इंद्रधनुष्य
☆ सप्तशृंगीचे रूप : पुण्याची चतु:शृंगी ☆ संग्रहिका – सुश्री शैला मोडक ☆
भक्तांची अगाध श्रद्धा बघुन देव – दिकांना, स्व:स्थान सोडून भक्ताकडे धाव घेतली, यातीलच एक पौराणिक कथा म्हणजे पुणेनिवासीनी चतु:शृंगी ही देवी आहे.
इसवी सन ६१३ मध्ये पुणे येथे फक्त दहा-बारा घरे असल्याचा उल्लेख सापडतो. राष्ट्रकूट वंशातील कृष्ण राजा याने तयार केलेल्या दानपत्रामध्ये (इ.स. ७५८) या शहराचे नाव ‘पुण्य विषय’ असे असल्याचे आढळते. पुढे त्याचे ‘पुनक विषय’ झाले. आणि इ. स. ९९३ मध्ये ते ‘पुनवडी’ झाल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर ते पुणेश्वर मंदिरामुळे ‘पुणे’ असे झाले असावे. एकंदर पुणे नावविषयी अशा आख्यायिका आहेत.
चतु: शृंगी पुण्यात कशी आली ती कथा पुढे आहे.
नाशिक जवळच्या वणीचे म्हणजेच सप्तश्रुंगीदेवीचे पुण्यातील स्थान म्हणजे चतु:श्रुंगी. सप्तश्रुंगनिवासिनी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक व अनेकांची कुलस्वामिनी.
पुण्यात विद्यापीठ परिरसरात सेनापती बापट रस्त्यापासून सुमारे दीडशे फूट उंच चढून गेल्यावर चतु:शृंगी मातेचे विलोभनीय दर्शन होते. चतु:शृंगी माता स्वयंभू व जागृत असून ती नवसाला पावते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
या मंदिरासंदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते.
पेशव्यांचे पुण्यातील एक सावकार दुर्लभशेठ पीतांबरदास महाजन हे देवीचे परमभक्त होते. दरवर्षी ते नाशिकजवळील श्रीसप्तशृंगी गडावरील देवीच्या यात्रेस जात असत. कालमानाने ते अतिशय वृद्ध झाले व वारी चुकणार असे त्यांना वाटू लागले व ते अतिशय दु:खी झाले. तेव्हा श्रीसप्तशृंगी देवी त्यांच्या स्वप्नात आली व पुण्याच्या वायव्येस असलेल्या डोंगरावर आपण वास्तव्यास असल्याचे त्यांना सांगितले. त्याप्रमाणे त्यांना या डोंगरावर देवीचे स्वयंभू स्थान आढळले.परंतु वेळेआधीच दुर्लभशेठ देवीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले तेंव्हा देवी पूर्ण प्रकट झालेली नसून तीन हात व चेहेराच प्रकट झाल्याचे त्यांना आढळून आले. हे स्थान म्हणजेच चतु:श्रुंगी होय. अर्थातच या स्थानी दूर्लभशेठने मंदिर बांधले.
वणीची सप्तशृंगी येथे अवतरली सप्तशृंगी देवीच्या मंदिरापाशी डोंगराची सात शिखरे होती असे म्हणतात. आता तेथे चारच शिखरे दिसतात म्हणून या देवीला चतु:शृंगी’ हे नाव मिळाले
पुणे शहरातील नरपगीर गोसावी यांना देवी प्रसन्न झाल्यामुळे त्यांनी तेथे सभामंडप, पायऱ्या व विहीर बांधली.
हनुमान जयंती चैत्री पौर्णिमा शनिवार, पूर्वा नक्षत्र शके १६८७ हा देवीचा प्रकटदिन आहे. चैत्र पौर्णिमेचा हा विशेष दिवस देवीचा प्रकट दिन म्हणून दरवर्षी मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. मंदिराचा सभामंडप, धर्मशाळा, पाय-या, विहीर, रस्ते, दागदागिने हे सर्व भक्तांनी श्रद्धेने अर्पण केले आहे.
चतु:शृंगी मंदिराच्या परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून नवरात्रीत मोठी जत्रा भरत असे, ती कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालत असे.
पुण्यात उत्तर पेशवाईत दुर्लभशेठने नाणी पाडण्याचा म्हणजेच टाकसाळीचा मक्ता घेतला होता, तसेच नाशिकजवळही दूर्लभशेठची एक टाकसाळ होती. दूर्लभशेठने पुण्यात एक धर्मशाळा बांधली व तेथे कालियामर्दनाची मूर्ती स्थापन केली.
*लक्ष्मीरस्त्यावर सतरंजीवाला चौकानजीक ही मूर्ती आजही पाहायला मिळते. चतु:श्रुंगी हे पूर्वीपासून पुणेकरांचे श्रद्धास्थान राहिले आहे. नवरात्रात गावातून तालीमबाज नारळाचे तोरण घेऊन चतु:श्रुंगी येथे पहाटे पळत जात असत. आता तालीमबाज व पळत जाणे बाजूला पडले असले, तरी आजही पुण्याच्या पेठांमधून चतु:श्रुंगीला तोरण वाहण्याची प्रथा सुरू आहे.
चतु:श्रुंगीचे दुसरे एक मंदिर रविवार पेठेत आहे हे मात्र थोडक्याच जणांना माहित असेल. सुमारे २०० वर्षांपूर्वी किसनदास राजाराम यांनी येथे देवीची स्थापना केली व बढाई समाजाने मंदिर बांधले. येथे देवी तांदळा स्वरूप आहे. सुभानशा दर्ग्याच्या चौकातून गोविंद हलवाई चौकाकडे जाऊ लागले की उजव्या बाजूस हे मंदिर आहे.
अशी चतु:शृंगी देवीची पौराणिक कथा आहे.
संग्राहक : सुश्री शैला मोडक
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈