श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

मधुराधिपती !!! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

मधमाशांनी फुलांच्या हृदयातून जणू अमृतच शोषलं आणि त्यांच्या जगण्यासाठी एकत्रित करून ठेवलं. मानवाला हा पदार्थ चाखायला मिळाला आणि त्याची चव त्याला क्षुधेच्या कल्लोळातही परमोच्च सुखाची अनुभूती देऊन गेली. या पदार्थाची गोडी शब्दाने वर्णन करणं खूप कठीण होतं. पण त्याला नाव तर दिलंच पाहिजे…मध !  हा मध म्हणजेच मधु…मूळच्या मेलिट शब्दापासून सुरूवात करून नंतर मेलिस आणि मेल आणि नंतर संस्कृतात मधु नाव प्राप्त झालेला पदार्थ. यापासून मधुर आणि माधुर्य शब्द ओघळले…मधाच्या पोळ्यातून गोडवा पाझरावा तसे ……  

गोडी केवळ जिभेलाच कळते असं नाही….गोडवा सबंध देहालाही तृप्तीचा अनुभव देऊ शकतो ! पण गोडवा, माधुर्य देणारा हा पदार्थ सर्वांगानं गोड असावा मात्र लागतो ! असं मधासारखं सर्वांगानं मधुर असणारं सबंध जगात कोण आहे? ……  

…. श्री वल्लभाचार्यांना श्रीकृष्ण तसे दिसले… मधासारखे …. नव्हे त्यांच्या आत्म्याच्या जिव्हेने श्रीकृष्ण भगवंताच्या सगुण साकार रुपाची गोडी अगदी सर्वांगानं भोगली…आणि त्यांचे शब्दही मधुर झाले !!!! 

आणि लेखणीतून उतरले एक सुंदर मधुराष्टकम् ……

अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम् ।

हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥१॥

*

वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरम् ।

चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥२॥

*

वेणुर्मधुरो रेणुर्मधुर: पाणिर्मधुर: पादौ मधुरौ ।

नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥३॥

*

गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरम् ।

रुपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥४॥

*

रणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरम् ।

वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥५॥

*

गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा ।

सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥६॥

*

गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरम् ।

दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥७॥

*

गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा ।

दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥८॥

*

इति श्रीमद्वल्लभाचार्यकृतं मधुराष्टकं सम्पूर्णम् ।

…… सगुण भक्तीचा गोडवा हाच की आपल्याला देह देणा-या देवाचा देह त्याला गोड भासतो…देवाच्या प्रत्येक कृतीत असणारा  माधुर्याचा दरवळ त्याला भावविभोर करतो. 

ज्याचं वर्णन करू पाहतो आहे ते स्वत:च माधुर्याचे जन्मदाते…निर्माते…स्वामी अर्थात अधिपती आहेत…मधुराधिपती ! 

ओठ ! .. कमळाच्या दोन पाकळ्या एकमेकींपासून विलग होण्यापूर्वी जशा एकमेकींवर अलगद स्थिरावलेल्या असतात ना अगदी तसेच ओठ…मधुर ! हे ओठ जेंव्हा त्या बासरीवर विसावतात ना तेंव्हा त्यातून निघणारा उच्छवासाचा हुंकार अतिगोड…कानांना पुरतं तृप्त करून पुढे शरीरभर पसरत जाणारा. .. …. आणि हे ओठ ज्या मुखकमलावर विराजमान आहेत ते मुख तर मधुर आहेच….किती गोडवा आहे त्या सबंध मुखावर ! …. आणि या मुखावरचे ते दोन नेत्रद्वय….मधुर आहेत…अपार माया स्रवणारे…पाहणा-याच्या डोळ्यांत नवी सृष्टी जागवणारे. सगळंच मधुरच आहे की माझ्या या देवाचं ! 

आणि ओठ,डोळे एकमेकांच्या हातात हात घालून त्या मुखावर ज्याची गोड पखरण करतात ते हास्य तर माधुर्याची परिसीमाच ! 

मग हृदय ते कसं असेल….मधुरच असणार ना? देवकीच्या गर्भात आकाराला आलेल्या आणि यशोदा नावाच्या प्रेमाच्या झाडाखाली वयाचा उंबरठा ओलांडून वाढत असलेल्या या कृष्णदेहातलं हृदय तर जणू मधाचं पोळं..गाभाच मधुर !   

या माधवाचं ..  या मधुसूदनाचं चालणं आणि त्या चालण्याची गती किती गोड आहे…या गतीमध्ये एक मार्दव भरून उरलं आहे…त्याच्या चरणांखालची माती कस्तुरीचं लेणं लेऊन मंद घमघमत असावी….भक्त हीच माती कपाळी रेखातात ती काय विनाकारण? 

मधुर ओठांतून शब्दांच्या मोगरकळ्या वातावरणात अवतरतात त्या अर्थातच गोडव्याची शाल पांघरून.. . देवाचं चरित्र तर काय वर्णावं…भगवंतांच्या जगण्यातला एकेक क्षण मधुर चरित्र आणि चारित्र्याचं मुर्तिमंत दर्शन… त्यांनी देहावर पांघरलेल्या वस्त्रातील धागे किती दैववान असतील. त्या धाग्यांनी त्या पीतरंगी वस्त्राला..पीतांबराला जणू गोडव्यात न्हाऊ घातलं आहे. 

भगवंतांनी कोणतीही हालचाल केली तरी ती गोडच भासते, त्यांचं चालणं आणि पावलं उमटवीत विहार करणं मधुर आहे. स्वरांच्या आवर्तनात स्वत:च गुरफटून जाणारी बांसुरी मधुर असण्यात आश्चर्य ते काय? 

…. देवाचे पाय पाहिलेत? त्यांवर कपाळ टेकवताना जवळून पहा…गोड आहेत. आणि हात? हा गोड हात आपल्या मस्तकावर असावा असं स्वप्न असतं साधकांचं…गोड आशीर्वाद देण्यासाठी उभारलेले ते हात…मधुर आहेत. 

श्रीकृष्ण नर्तन करतात तेंव्हा धरा मोहरून जाते …  त्या नर्तनातील तालावर गोडपणा डोलत असतो. या देवाशी जन्मजन्मांतरीचं नातं जोडलं तर…तो आपला सखा झाला तर….ते सख्य अतिमधुर ठरतं.

देवकीनंदनाच्या गळ्यातून उमटणारे सूर अतिशय तृप्त करणारे आहेत..मधुर आहेत….त्यांचं पेय प्राशन करणं, खाद्य ग्रहण करणं मधुर…जगाच्या दृष्टीनं निद्रेच्या मांडीवर मस्तक ठेवून डोळे अलगद मिटून घेणं गोड आहे…म्हणूनच त्याचं रूप असलेली आणि गाढ झोपी गेलेली बालकं गोड दिसतात…देवाची निद्रा मधुरच भासते. 

कान्होबाचं रूप अलौकिक गोड, त्यांच्या कपाळी असलेला तिलकही गोड दिसतो. देवानं काहीही करू देत ते मधुरच असते…त्यांचा जलविहार,त्यांचं तुमचं चित्त हरण करणं, त्याचं भक्ताचं दु:ख,दोष,पाप दूर करणं याला तर मधुरतेची सीमा म्हणावं. 

हरीचं स्मरण करावं म्हणतात…एकदा का या स्मरणाची गोडी लागली की ती सुटत नाही. त्यांच्या बोलण्यात माधुर्य आहेच पण ते जेंव्हा मौन धारण करतात ते मौन कोरडं नसतं वाळवंटासारखं…मधुबनासारखं गोड असतं….ही मौनातील मधुर शांतता आत्म्याला लाभते.

ज्याने हे जग सुंदर केलं त्याच्या गळ्यात शोभायला अनेक अलंकार आतुरलेलं असतात…पण गोपगड्यांनी आणून दिलेल्या गुंजाच्या बियांची माला आणि अर्थातच त्या गुंजा गोड दिसतात नजरेला. 

जिच्या काठावर मुकुंद बागडतात…जिच्या अंतरंगात शिरून जलक्रीडा करतात ती यमुना तरी माधुर्यात कशी मागे राहील? तिच्यात उठणारे तरंग, तिचं जल मधुरच ! गोकुळातल्या सरोवरांमध्ये फुलणारी कमळं मधुर आहेत…श्रोते हो ! बालकृष्णाच्या सावलीसारखं वावरणा-या गोपी त्याच्यासारख्याच की. 

या कृष्णसखयाचं सारं आयुष्य अगाध लीलांनी भरलेलं आणि भारलेलं आहे…गोड आहे. त्याच्याशी झालेला आत्मिक संयोग,सात्विक भोग हे भौतिक, शारीर चवीचे कसे बरे असतील?….या सर्वाला माधुर्याचा स्पर्श असतोच. या देवाचं जगाकडे बारकाईनं पाहणं आणि त्याचा शिष्टाचार अतिशय संयत आणि गोड !  

कृष्णाला ‘ क्लिशना ‘ अशी बोबडी पण गोड हाक मारणारा पेंद्या आणि त्याच्यासोबतचे सारे गोपगण म्हणजे गोडव्याच्या झाडाला लगडलेली गोड फळंच जणू. ज्यांना प्रत्यक्ष कृष्णपरमात्म्याच्या पाव्यातून त्याच्या 

‘चला, परत फिरा गोकुळकडे ’ या हाका ऐकू आल्या त्या कपिला सुद्धा गोडच आहेत. देवाला गायींना सांभाळण्यासाठी कधी काठीचा आधार नाही घ्यावा लागला…पण ही छडी गोड आहे…अगदी हिचा प्रसाद घ्यावा एवढी ! 

यानं निर्माण केलेली एकूण सृष्टीच मधुर आहे. देव आणि आपण वेगळे आहोत ही भावना म्हणजे प्रथमदर्शनी द्वैतसुद्धा मधुर आणि भगवंत भक्तांच्या हाती सोपवतात ती प्रेमफलं मधुर आहेत. एखाद्या अनुचित कर्माचं फल म्हणून दिलेला दंडही मधुरच असतो अंती. या देवाचं आपल्यासारख्या पामरांना लाभणं तर माधुर्याचा गाभाच…हे लाभणं केवळ गोड नसतं…आपण अंतर्बाह्य मधुर होऊन जातो ! सर्वांगसुंदर….तसं सर्वांगमधुर ! जय श्रीकृष्ण ! 

वल्लभाचार्यांचं मन किती गोड असेल नाही ! शब्द इतके गोड असू शकतात ! मूळ संस्कृतात असलेले हे शब्द सर्वांना समजण्यासारखे आहेत. पण अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे मधुराष्टक कान देऊन ऐकलं ना की श्रवणेंद्रियांचं श्रवण मधुर होऊन जातं…गाण्यातील बासरी खूप अर्थपूर्ण भासते…आणि आपण गाऊ लागतो…. ‘ मधुराधिपतेरखिलं मधुरं..’  हे माधुर्याच्या जन्मदात्या….तुझं सारंच किती मधुर आहे रे ! 

…. .. या शब्दांतील गोडवा तुम्हांलाही भावला तर किती गोड होईल ! शब्द वल्लभाचार्यांचे आहेत…त्यांचा अर्थ लावण्याचं धारिष्ट्य करावं असं वाटलं…गोड मानून घ्यावे. 

© संभाजी बबन गायके

पुणे

मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments