श्री प्रसाद जोग
इंद्रधनुष्य
☆ नाना फडणवीस ☆ श्री प्रसाद जोग ☆
बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस ( निधन: १३ मार्च, १८००.)
पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील ते एक मुत्सद्दी होते. नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते.लहानपणापासून नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २० व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले.आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला.
पेशवाईच्या काळात त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर माधवराव खुश असायचे.हिशोबातील काटेकोरपणा स्वतःला संभाळून काम करण्याची त्यांची वृत्ती माधवरावांना माहित होती. नानांच्या बाहेरख्यालीपणाबद्दल पेशव्यांना माहिती नव्हती असे नाही,पण त्याचा कोणताही त्रास राज्याला होत नाही ना हे ते पाहायचे. सेवकाच्या खाजगी आयुष्यात ते लक्ष घालत नसत. अंतकाळी थेऊर येथे नारायणरावांच्या हात विश्वासाने नानाच्या हाती दिला व त्यांना सांभाळून राज्य चालवा असे सांगितले.
माधवरावांच्या मृत्यूनंतर पेशवे बनलेल्या नारायणरावांचा राज्यकारभार चालवण्या इतका वकूब नव्हता.त्यांचा खून केला गेला त्या वेळी त्यांची पत्नी गंगाबाई गरोदर होती.राघोबादादांच्या वर्तुणुकीला उबगलेले सारे कारभारी एकत्र झाले त्यातूनच बारभाई हा गट सक्रिय झाला आणि त्याचे प्रमुखपद नाना फडणवीसांनी सांभाळले आणि त्यांनी गंगाबाईला झालेल्या पुत्राला माधवराव (दुसरे) याना पुढे करून राज्यकारभार केला.
थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा पूर्वपदावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचं वर्चस्व टिकवून ठेवले. पुण्याचे वैभव वाढवले.
वाई (मेणवली) येथे नाना फडणीसांचा वाडा आजही आहे. मेणवली येथील त्यांच्या वाड्यात खूप चित्रपटांचे चित्रीकरण होत असते.
पेशवाईमध्ये साडेतीन शहाणे प्रसिद्धीस पावले होते.१) नागपूरकर भोसल्याचे “देवाजीपंत”२)हैद्राबादच्या निजामाचे “विठ्ठल सुंदर”३)पेशव्यांच्या दरबारातील “सखारामपंत बोकील”(बापू)
वरील तिघांना पूर्ण शहाणे म्हटले जायचे कारण हे तिघेही मुत्सदी तर होतेच त्याच बरोबर त्यांना युद्धकला देखील अवगत होती.
चवथे शहाणे पेशव्यांच्या दरबारातील :नाना फडणवीस,मुत्सद्दी असले तरी यांच्या जवळ युद्ध कला नव्हती तेव्ह्ड्यासाठी त्यांना अर्धे शहाणे म्हटले गेले.
नाना फडणवीस यांची नऊ लग्ने झाली होती; शिवाय त्यांना दोन रखेल्या होत्या. नानांचे पहिले लग्न दहाव्या वर्षी झाले. नानांच्या नऊ बायकांपैकी सात त्यांच्या हयातीत वारल्या; नाना वारले तेव्हा त्यांची आठवी पत्नी बगाबाई व नववी जिऊबाई या देवसेवेसाठी सिद्धटेकला होत्या; त्यांना ही बातमी समजताच त्या पुण्यास येण्यास निघाल्या. वाटेत त्यांना ताब्यांत घेण्यासाठी पेशव्यांनी फौज पाठविली. परंतु तिला या बायकांच्या सोबत असलेल्या अरबांनी हुसकावून दिले, असे इंग्रज इतिहासकार मॅकडोनल्ड म्हणतो. या स्त्रिया पुण्यास आल्यावर बगाबाई नानांच्या पश्चात चौदा दिवसांनी वारली. जिऊबाईचे वय यावेळी नऊ वर्षांचे होते. तिने नानांनी अर्धवट ठेवलेले भीमाशंकराचे देऊळ बांधून पुरे केले.
रावबाजीच्या म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या स्वभावाचा धसका नाना फडणवीस यांच्या जिऊबाई या पत्नीनेही घेतला होता. नाना गेल्यावर या बाजीरावाने नानांच्या अरबांचा पगार चुकता करून नानांचे वाडे, जहागीर व इनामी गावे जप्त केली. नानांजवळील अफाट संपत्ती हाती येण्यासाठी जिऊबाईस शनवारवाड्यात आणून ठेवले. दौलतराव शिंद्याचीहि त्या संपत्तीवर दृष्टी असल्याने, त्याने बाईस दत्तक देऊन आपल्या ताब्यात देण्याबद्दल पेशव्यांस विनंती केली, पण पेशव्यानी ती नाकारली, आणि नानांचा पक्का सूड उगवला.
यानंतर नानांच्या पक्षाच्या सर्व मंडळींस पेशव्यानीं नजरकैदेत ठेवले. यशवंतराव होळकराने पुणे जाळले, तेव्हा रावबाजी पळून गेले होते. तेव्हा जिऊबाई वाड्यातच होती. नानांचा व आपल्या घराण्याचा पूर्वापार संबंध जाणून यशवंतरावाने बाईस लोहगड (हा किल्ला नानांस सरकारांतून बक्षीस मिळाला होता) किल्ल्यावर नानांचा विश्वासू नोकर धोंडोपंत नित्सुरे याच्या स्वाधीन केले. नानांचा मुख्य खजिना तेथेच असे.
इंग्रजी राज्य झाल्यावर एलफिन्स्टनने बाईस पुण्यास आणून वार्षिक हजारांची नेमणूक कायम करून, बेलबाग संस्थान व मेणवली गाव जप्तीतून मोकळे केले. नंतर बाई मेणवलीस जाऊन राहिली. तिने १८२७ मध्ये मिरजेच्या गंगाधरराव भानू नावाच्या मुलास इंग्रजांच्या संमतीने दत्तक घेऊन त्याचे नाव माधवराव ठेविले व त्यास आपली बारा हजारांची नेमणूक, बेलबाग संस्थान व मेणवलीची वहिवाट मिळावी म्हणून फार खटपट केली; परंतु इंग्रजांनी तिचे काही एक ऐकले नाही.१८५४ च्या मार्चमध्ये जिऊबाई वारली.
नाना फडणवीस यांच्या माधवरावांच्या पश्चातल्या कालखंडामधील जीवनावर लेखक विजय तेंडुलकर यांनी “घाशीराम कोतवाल”हे नाटक लिहिले आणि त्याचा पहिला प्रयोग,१६ डिसेंबर,१९७२ रोजी पुण्यातल्या भरत नाट्य मंदिरात झाला.या नाटकाने पुण्यात प्रचंड वादळ उद्भवले होते.
पेशवाईमधील इतिहासात स्वतःचे नाव नाव अधोरेखित करणाऱ्या नाना फडणवीस याना अभिवादन.
© श्री प्रसाद जोग
सांगली
मो ९४२२०४११५०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈