श्री मेघःशाम सोनवणे
इंद्रधनुष्य
☆ जो लौट के घर ना आए… – लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆
गेल्या महिन्यात आम्ही दीव-सोमनाथ-द्वारका अशी सहल करून आलो. कोणत्याही सहलीपूर्वी त्या-त्या ठिकाणांची थोडीफार माहिती वाचूनच आम्ही निघतो. त्यामुळे, दीवमध्ये भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. खुकरी या जहाजाचे स्मारक असल्याची माहिती मला नव्यानेच समजली.
डिसेंबर १९७१ च्या भारत-पाक युद्धात ‘आय.एन.एस. खुकरी’ हे जहाज बुडाले होते. त्या वेळी मी सातारा सैनिक शाळेत शिकत होतो. एके दिवशी, सकाळच्या असेंब्लीमध्ये आमचे प्राचार्य, लेफ्टनंट कर्नल पुरी यांनी आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी, सबलेफ्टनंट अशोक पाटील याला श्रद्धांजली वाहिली होती. ‘आय. एन.एस. खुकरी’ सोबतच जलसमाधी मिळून तो हुतात्मा झाल्याची कथा आमच्या एका सरांनी नंतर आम्हाला सांगितली होती. यंदाच्या सहलीनिमित्ताने या दुःखद घटनांची उजळणी तर झालीच, पण त्याबद्दलची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावी असेही मला वाटले.
१९५९ साली, भारतीय नौदलाने इंग्लंडकडून तीन पाणबुडीप्रतिरोधक ‘फ्रिगेट’ जहाजे विकत घेतली होती. खुकरी, कृपाण, आणि कुठार अशी नावे त्या जहाजांना देण्यात आली. शत्रूच्या पाणबुडीचा माग काढण्यासाठी वापरली जाणारी ‘सोनार’ यंत्रणा त्या जहाजांमध्ये बसवलेली होती. त्यामुळे, अडीच किलोमीटर परिघाच्या आत असलेल्या शत्रूच्या एखाद्या पाणबुडीचे नेमके ठिकाण निश्चित करून तिला उडवणे शक्य होते. पण त्या ‘सोनार’ यंत्रणेची २५०० मीटर ही क्षमता खूपच कमी होती. त्या काळी त्याहून अधिक पल्ल्याच्या ‘सोनार’ यंत्रणा उपलब्ध होत्या. भारताने इंग्लंडला विनंती केलीही होती की किमान मध्यम पल्ल्याची ‘सोनार’ यंत्रणा तरी आम्हाला दिली जावी. परंतु, इंग्लंडने साफ नकार दिला. त्यांचे म्हणणे होते की फक्त नाटो करार केलेल्या देशांनाच ती यंत्रणा ते देऊ शकत होते. भारत तटस्थ राष्ट्र असल्याने भारताला ती मिळू शकणार नव्हती. संरक्षण साधनांच्या बाबतीत आत्मनिर्भर असण्याचे महत्व तत्कालीन राज्यकर्त्यांना समजले असेल, किंवा नसेलही. परंतु, पुढे डिसेंबर १९७१ मध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने ते ठळकपणे अधोरेखित झाले.
२३ नोव्हेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने आणीबाणीची घोषणा केल्यानंतर भारत-पाक सीमेवर युद्धाचे ढग गोळा होऊ लागले. भारताची सशस्त्र दले तेंव्हापासूनच संपूर्णपणे सज्ज होती. पाकिस्तानी नौदलाचे मुख्यालय आणि पुष्कळशा युद्धनौका कराची बंदरामध्ये होत्या. त्यामुळे तिथे पाकिस्तानने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दीवजवळच्या ओखा बंदरापासून कराची बंदर खूप जवळ होते. तेथूनच कराची बंदरात होणाऱ्या सर्व हालचालींवर भारतीय नौदलाची बारीक नजर होती.
३ डिसेंबर १९७१ च्या संध्याकाळी पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध पुकारले. भारतीय नौदलानेही तातडीने ‘ऑपरेशन ट्रायडंट’ ही पूर्वनियोजित मोहीम हाती घेतली. ‘निःपात’, ‘निर्घात’ आणि ‘वीर’ नावाच्या तीन मिसाईल बोटी, सोबत ‘किलतान’ व ‘कच्छल’ नावाच्या दोन पाणबुडीप्रतिरोधक ‘कॉर्वेट’ बोटी, आणि ‘पोषाक’ नावाचे एक तेलवाहू जहाज, अशा सहा जहाजांच्या गटाने ४ डिसेंबरच्या रात्री कराची बंदरावर जबरदस्त हल्ला चढवला. पाकिस्तानी नौदलाची तीन मोठी जहाजे, व एक मालवाहू जहाज बुडाले आणि कराची बंदरात असलेला संपूर्ण तेलसाठा नष्ट झाला.
‘ऑपरेशन ट्रायडंट’ राबवणाऱ्या सहा बोटींच्या पाठीशी भारतीय नौदलाच्या पश्चिमी कमांडचे संपूर्ण आरमार समुद्रात सज्ज होते. परंतु, पाकिस्तानी नौदलाची ‘हंगोर’ नावाची एक पाणबुडी अरबी समुद्रात गुपचूप संचार करत होती. खरे पाहता, भारतीय जहाजांच्या हालचालींचा सुगावा लागताच ‘हंगोर’ ने पाकिस्तानी नौदलाला रेडिओवरून त्याची माहिती दिली होती. परंतु, त्या माहितीचा काहीही उपयोग होण्याच्या आतच भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन ट्रायडंट’ यशस्वीपणे राबवले होते.
पाकिस्तानी नौदलाच्या ‘हंगोर’ पाणबुडीने घाईघाईत पाठवलेला तो रेडिओ संदेश भारतीय नौदलानेही टिपला होता. त्यामुळे हे समजले होते की भारतीय किनाऱ्याजवळ शत्रूची एक पाणबुडी कार्यरत आहे. त्या पाणबुडीला शोधून नष्ट करण्यासाठी आय.एन.एस. ‘खुकरी’ व आय.एन.एस. ‘कृपाण’ ही जहाजे अरबी समुद्रात फिरत होती.
पाकिस्तानी नौदलाने १९६९ च्या सुमारास फ्रेंचांकडून तीन पाणबुड्या विकत घेतल्या होत्या. ‘हंगोर’ ही त्यापैकीच एक. ‘डॅफने’ क्लासच्या त्या अत्याधुनिक पाणबुड्यांमधील ‘सोनार’ यंत्रणेचा पल्ला होता २५००० मीटर, म्हणजेच ‘खुकरी’ आणि ‘कृपाण’ जहाजांमधल्या सोनार यंत्रणेच्या दहा पट! त्यामुळे, ‘खुकरी’ आणि ‘कृपाण’ जेंव्हा ‘हंगोर’च्या मागावर निघाल्या तेंव्हाच दैवाचे फासे उलटे पडायला सुरुवात झाली होती. ‘हंगोर’ ची शिकार करायला आलेली आपली दोन जहाजे नकळतपणे स्वतःच ‘हंगोर’ चे सावज बनलेली होती.
९ डिसेंबर १९७१च्या त्या काळरात्री, दोन्ही जहाजांच्या हालचाली शांतपणे टिपत ‘हंगोर’ पाण्याखाली दबा धरून बसलेली होती!
आपल्या दिशेने येत असलेली दोन्ही जहाजे भारतीय नौदलाच्या युद्धनौकाच असल्याची खात्री पटताच, ‘हंगोर’ने त्यांच्या दिशेने एकापाठोपाठ एक असे तीन टॉर्पेडो (पाण्याखालून मारा करणारे बॉम्ब) सोडले. पहिला टॉर्पेडो ‘कृपाण’च्या खालून निघून गेला, पण तो फुटलाच नाही.
आपल्या दिशेने कुठूनतरी टॉर्पेडो मारला गेल्याचे ‘खुकरी’ आणि ‘कृपाण’ च्या कप्तानांना समजले. परंतु, तो हल्ला करणाऱ्या पाणबुडीचे नेमके ठिकाण त्यांना कळायच्या आतच दुसऱ्या टॉर्पेडोने ‘खुकरी’च्या दारुगोळ्याच्या कोठाराचा वेध घेतला. एक जबरदस्त स्फोट होऊन ‘खुकरी’ दुभंगली. तिसरा टॉर्पेडो ‘कृपाण’ च्या दिशेने येत होता. परंतु, ‘कृपाण’ ने अचानक दिशा बदलून वेग वाढवल्यामुळे तिचे फारसे नुकसान झाले नाही.
‘खुकरी’ फुटताच, तिच्यासोबत आपल्या अनेक शूर सैनिकांना जलसमाधी मिळणार याचा अंदाज, ‘खुकरी’ चे सर्वेसर्वा, कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांना आला. अवघ्या काही मिनिटांचाच अवधी हातात होता. बोटीच्या आत कार्यरत असलेल्या अधिकारी व नौसैनिकांना आपला जीव वाचवण्यासाठी तो अवधी अत्यंत अपुरा होता. कॅप्टन मुल्ला जहाजाच्या सर्वात वरच्या भागात, म्हणजे ‘ब्रिज’वर होते. त्या कठीण परिस्थितीत धीरानेच, परंतु अतिशय तत्परतेने, जहाज सोडण्याचा आदेश ते रेडिओद्वारे सर्वांना देत होते. “जाओ, जाओ” हे त्यांचे रेडिओवरचे शब्द ‘हंगोर’च्या पाकिस्तानी रेडिओ ऑपरेटरने टिपले होते, असे पाकिस्तानी युद्ध अहवालातसुद्धा नमूद केलेले आहे.
जहाजाच्या ब्रिजवर असलेले दोन अधिकारी, लेफ्टनंट कुंदन मल आणि लेफ्टनंट मनू शर्मा यांच्या हाती स्वतः लाईफ जॅकेट कोंबून, कॅप्टन मुल्लांनी त्यांना अक्षरशः बाहेर ढकलले. कॅप्टन मुल्लांनीही त्यांच्यासोबत पाण्यात उडी घ्यावी असे लेफ्टनंट मनू शर्मा वारंवार सुचवत होते, परंतु कॅप्टन मुल्लांनी स्पष्ट नकार दिला.
काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत, तत्कालीन लेफ्टनंट मनू शर्मा यांनी ‘खुकरी’ च्या अखेरच्या दृश्याचे वर्णन केले आहे. आपण ते दृश्य जर आज डोळ्यासमोर आणले तर निश्चित आपल्या डोळ्यात पाणी उभे राहील, पण त्याचबरोबर आपली छाती अभिमानाने भरूनही येईल !
हळूहळू पाण्याखाली जात चाललेल्या ‘खुकरी’ च्या ब्रिजवर कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला शांतपणे उभे होते!
‘हाताखालचा शेवटचा नौसैनिक जोवर सुखरूप बाहेर पडत नाही तोवर कप्तानाने जहाज सोडायचे नाही’ हे नौदलाचे ब्रीद, कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला शब्दशः ‘जगले’ होते!
भारत सरकारने मरणोपरांत महावीर चक्र देऊन, कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांचा यथोचित सन्मान केला. आपल्या कप्तानाचा शेवटचा आदेश ऐकून ज्यांनी समुद्रात उडी घेतली असे ६७ जीव वाचले. कित्येकांना तो आदेश पाळण्याइतकीही सवड मिळाली नाही.
‘आय.एन.एस. खुकरी’ आणि कॅप्टन मुल्लांसोबत जलसमाधी घेतलेल्या १८ अधिकारी व १७६ नौसैनिकांची नावे दीव येथील ‘खुकरी स्मारका’वर सुवर्णाक्षरात लिहिलेली आहेत. त्यातच आमच्या शाळेचा सुपुत्र, सबलेफ्टनंट अशोक गुलाबराव पाटील याचेही नाव आहे. त्या सर्व वीरांना सलामी देऊनच मी धन्य झालो.
तुम्हीही कधी दीवला गेलात तर त्या वीरांपुढे नतमस्तक व्हायला विसरू नका !
लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)
मो 9422870294
प्रस्तुती – मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈