डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ श्रीमद्भगवद्गीता — अध्याय सातवा — ज्ञानविज्ञानयोग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
श्रीभगवानुवाच :
मय्यासक्तमना: पार्थ योगं युंजन्मदाश्रय: ।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ।।१।।
कथिय श्री भगवंत
ऐश्वर्या विभूती सामर्थ्य गुणांनी पार्था तू युक्त
माझ्या ठायी अनन्य भावे मत्परायण तू भक्त
सकल जीवांचा आत्मरूप मी सर्वांचा प्राण
चित्त करुनी एकाग्र ऐकुनी स्वरूप माझे जाण ॥१॥
*
ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषत: ।
यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ।।२॥
*
अतिगहन हे ज्ञान सांगतो तुजला पूर्ण विश्वाचे
यानंतर ना काही उरते ज्ञान जाणुनी घ्यायाचे ॥२॥
*
मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वत: ।।३।।
*
सहस्रातुनी एखादा असतो यत्न करी मम प्राप्तीचा
मत्परायण होउनी एखाद्या आकलन मम स्वरूपाचा ॥३॥
*
भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च ।
अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ।।४।।
अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् ।
जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ।।५।।
*
पृथ्वी आप वायु अग्नी व्योम बुद्धी मन अहंकार
मम अपरा प्रकृतीचे हे तर असती अष्ट प्रकार
सामग्र विश्व जिने धारिले जाण तिला अर्जुना
परा प्रकृती माझी तीच शाश्वत जाणावी चेतना ॥४,५॥
*
एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।
अहं कृत्स्नस्य जगत: प्रभवः प्रलयस्तथा ।।६।।
*
उत्पत्ती समस्त जीवांची प्रकृतीतूनी या उभय
जगताचे मी कारण मूळ निर्माण असो वा प्रलय ॥६॥
*
मत्त: परतरं नान्यत्किंचिदस्ति धनंजय ।
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ।।७।।
*
जग माझ्यात ओवलेले सूत्रात ओवले मणि जैसे
माझ्याविना यत्किंचितही जगात दुसरे काही नसे॥७॥
*
रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो: ।
प्रणवः सर्ववेदेषु शब्द: खे पौरुषं नृषु ।।८।।
*
हे कौंतेया जाणी मजला जलातील प्रवाह मी
चंद्राचे चांदणे मी तर सूर्याचा प्रकाश मी
गगन घुमटाचा शब्द मी वेदांचा ॐकार मी
पुरुषांचे षुरुषत्व मी विश्वाचा तर या गुण मी ॥८॥
*
पुण्यो गन्ध: पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ ।
जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ।।९।।
*
पवित्र सुगंध मी वसुंधरेचा पावकाचे तेज मी
सकल तपस्व्यांचे तप मी जीवसृष्टीचे जीवन मी ॥९॥
*
बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् ।
बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।।१०।।
*
धनंजया हे भूतसृष्टीचे बीज जाण मज
विद्वानांची मी प्रज्ञा मी तेजस्व्यांचे तेज ॥१०॥
☆
अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈