श्रीमती उज्ज्वला केळकर
इंद्रधनुष्य
☆ आम्ही असे घडलो – लेखिका : सुश्री प्रज्ञा पावगी ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
डॉ. हिम्मतराव बावस्कर
३५ वर्ष सतत ग्रामीण भागात वास्तव्य करून ग्रामीण जनतेच्या आरोग्याविषयीच्या समस्या जाणून घेणं आणि त्यावर संशोधन करून त्या समस्या सोडवणं ही डॉ. हिम्मतराव बावस्कर यांच्या जीवनाची व जगण्याची नित्याची बाब झाली आहे. विंचूदंशावर संशोधन करून त्यावर नेमकी व साधी उपाययोजना केल्यामुळे विंचूदंशानं होणारं ४०% मृत्यूच प्रमाण १ टक्क्यावर आलं, याचे श्रेय त्यांना आहे. त्यांचं हे संशोधन जगप्रसिद्ध ‘ लॅन्सेट ‘ या वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध झालं. तसंच त्यांचे सर्पदंश, फ्लूरोसिस, हृदयरोग, थायरॉइड इ. आजारावरील संशोधनाचे ४५ प्रबंध प्रसिध्द झाले आहेत. जगभरातून याविषयी सल्ला मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे विचारणा होते. शून्यातून वर येऊन जागतिक संशोधनाचा पल्ला गाठणाऱ्या डॉ बावसकर यांची ही जडणघडण…
फुटलेल्या दगडी पाटीच्या तुकड्यावर अभ्यास करून शिक्षणाची सुरुवात, घरची गरिबी एवढी की शिक्षण बंद करून शेतात काम करावं अशी परिस्थिती. शिक्षण बंद होऊ नये म्हणून मग सुटीच्या दिवशी स्टँडवर कॅलेंडर, डायऱ्या, पंचांग विकणे; लाकड फोडणं, मोळ्या बांधणं अगदी बांधकामावर बिगारीच काम करणे अशी हिम्मतरावांच्या शिक्षणाची सुरुवात. त्यामुळे ते म्हणतात, मी जरी व्यवसायाने व बुद्धीने डॉक्टर असलो तरी हाडाचा शेतकरी आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच, हा अभ्यास पुढे मानव जातीला उपयुक्त ठरणार आहे हा विचार नेहमीच त्यांच्या मनात येत असे. त्यामुळे फक्त परीक्षेपुरता अभ्यास त्यांनी कधीच केला नाही.
“पॅथाॉलॉजी ही वैद्यकीय शास्त्राची जननी आहे ” हे प्राध्यापकांच वाक्य कानी पडताच “बाॉइडची पॅथाॉलॉजी” हे हजार पानांचे पुस्तक पाठ करण्याचा प्रयत्न केला, ते पाठ करण्यासाठी पहिल्या परीक्षेला ते मुद्दाम बसले नाहीत. नेटाने अभ्यास करून परीक्षा देताना काचेच्या स्लाईडवर लावलेले रक्त स्त्रीचे आहे, हे ओळखलं. मायक्रोस्कोप खाली बघितल्यावर तेव्हा जगप्रसिद्ध पॅथाॉलॉजिस्ट डॉ.के. डी. शर्मा यांनी पैकीच्या पैकी गुण दिले. त्यामुळे हिम्मतराव त्यांचे आवडते विद्यार्थी बनले. त्यांनीच पुढे त्यांना एम. डी. साठी मदत केली. पुढील शिक्षण घेणे कठीण असल्यामुळे त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून सरकारी नोकरी इमानदारीत १७ वर्षे केली. खाजगी प्रॅक्टिस केली नाही. विशेष म्हणजे जिथे कोणी वैद्यकीय अधिकारी जायला तयार नव्हता, त्या त्या ठिकाणी ते रूजू झाले.
कोकणामध्ये लाल जातीचे विंचू भयंकर विषारी आहेत, या भागात विंचूदंशाने मृत्यूच प्रमाण ४०% वर होतं, परंतु त्याबद्दल काहीही संशोधन झालेले नव्हते. हिम्मतरावानी विंचूदंशाच्या रुग्णांचा सखोल अभ्यास करायचं ठरवलं. विंचुदंश झालेल्या रुग्णांच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात केली..
नाडीचे ठोके, रक्तदाब, थंड पडलेले हातपाय, हृदयात वाढलेला दाब आणि हृदय कमकुवत होऊन फुफ्फुसात पाणी साचून व दम लागून शॉकने रुग्ण दगावतात असे त्यातून सिद्ध झाले. त्याबद्दलचे हिंमतरावांचे प्राथमिक पत्र “लॅन्सेन्ट” (वैद्यकीय क्षेत्रातील जगातले एक अत्यंत मानाचे जर्नल) मध्ये १९७८ ला प्रसिद्ध झाले. हे पत्र पाहून त्यांचे शिक्षक डॉ के. डी. शर्मा अतोनात खूष झाले. पुढील काळात संशोधनालाच चिकटून रहायचे असे हिम्मतरावानी ठरवले. संशोधनाने व ज्ञानाने मानव जातीवर उपकार होतात व जगात सर्वांना त्याचा लाभ मिळतो, पुढील काळात हीच संपत्ती मानली जाणार होती.
विंचूदंशाचे रुग्ण ज्ञात असलेल्या उपायाला दाद देत नव्हते. विंचूदंशावर प्रतिलस काढा, ही सर्वत्र मागणी होत होती. एम. बी.बी. एस. चे ज्ञान संशोधनाला कमी पडत आहे असे वाटल्यामुळे हिम्मतराव एम. डी. करण्यासाठी पुण्याला बी. जे. मेडिकल कॉलेज मध्ये रूजू झाले. त्यावेळेस त्यांनी अभ्यासलेल्या ५१ केसेस चा ” विंचूदंशाची प्राथमिक लक्षणे” हा प्रबंध १९८२ मध्ये “लॅन्सेन्ट ” मध्ये प्रसिद्ध झाला. विंचूदंशाच्या गंभीर रुग्णावर ‘प्राझोसीन ‘ हे औषध सापडले त्यांना. एका वर्षात २०० केसेस या औषधाने त्यांनी चांगल्या केल्या. “प्राझोसिन” हेच विंचूदंशावर योग्य औषध म्हणून १९८६ मध्ये “लॅन्सेन्ट” मध्ये प्रसिद्ध झालं. विंचुदंशाने शरीरातील अल्फा रिसेप्टर उत्तेजित होतात तर “प्राझोसीन ” हे अल्फा ब्लॉकर आहे. ह्यामुळे विंचूदंशाने होणाऱ्या परिणामावर “प्रोझोसीन ” मारा करते, म्हणून त्याला अँटिडोट असे म्हणतात.
भारतामध्ये पाँडीचेरी, कर्नुल , बेलारी, कच्छ या भागामध्ये कोकणासारखे विंचू आहेत. या भागातही प्राझोसीन वापरून मृत्यूचे प्रमाण घटले आहे. तसेच टर्की, अरेबियन देशात वेगळ्या जातीच्या विंचूदंशावरही ‘ प्राझोसीन ‘ वापरणं सुरू झालं आहे . आता बाजारात प्रतिलस ही आली आहे.
लंडन येथील “सीबा फाऊंडेशन” द्वारा आयोजित वैज्ञानिकांच्या चर्चासत्रास डॉ हिम्मतराव बाविस्कर उपस्थित होते. त्यावेळी प्रतिलस विरुद्ध ‘प्राझोसीन’ असा वाद सुरू झाला. तेव्हा अध्यक्षांनी हिम्मतरावाना त्यांचे विचार मांडण्यासाठी पाचारण केले. ते म्हणतात, एक भारतीय म्हणून माझे विचार तेथे मांडताना मला भरून आले. अनेक शास्त्रज्ञांना समक्ष भेटण्याची संधी मिळाली.
कुठल्याही आधुनिक सुविधा जिथे पोहोचल्या नाहीत, अशा खेड्यातील एका अशिक्षित कुटुंबात जन्म घेऊनही हे जगप्रसिद्ध संशोधन त्यांच्याकडून कसं घडलं, याचं वारंवार कुतूहल आणि आश्चर्य व्यक्त होत आहे. ते म्हणतात, या संशोधनाच्या कामात गरिबी, शिक्षणातील अडचणी, इतरांच्या टीका काही काही आडवं आलं नाही.
लेखिका : सुश्री प्रज्ञा पावगी
संकलक : गिरीश क्षीरसागर
© सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 9403310170, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈