सौ. गौरी गाडेकर
इंद्रधनुष्य
☆ ‘अनंत अमुची ध्येयासक्ती…’ ☆ माहिती-प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆
अवघ्या ६५ वर्षांची विद्यार्थिनी — श्रीमती विनया नागराज
2018 च्या सप्टेंबर महिन्यात पुण्यातल्या सहकारनगर जवळच्या ICWA चॅप्टर क्लासमध्ये 64 वर्षांच्या एक आज्जीबाई एका वर्गात शिरल्या. तेव्हा वर्ग सुरू झाला होता. आणि समोर 20-21 वर्षांची मुलं त्यांच्या शिक्षिका आणि फळ्याकडे बघत होती. अचानक आज्जी दिसल्यावर पहिल्या बाकावर बसलेल्या मुलीला वाटलं, शिक्षिकेची आई किंवा नातेवाईक आली आहे. त्यांनी शिकवण्यात गुंग झालेल्या शिक्षिकेला तसं सांगितलंही. पण, आज्जीबाई उडालेली गंमत बघत शांतपणे त्या मुलीच्या शेजारी रिक्त असलेल्या बाकावर बसल्या. जमलेल्या 70-80 मुलांप्रमाणेच या आज्जीही ICWA या अवघड समजल्या जाणाऱ्या वाणिज्य अभ्यासक्रमाच्या पहिल्या कोर्सचा धडा गिरवणार होत्या.
आता 65 वर्षांच्या झालेल्या त्या आजी श्रीमती विनया नागराज यांनी काही तासांपूर्वीच मला तो सांगितला. विशेष म्हणजे या आजीनी गेल्याच आठवड्यात ICWAचा अभ्यासक्रम पहिल्या प्रयत्नात पूर्णही करून दाखवला आहे.
या अभ्यासक्रमाची यशस्वीतेची टक्केवारी 15 ते 20 इतकी असते. म्हणजे शंभरामध्ये फक्त 15 ते 20 मुलं परीक्षा पास होतात. सीएच्या खालोखाल कठीण अभ्यासक्रम तो मानला जातो. आणि त्यात विनया नागराज यांनी 59% गुण मिळवून बाजी मारली आहे.
‘मुलं चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत. नातू आता समजदार झाला आहे. मग अशावेळी फक्त टीव्ही बघत का वेळ घालवायचा. त्यापेक्षा कॉलेजनंतर जे करता आलं नाही ते स्वप्न का पूर्ण करू नये,’ असं म्हणत विनया यांनी आपला मागच्या दोन वर्षांचा काळ सत्कारणी लावला आहे.
‘मुलगी सीए असेल तर मुलगा मिळणार नाही’
विनया यांचं बालपण आधी कोल्हापूर आणि पुढे मुंबईत विले पार्ल्याला गेलं आहे. माध्यमिक शिक्षणक्रम म्हणजे तेव्हाची अकरावी त्यांनी उपजत हुशारीमुळे 14व्या वर्षीच पूर्ण केली. त्यानंतर बीकॉमही त्या मुंबईच्या डहाणूकर कॉलेजमधून 18 व्या वर्षी झाल्या.
— पण, ते वर्षं होतं 1974 मुंबई सारख्या ठिकाणीही मुली फारशा बाहेर दिसायच्या नाहीत. आणि कॉलेजमध्ये सुद्धा एखादी मुलींची रांग सोडली तर बाकी अख्खा वर्ग मुलांनीच भरलेला असायचा, असं विनया सांगतात. अशा परिस्थितीत मुलीला सीए व्हायचंय ही गोष्ट वडिलांना आणि घरी रुचणारी नव्हती. सीएच नाही तर मुलीने नोकरी करण्यालाही घरून विरोध होता. त्यामुळे विनया यांचं हे स्वप्न तेव्हा अपूर्णच राहिलं. पुढे काही कारणांनी एमकॉमची परीक्षाही त्यांना देता आली नाही.
तेवढ्यात लग्न झालं आणि दोन मुलांबरोबर प्रापंचिक जबाबदाऱ्याही वाढल्या. या धबडग्यात सीए व्हायचंय हे ही विनया विसरून गेल्या. त्यांची त्याबद्दल तक्रारही नव्हती. सासरच्या सहकार्याने त्यांनी बँक ऑफ बडोद्यात नोकरी मात्र मिळवली. आणि घर-संसार सांभाळत स्केल-टू ऑफिसर पर्यंत बढती मिळवली. अर्थात, या सगळ्यांत घरच्या ज्या जबाबदाऱ्या येत होत्या – घरची आजारपणं, कुणाचं दुखणं-खुपणं हीच त्यांच्यासाठी प्राधान्याची गोष्ट होती. अगदी घरातली गरज पाहून 2001 मध्ये त्यांनी या नोकरीतूनही स्वेच्छा निवृत्ती घेतली. बँकेत आणि घरातंही त्यांचं काम चोख होतं. करत असलेल्या कामात त्याही समाधानी होत्या.
पण, 2017 मध्ये त्यांचे पती वारले. दोन्ही मुलं सुमेध आणि सुकृत त्यांच्या त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आणि संसारात रमली होती. नातू नऊ वर्षांचा म्हणजे जाणत्या वयाचा होता. अशा वेळी निवृत्त माणसाने काय करावं? — असा विचार जेव्हा विनया यांनी केला तेव्हा त्यांना आठवलं, त्यांचं एकेकाळचं स्वप्न सीए होण्याचं. त्यांनी चौकशी केली वयोमर्यादा आणि आणि आताच्या अभ्यासक्रमाची. मग कळलं इतक्या वर्षांनी आर्टिकलशिप शिवाय सीए शक्य होणार नाही. पण, आयसीडब्ल्यूए म्हणजे सीएमए शक्य होईल आणि ते झाल्यावर सीए साठीही अर्ज करता येईल.
…. झालं. 64 व्या वर्षी विनया नागराज यांचं ध्येय निश्चित झालं. सीएमए करायचं.
…. 65 व्या वर्षी अभ्यास आणि ऑनलाईन परीक्षा
अभ्यास आणि त्यासाठी लागणारं व्यवस्थापन हे विनया यांच्या अंगातच आहे. मानसिक तयारीही होती. पण, 1974 मध्ये सोडलेलं शिक्षण 2018मध्ये पुन्हा सुरू करायचं हे थोडीच सोपं होतं. काळ बदलला होता, अभ्यासक्रम बदलला होता, अभ्यासाची तंत्रं बदलली होती बरोबरचे विद्यार्थी बदललेले होते. सगळं नवंच होतं. पण, इच्छा असेल तर मार्ग सापडतो, ही काही फक्त म्हण नाही आहे. ती प्रत्यक्षातही उतरवता येते, असा विश्वास त्यांनी बाळगला.
नवीन अभ्यासक्रमात संगणकाविषयी ज्ञान अत्यावश्यक होतं. एक अख्खा पेपरच त्यावर होता. विनया यांनी बँकेच्या नोकरीतही कधी फारसा संगणक वापरला नव्हता. जो वापरला तो लॅन नेटवर्कवर… लेजर बुकशी त्यांची दोस्ती. म्हणजे आता संगणक शिकणं आलं. आणि मग त्या बरोबरी सगळेच नवीन असलेले विषय प्रत्येक कोर्सला चार याप्रमाणे..
नवीन जगात तरुण मुलं अभ्यासासाठी कुठली साधनं वापरतात, कोणती नवीन पुस्तकं उपलब्ध आहेत, क्लासेस नेमके कसे भरतात, यातल्या कशाचाही गंध नव्हता. पण, प्रयत्न सोडायचे नव्हते.
अभ्यास सुरू केला. आणि आयसीडब्ल्यूए संस्थेकडून पुस्तकंही आली, त्यांच्याकडूनही एक एक माहिती कळत गेली. संगणक कोर्सचं प्रशिक्षणही संस्थेकडूनच आयोजित केलं जातं हे कळलं. अभ्यासक्रमाचे क्लासेस भरतात ही माहिती मिळाली. त्याप्रमाणे संगणक आणि चॅप्टर क्लास दोन्हीची सुरुवात झाली.
सुरुवातीला सांगितलेला प्रसंग म्हणजे त्यांच्या या सीएमए चॅप्टर क्लासचा पहिला दिवस.
क्लासची चौकशी करण्यासाठी त्या आपल्या सात वर्षांच्या नातवाला घेऊन गेल्या होत्या.
कारण, आताही सीएमए करतोय म्हणजे घर चालवण्यापेक्षा वेगळं काहीतरी करतोय, अशा अभिनिवेश नव्हताच त्यांचा. घर सांभाळून अभ्यासाचं वेळापत्रक सांभाळणं जमेल एवढाच त्यांचा आत्मविश्वास होता.
बँकेच्या नोकरीत आणि एरवी चार-चौघात वावरतानाही फारशा न बोलणाऱ्या विनया आता मात्र क्लासमधल्या लहान मुलं आणि शिक्षकांमध्ये चांगल्या बोलू लागल्या होत्या. शंका विचारत होत्या आणि शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरंही देत होत्या. मुलं जी गणितं कुलकुलेटर करत तीच त्यांच्याही आधी या तोंडी सोडवत. अभ्यासातही क्लासमधील 20 वर्षांच्या मुलांपेक्षा त्या काकणभर सरसच आहेत ही गोष्ट हळुहळू इतरांच्या लक्षात आली. आणि क्लासमधली सगळी मुलं त्यांची मित्र झाली. संगणक शिकवायला या मुलांची आणि घरी सून दिशा यांची मदत झाली.
सुरुवातीला दर सहामाहीला एकच कोर्स घेणाऱ्या विनया यांनी जानेवारी 2021 मध्ये उर्वरित दोन्ही ग्रुपची परीक्षा एकत्रच दिली. कोव्हिडमुळे 2020 साली परीक्षाच होऊ शकली नव्हती. परीक्षा एकत्र देण्याचा विश्वास त्यांना त्यांचे पुणे चॅप्टर क्लासचे शिक्षक आणि बरोबरच्या विद्यार्थ्यांनी दिला. विशेष म्हणजे सुरुवातील संगणकावर बसायला घाबरणाऱ्या विनया यांनी शेवटची परीक्षा कोव्हिड मुळे ऑनलाईन म्हणजे पूर्णपणे संगणकावर दिली. आणि फायनलला त्यांना 59% गुण मिळाले.
आता त्यांनी सीए साठीही प्रवेश घेतला आहे.
‘अनंत अमुची ध्येयासक्ती’..
मानसोपचारतज्ज्ञ शैलेश उमाटे यांना विनया नागराज यांचं उदाहरण समाजात सकारात्मक उर्जा निर्माण करणारं वाटतं. “अनेकदा आयुष्याच्या पूर्वार्धात अपूर्ण राहिलेल्या इच्छांमुळे मनुष्य उत्तरार्धात आसवं तरी गाळतो. किंवा आपलं स्वप्न मुलं पूर्ण करतील असं म्हणत स्वप्न दुसऱ्यांवर लादतो. पण, विनया यांनी निवडलेला मार्ग आगळा वेगळा आहे,” शैलेश उमाटे यांनी सांगितलं.
त्यांनी निवडलेल्या स्वकर्तृत्वाच्या मार्गामुळे विनया यांचं जगणं मानसशास्त्रातल्या परिपूर्णता (MATURITY) किंवा ज्ञानदायी (WISDOM) अवस्थेकडे जातं. आणि या जगण्यातून त्यांना आणि कुटुंबीयांनाही समाधान मिळतं, असं वर्णन उमाटे यांनी केलं आहे.
शिवाय 65व्या वर्षी शिक्षण घेतल्यानंतर आपलं ज्ञान इतरांमध्ये वाटण्याची उर्मीही विनया यांच्याकडे आहे याविषयीही शैलेश उमाटे यांनी बोट दाखवलं आहे.
“स्वत:चं शिक्षण पूर्ण करण्याचं ध्येय त्यांनी बाळगलं. ते पूर्ण केलं. पण, त्याच बरोबरीने इतरांना शिकवण्याची तयारी दाखवून त्यांनी आपलं ध्येयही व्यापक केलं आहे. त्यामुळे त्यांना मिळणारी सकारात्मक उर्जा खूप वरची आहे,” असं उमाटे यांनी बोलून दाखवलं.
माहिती प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈