इंद्रधनुष्य
☆ हे दिनमणि व्योमराज… ☆ श्री श्रीनिवास बेलसरे ☆
मानवी संस्कृतीच्या वाटचालीत टारझनची अगदी प्राथमिक हुंकाराची भाषा ते कविकुलगुरू कालिदासांनी ज्या हिरे, माणके, पाचूनी नटलेल्या भाषेत लिहिले ती देववाणी संस्कृत हा किती हजार वर्षांचा, कदाचित काही लाख वर्षांचा प्रवास असेल! किंवा अलीकडचे उदाहरण घ्यायचे झाल्यास ग्रीक, लॅटीन, जर्मनमधील काही शतके पूर्वीचे साहित्य, शेक्सपियर, होमर, ख्रिस्तोफर मार्लोव्हची किंवा मराठीतील गडकरी, कानेटकर, कुसुमाग्रज यांची नाटके, माडगूळकर, खेबुडकर, शांता शेळके यांच्या कविता हा प्रवास पाहीला तरी चकित व्हायला होते.
किती ढोबळ, ओबडधोबड प्रकारचा संवाद करत करत माणूस किती सूक्ष्म भावना दोन बोटात पकडणा-या भाषेपर्यंत पोहोचलाय ते विस्मयकारक आहे. दुर्दैवाने अलीकडे मात्र माणसाच्या या आतल्या प्रगतीकडे क्वचितच पाहिले जाते. ‘भाषा म्हणजे केवळ संदेश-वहनाचे साधन आहे’ इतका उथळ, सवंग विचार करणारे लोक मोठमोठे विचारवंत म्हणून मिरवतात !
हल्ली नेहमी चर्चा होते ती केवळ भौतिक आणि तंत्रवैद्यानिक प्रगतीची! या प्रगतीचा विचार केला तर डोळ्यासमोर काय येते? या प्रगतीचे पुरावे म्हणजे केवळ लहानमोठी अगणित यंत्रे आणि अनिर्बंध उपभोगाच्या वस्तू! पण माणसाच्या ‘मनाच्या आत’ घडणा-या अतितरल, सूक्ष्म, अमूर्त, अदृश्य गोष्टींबद्दल, त्यांच्या अभिव्यक्तीसाठी अनेक पिढ्यांनी कल्पकतेने निर्माण केलेले शब्द, व्याकरण, भाषा, अनेक सृजनशील संकल्पना यात साधलेल्या प्रगतीबद्दल कुठे चकार शब्द ऐकू येत नाही. बाहेरचे जग अधिकाधिक सुंदर, आकर्षक, सोयीचे आणि उपभोग्य करण्यासाठी धडपडणा-या माणसाला त्याची ‘आतली धडधड’ अगदीच नगण्य वाटू लागली आहे का?
दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असेच द्यावे लागते. कारण ७/८ हजार वर्षाच्या नोंदीकृत इतिहासात कोणत्याही संस्कृतीचे संरक्षण, संवर्धन आणि पुढील पिढीकडे संवहन करण्याच्या कामात अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडणा-या भाषेकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष! जागेच्या अभावामुळे आपण या विषयावर फार सखोल विचार करणार नाही तरी आज साहित्य प्रामुख्याने ज्या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचते ती मनोरंजनाची क्षेत्रेसुद्धा भाषेच्या संवर्धनाबाबत काय चित्र उभे करत आहेत? मग त्यात सिनेमा आला, नाटके आली, कथा-कादंब-या आल्या, नितांत सुमार दर्जाच्या पण मोठ्या समुदायावर प्रभाव टाकणा-या टीव्ही मालिका आल्या! सगळीकडचे चित्र चिंताजनकच आहे. या सर्वांनी कोणतीच भाषा शुद्ध ठेवली नाही. मानवी मनोव्यापाराच्या नेटक्या अभिव्यक्तीचे साधन किती खीळखिळे करून ठेवले आहे!
उत्तम मराठी शब्द असताना त्यांना हटवून तिथे इंग्रजी किंवा हिंदी शब्द घुसवणे, मराठीचे व्याकरण नष्ट करून तिथे हिंदी आणि इंग्रजीचे व्याकरण लादणे किंवा एकंदर व्याकरणच नष्ट करून टाकणेही जोरात सुरु आहे. नाही म्हणायला परवाच गुलजारजींना दिलेले ज्ञानपीठ पारितोषिक हा भाषाप्रेमींसाठी एक दिलासा म्हणता येईल. हिंदी आणि उर्दू भाषेच्या सौंदर्याचा जो परिचय गुलजार यांनी कोट्यावधी भारतीयांना करून दिला त्याला तोड नाही!
अशा वेळी आज मराठी सिनेमातली गाणी चक्क आई-बहिणीवरील शिव्यांनी (‘आईचा घो’…) सजवणारे बेछूट दिग्दर्शक तेजीत आहेत. हिंदीत तर चक्क हॉटेलमधील एखाद्या भुरट्या गुंडाने दिलेली ऑर्डरच गाण्याची ओळ बनते आहे (‘ए गणपत, चल दारू ला…(चित्रपट : ‘शूट आउट अॅट लोखंडवाला’)
त्या पार्श्वभूमीवर पुन्हा आठवतात ती अभिजात मराठीतली नाटके, जुनी गाणी! या लेखकांनी, गीतकारांनी चिरेबंदी वाड्यापासून थेट रस्त्यावरच्या माणसातही उच्च साहित्यिक अभिरुची निर्माण केली होती.
असेच एक नाटक होते ‘कट्यार काळजात घुसली.’ वर्ष १९६७. लेखक आणि गीतकार पुरुषोत्तम दारव्हेकर. या संगीत नाटकात एकापेक्षा एक अशी ८ गाणी होती. सर्वश्री पंडीत प्रसाद सावकार, जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, भार्गवराम आचरेकर यांनी गायलेली ही गाणी अतिशय लोकप्रिय झाली.
‘कट्यार’मधले एक गाणे म्हणजे सूर्यदेवाची स्तुती होती. दारव्हेकर मास्तरांनी ते इतक्या उच्च मराठीत लिहिले की त्याला गाणे म्हणण्यापेक्षा ‘सूर्याचे स्तोत्र’ म्हणायला हवे! राजकवी भा.रा.तांबे यांनी सूर्यास्ताचे हुरहूर लावणारे वर्णन करताना ‘सायंकाळची शोभा’ या कवितेत म्हटले होते ‘कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा’ आमच्या दारव्हेकर मास्तरांनी मात्र राजकवींना परवडू शकणारा महागडा धातू न वापरता सूर्य चक्क लोखंडाचा कल्पलेला होता! ते सूर्याला तेजाचे भांडार असलेला, कमालीचा तप्त झाल्याने प्रकाशमान बनलेला ‘लोहाचा गोल’ म्हणतात.
सूर्यदेवाची स्तुती करताना ते म्हणतात, ‘तू तर आकाशाचा राजा आहेस. तुझ्या दिव्य तेजाने अवघे अवकाश उजळले आहे. तू दिवसाला प्रकाशित करणारे दिव्य रत्नच आहेस.’ –
‘तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज,
दिव्य तुझ्या तेजाने, झगमगले भुवन आज.
हे दिनमणि व्योमराज, भास्कर हे गगनराज.’
सूर्य उगवला की क्षणार्धात त्याचे अब्जावधी किरण सगळीकडे पसरतात. त्यातून जणू अग्निबाणच फेकले जात आहेत असे वाटते. पण हा अग्नी विनाशकारी नाही. उलट तो जणू अमृताचे थेंब बनून संपूर्ण सृष्टीतील अणुरेणूंना प्रकाशमान करतो!
यातील ‘अमृताचे कण’ ही कवीने दिलेली केवळ सुंदर उपमाच नाही तर ते जीवन-साखळीमागचे वैज्ञानिक सत्यही आहे! पृथ्वीवरील जीवसृष्टीला जिवंत ठेवणारे अन्न फक्त वनस्पती पुरवतात! आणि वनस्पतींचे जगणे आणि वाढ शक्य होते ती ‘फोटो-सिंथेसिस’ या फक्त सूर्यप्रकाशातच शक्य होणा-या प्रक्रियेमुळे!
‘कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळिती.
अमृतकण परि होउन अणुरेणु उजळिती.
तेजातच जनन मरण, तेजातच नविन साज.
हे दिनमणि व्योमराज, भास्कर हे गगनराज.’
हैड्रोजन वायूवर होणा-या अण्विक प्रक्रियेतून हेलियम तयार होऊन त्याच्या अमर्याद उर्जेतून सूर्य प्रकाशित होत असतो. ही प्रक्रिया अविरत सुरु असते म्हणून कवीने म्हटले, ‘तेजातच जनन मरण, तेजातच नवीन साज.’ किती यथार्थ वर्णन!
‘पॅराडाईस लॉस्ट’मधल्या जॉन मिल्टनसारख्या शैलीत कवी पुढे जबरदस्त विराट प्रतिमासृष्टी उभी करतो. आपल्याला दिसू लागते की आकाशाचा राजा सूर्य त्याच्या सिंहासनावर विराजमान झाला आहे. सगळे ग्रह, म्हणजे त्याचे मंत्री, त्याच्या दिव्य सभागृहात आसनस्थ झाले आहेत. कवी पुढे म्हणतो-
‘हे तेजोनिधी, तुझा प्रकाश भलेही प्रखर आहे, दाहक आहे, पण तोच तर रोज सर्व सृष्टीला संजीवन देतो. तुझी कृपा आम्हावर अशीच राहू दे. आम्ही जिला ‘भूमाता’ म्हणतो त्या पृथ्वीवर जीवसृष्टी अशीच वाढत राहू दे. तूच तिची लाज राख कारण तूच या सृष्टीचा अधिपती आहेस.’
‘ज्योतिर्मय मूर्ति तुझी, ग्रहमंडळ दिव्यसभा,
दाहक परि संजीवक तरुणारुण किरणप्रभा,
होवो जीवन विकास, वसुधेची राख लाज.
हे दिनमणि व्योमराज, भास्कर हे गगनराज.’
असे साहित्य वाचताना, ऐकताना कल्पनेची केवढी भव्यता अनुभवता येते, केवढा स्वर्गीय आनंद वाटतो! पण पाठोपाठ विचार येतो आज मराठी मनातील न्यूनगंडामुळे किती पिढ्या अमृताशी पैजा जिंकणारी ही ज्ञानदेवांची भाषा सोडून इंग्रजी माध्यमात शिकली त्यांना यातले किती शब्द कळतील आणि किती अडतील? केवढ्या आनंदाला ही मुले कायमची मुकली आहेत! शेवटी ‘कालाय तस्मै महा:’ म्हणावे की ‘राजा कालस्य कारणम’ ते कळत नाही !
♥ ♥ ♥ ♥ ♥
© श्रीनिवास बेलसरे.
मो 7208633003
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈