्रकारे ३३ चिन्हे व्यंजनांसाठी आणि सोळा चिन्हे स्वरांसाठी निर्माण केली. या चिन्हांचे दृश्य रूप काळाच्या ओघात बदलत गेले. गणपतीने कल्पिलेल्या सर्व वर्णांसाठी त्यानेच आरेखित केलेल्या चिन्हांमध्ये अनेक वेळा बदल झाले आणि त्या ४९ चिन्हात पुढील काळात आणखी ३ चिन्हांची भर पडून सध्या आपण वापरत असलेल्या ५२ चिन्हांच्या सध्याच्या रूपाला आपण देवनागरी लिपी म्हणतो. वाचन आणि लेखन अधिक वेगाने होण्यासाठी गणपतीने या चिन्हांपैकी काही अर्धी आणि एक पूर्ण जोडून जोडाक्षर निर्मितीही केली. जोडाक्षर हे देवनागरी लिपीचे महत्वाचे वैशिष्ट्य असून ते अनेक भारतीय लिप्यांमध्ये आढळते. मानवी शरीरातील भागांशी उच्चारांच्या असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे मानवी बोलणे ९९.९९% प्रमाणात अचूक व नेमके लिहिणे देवनागरी लिपीतून जमते.
ही लिपी खरेच देवाधिदेव गणपतीने बनविली का? यावर आस्तिक, नास्तिकांचा वाद सुरु आहे, पण ही जगातील अत्यंत उपयुक्त लिप्यांपैकी एक महत्वाची लिपी आहे याबाबत दुमत नाही. ही लिपी जगातील बहुतेक सर्व भाषांमधील आशय उमटवण्यासाठी वापरता येते. सुमारे दोनशे भाषांमधून त्या प्रत्येक भाषेतील दहा हजारांपेक्षा अधिक लोक ही लिपी दैनंदिन स्वरूपात वापरतात.
क्रमशः….
ले : प्रा. अनिल गोरे
संग्राहक : कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
क्यू 17, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे
मो. 9527460290
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈