श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ बापाच्या काळजावरचा गोवर्धन ! – भाग – 1 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
वासुदेव दादाला शब्द दिला होता खरा…पण प्रत्यक्षात तो शब्द पाळण्याची वेळ आली तेंव्हा यशोदेच्या शेजारून तिला अलगद उचलताना हात प्रचंड थरथरू लागले!
पुरूषांचं काळीज पाषाणाचं असतं तसं माझंही असेल असा माझा समज होता. पण याच पाषाणातून कधी माया पाझरू लागली ते माझं मलाही समजलं नाही…होय माझ्या पोटी माया उपजली आहे!
आणि या पाझरानं आजच्या या भयाण रात्री महाप्रलयाचं रूप धारण केलं आहे. यमुनेच्या उरात जलप्रलय मावत नाहीये. तिला आणखी दोनचार काठ असते तरीही ते तिला अपुरेच पडले असते त्या रात्री. वीजांचा एरव्ही लपंडाव असतो पावसाच्या दिवसांत. पण आज त्या लपत नव्हत्या…आभाळात ठाण मांडून होत्या! एक चमकून गेली की तिच्या पावलावर पाऊल टाकून दुसरी वीज धरणीला काहीतरी सांगण्याच्या आवेगात आसमंत उजळून टाकीत होती. या दोन क्षणांमधल्या अवकाशातच काय ती अमावस्या तग धरून होती. अमावस्येला निसर्गाने जणू आज खोटं पाडण्याचा चंग बांधला होता. अमावस्या म्हणजे काळामिट्ट अंधार….पण आजच्या रात्री अंधाराने काळेपणाशी फारकत घेतली होती….जगाचं माहित नाही…पण मला तरी स्पष्ट दिसत होतं…सारं काही!
दूर मथुरेच्या प्रासादातले दिवे लुकलुकत होते. आणि तिथून जवळच असलेल्या कारागृहाच्या भिंतीवरच्या पहारेक-यांच्या हातातील मशाली लवलवत होत्या…काहीतरी गिळून टाकण्यासाठी. या कारागृहाने आजवर सात जीव गिळंकृत केले होतेच. त्याच्या भिंतींवर रक्ताचे डाग सदोदित ताजेच भासत असत. सुरूवातीपासून आठ जन्म मोजायचे की शेवटापासून मागे मोजत यायचे हा प्रश्न नियतीने कंसाच्या मनात भरवून दिला होता. पाप कोणताही धोका पत्करत नाही. धोका पत्करण्याचा मक्ता तर पुण्याने घेतलेला असतो. पापाला अनेक सल्ले मिळतात आणि पुण्याला सल्ल्याची आवश्यकताच नसते.!
आज देवकी गर्भारपणाच्या नवव्या महिन्यानंतरच्या नवव्या दिवसात गवताच्या गंजीच्या बिछाण्यावर
निजून आहे. आणि याची तिला सवय झालीये गेल्या सात वर्षांपासून. खरं तर ती राजकन्या. सोन्याचा पलंग आणि रेशमाची सेज तिच्या हक्काची होती. पण दैवगतीपुढे तिचाही नाईलाज होता. तिची कूस माध्यम होणार होती एका धर्मोत्थानाची. पण त्यासाठी तिला एक नव्हे, दोन नव्हे तर आठ दिव्यांतून जावे लागणार होते. पण कसं कुणास ठाऊक आज तिला प्रसुतीपूर्व कळा अशा जाणवतच नव्हत्या..आधीच्या खेपांना जाणवल्या होत्या तशा. आज अंगभर कुणीतरी चंदनाचा लेप लावल्यासारखं भासत होतं. रातराणी आज भलतीच बहरलेली असावी कारागृहाबाहेरची. पहारेकरी देत असलेले प्रहरांचे लोखंडी गोलकावरचे कर्णकर्कक्ष ठोके आज तसे मधुर भासत होते. घटिका समीप येऊ लागली होती. आज तो येणार..आठवा! त्याच्या आठवांनी आत्मा मोहरून गेला होता. पावसाची चिन्हं होती सभोवती आणि वा-यातून पावा ऐकू येऊ लागला होता.
यशोदेच्या दालनाबाहेर मी दुस-या प्रहारापासूनच येरझारा घालीत होतो, याचं सेविकांना आश्चर्य वाटत नव्हतं. या गोकुळाच्या राज्याला वारस नव्हता लाभलेला अजून. बलराम होता पण तो यशोदेचा नव्हता. वासुदेवाचा होता. आम्हांला आपलं बाळ असण्याचा कित्येक वर्षांनी योग आला होता. राजाला चैन कसे पडेल? त्यात हा पाऊस! एखाद्या अनाहूत पाहुण्यासारखा….घडणा-या सर्वच घटनांचा साक्षीदार होण्याचा प्रयत्न करणारा. तो जा म्हणता जाणार नाही!
मध्यरात्र जवळ येऊन उभी आहे सर्वांगी थरथरत. तिलाही जाणीव झालेली असेलच की तिच्या उदरातून उदय होऊ पाहणा-या विश्वाची. माझ्या महालाबाहेर पहा-यावर असणारे गोपसैनिकही आता पेंगळून गेले आहेत. दिवसभर गायी चारायला जाणारी आणि दिवेलागणीला गोकुळात येणारी माणसं ती. त्यांनाही प्रतिक्षा होती त्यांच्या राजाच्या भविष्याची. सुईणी तर दुपारपासूनच सज्ज होत्या. दासी आज त्यांच्या घरी जाणार नव्हत्या. कोणत्याही क्षणी जन्माचं कमलदल उमलेल ते सांगता येत नव्हतं. गोठ्यांतील गायींचाही आता डोळा लागलेला असावा कारण त्यांचं हंबरणं कानी येईनासं झालं होतं आणि त्यांच्या वासरांचे नाजूक आवाजही. पोटभर दूध पिऊन झोपली असतील ती लेकरं.
यशोदेला कळा सुरू होऊन आता तसा बराच उशीर झाला होता. ती प्रचंड अस्वस्थ होती पण तिच्या डोळ्यांत आज निराळीच चमक. अंग चटका बसावा इतकं उबदार लागत होतं. सुईणी सांगत होत्या तशी यशोदा कळा देत होती पण तिची सुटका काही होत नव्हती.
माझी एक नजर यशोदेच्या कक्षातून येणा-या आवाजाकडे तर एक नजर यमुनेपल्याडच्या काठाकडे खिळून राहिलेली होती. आज त्या काठावरून या गोकुळाच्या काठावर प्रत्यक्ष जगत्जीवनाचं आगमन होणार होतं. पण यमुना तर आज भलतीच उफाणलेली! तिला काय झालं असं एकाएकी. असे कित्येक पावसाळे पाहिले होते मी आजवर पण आजचा पाऊस आणि आजची यमुना…न भूतो! पण माझी ही अवस्था कुणाच्या ध्यानात येण्यासारखी परिस्थिती नव्हती. यशोदा तर भानावर असण्याचा प्रश्नच नव्हता. एका जीवाला जन्माला घालताना तिचा जन्म पणाला लागलेला होता.
कळा देऊन यशोदा क्लांत पहुडलेली….सुईणीच्या,दासींच्या पापण्या अगदीच जडावलेल्या होत्या. मानवी देहाच्या मर्यादा त्यांनाही लागू होत्या. त्या निद्रेच्या पांघरूणाखाली गडप झाल्या…तारका काळ्या ढगांनी व्यापून जाव्यात तशा. त्या रात्रीतील सर्वांत मोठी वीज कडाडली आणि इकडे यशोदा प्रसुत झाली….आणि लगोलग तिला बधिरतेने व्यापलं…ती स्थळ-काळाचे भान विसरून गेली. गायींसाठीच्या चा-याचं प्रचंड ओझं डोक्यावरून खाली उतरवून एखादी गवळण मटकन खाली बसावी तशी गत यशोदेची. बाळाच्या श्वासांचा स्पर्श गोकुळातल्या हवेला झाला आणि सर्वकाही तिच्या प्रभावाखाली आलं. मायेचा प्रहर सुरू झाला होता…गोकुळ भारावून गेलं होतं…निपचित पडलं होतं आणि माया गालातल्या गालात मंद स्मित हास्य करीत कक्षाच्या दरवाज्याकडे पहात होती.
मी लगबगीने आत शिरलो तसा माझ्या डोळ्यांवर प्रखर प्रकाश आला. डावा हात डोळ्यांवर उपडा ठेवीत ठेवीत मी यशोदेच्या पलंगापर्यंत पोहोचलो…ती निपचित झोपलेली…तिच्या चेह-यावर पौर्णिमेचं चांदणं.
मला आता थांबून चालणार नव्हतं. वासुदेव यमुना ओलांडून येतच असावा….मला यमुनातीरी पोहोचलं पाहिजे. आणि मी लगबगीनं बाळाच्या मानेखाली हात घातला आणि तिच्या डोळ्यांकडे लक्ष गेलं. कक्षातील दीप अजूनही तेवत होते. बाहेरचा थंड वारा गवाक्षांचे पडदे सारून आत घुसण्याचा प्रयत्न करीत होता. हे तर मुलीचे डोळे….माझ्या मुलीचे डोळे! डोळ्यांच्या मध्यभागी जणू सारी काळी यमुना जमा झालेली. आणि त्या दोन डोहांभोवती पांढरे स्वच्छ काठ. आता मात्र माझी नजर खिळून राहिली….मी सारे काही विसरून जातो की काय असं वाटू लागलं. आणि ठरलंही होतं अगदी असंच…मी सारं काही विसरून जाणार होतो नंतर.
मायेच्या पुरत्या अंमलाखाली जाण्याआधी तिला उचलली पाहिजे सत्वर असं एक मन सांगत होतं पण बापाचं काळीज….गोकुळाच्या वेशीवर असलेला सबंध गोवर्धन येऊन बसला होता काळजावर. आणि तो हलवायला अजून कृष्ण गोकुळात यायचा होता! तोपर्यंत हे ओझं मलाच साहावं लागणार होतं!
वासुदेवाला शब्द देताना किती सोपं सहज वाटलं होतं सारं! दैवाची योजनाच होती तशी. मथुरेत देवकीनंदन येतील आणि गोकुळात नंदनंदिनी. तो वासुदेव-देवकीचा आठवा तर ही माझी,नंद-यशोदाची पहिली! बाप होण्याची स्वप्नं पाहून डोळे आणि मन थकून गेलं होतं. यशोदा गर्भार राहिल्याचं समजताच मला आभाळ ठेंगणं झालेलं होतं. गाईला वासराशिवाय शोभा नाही आणि आईला लेकराशिवाय. शेजारच्या गोठ्यांतील गायींची वासरं पाहून इकडच्या गायी कासावीस झालेल्या पाहत होतो मी. आणि आता माझा मळा फुलणार होता…..मी आणि यशोदा..आमच्या दोघांच्या मनांची रानं अपत्यप्राप्तीच्या सुखधारांनी आबादानी होऊ पहात होती. स्वत:च्या शिवारात आता स्वत:ची बीजं अंकुरणार होती…ही भावना ज्याची त्यालाच समजावी अशी!
कंसाने सात कळ्या खुडून पायातळी चिरडल्या होत्या आणि आता फक्त एक कळी यायची होती वेलीवर. काटेरी कुंपणाआड वेल बंदिस्त होती. वा-यालाही आत जाण्यास कंसाची अनुमती घ्यावी लागत होती. देवकीच्या उदरातून अंकुरलेला जीव मोठा होऊन त्याला संपवणार होता म्हणून तो मोठा होऊच द्यायचा नाही असं साधं सरळ गणित त्याचं. योगायोगच म्हणावा की यशोदाही याचवेळी आई होणार होती. पण मीही बाप होणार होतो याचा मला विसरच पडून गेला होता म्हणा !
– क्रमशः भाग पहिला
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈