श्री सुनील शिरवाडकर
इंद्रधनुष्य
☆ “हे नाटक माझे आहे” ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
साहित्य संघ मंदिरात ‘नटसम्राट’ चा प्रयोग सुरू होता. आयुष्याचा अखेरचा काळ व्यतीत करणारे, थकलेले, खालावलेले नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक तेथे आले. तात्यासाहेब शिरवाडकरांना त्यांनी विचारले…
“ डॉ.लागू कुठे आहेत?मला त्यांना सांगायचं…”
“काय”?
” हे नाटक माझे आहे “
आणि हो..खरोखरच हे नाटक त्यांचे होते. कारण अगदी मागच्याच वर्षीची गोष्ट. नानासाहेब फाटक वि.वा शिरवाडकरांना म्हणाले होते..
” आमच्या सारख्या जुन्या नटांना मानवेल असे एखादे नाटक तुम्ही लिहायला हवे “
त्यांनी ‘किंग लिअर’ चे नावही सुचवले होते आणि मग तात्यासाहेबांना जाणवले.. नानासाहेबांसारख्या नटश्रेष्ठांवरच नाटक लिहायला हवे.
तात्यासाहेब म्हणतात…
नानासाहेबांसारखा एक महान म्हातारा नट माझ्या मनात उभा रहात होता.. आणि किंगलिअर चे नायकत्व स्वतःसाठी मागत होता.
त्याचवेळी साहित्य संघात काही नेहमीचीच मंडळी वाद घालत होती.शंकरराव घाणेकर उच्च स्वरात म्हणाले…
” बस्स.. वाद कशाला? तुम्हा नवीन नटांचे सम्राट दाजी भाटवडेकर.. आणि आम्हा जुन्या नटांचे नटसम्राट.. नानासाहेब.”
आणि त्याचवेळी नाटकाचे नाव ठरले. वास्तविक तात्यासाहेबांना नाटकाचे नाव शोधण्यात नेहमीच तकलीफ होत असे. हे असे पहिलेच नाटक की ते लिहिण्यास घेण्यापूर्वी त्यांना त्याचे नाव सापडले.
तात्यासाहेबांनी नाटक लिहायला घेतले. पहिल्या अंकांचे वाचन ‘गोवा हिंदू असोसिएशन’ च्या कार्यकर्त्यांपुढे झाले. मुख्य भुमिका डॉ.श्रीराम लागू आणि शांता जोग यांनी करायचे ठरले.
डॉ.लागू यांनी नाटक वाचायला घेतले.. आणि पहिल्या पाच दहा पानात त्यांना त्याचे वेगळेपण जाणवु लागले. ते म्हणतात….
” पहिल्या अंकातील सुरुवातीचा तो अप्पासाहेबांचा प्रवेश.. निवृत्त झालेला तो वृध्द नटसम्राट.. हजारो प्रेक्षकांसमोर उभा राहुन आपले भरुन आलेले मन अगदी मोकळेपणाने, भाबडेपणाने पण मोठ्या सकस आणि काव्यमय भाषेत रिकामे करतो आहे. नाजूक, सुगंधी फुलांचा सतत वर्षाव व्हावा तसे सारे प्रेक्षक त्या मनोगताच्या आनंदात, कारुण्यात,रागलोभात आणि प्रेमात न्हाऊन चिंब होताहेत असे लोभसवाणे द्रुष्य मी चांगले अर्धा पाऊण तास सर्वांगाने बघत होतो.”
या नाटकाच्या मानधनाबाबत डॉ.लागू यांना विचारले गेले तेव्हा त्यांनी निरोप पाठवला..
‘ शून्य रुपयापासुन..सव्वाशे रुपयापर्यंत कितीही.पण मला हे नाटक करायचेच आहे.’ (त्यावेळी डॉक्टर एका प्रयोगाचे सव्वाशे रुपये घेत)
दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर यांना नागपूर येथील नोकरीतून फक्त महीनाभराची सवड मिळणार होती. पण ते येण्यापूर्वीच डॉ.लागुंनी मनातच तालीम करण्यास सुरुवात केली जवळजवळ संपूर्ण संहिता तालीम सुरू होण्यापूर्वीच त्यांनी पाठ केली.
नागपुराहुन दारव्हेकर मास्तर आले आणि नाटकाच्या तालमी सुरु झाल्या आणि एक दोन मुद्द्यावरून वाद सुरू झाले बऱ्याच जणांचे म्हणणे होते.. सुरुवातीचे जे अप्पांचे भाषण आहे, ते फार लांब आहे. ते कमी केले पाहिजे पण डॉ.लागुंनी ठामपणे विरोध दर्शविला. शेवटी असे ठरले की.. प्रत्यक्ष प्रयोगात ते कसे वाटते ते बघू .. प्रेक्षकांना कंटाळवाणे वाटले तर थोडा भाग कमी करु.
दुसरा वाद होता.. तिसऱ्या अंकातील जंगलातील प्रसंगाचा.दारव्हेकरांना तो अजिबात आवडला नव्हता.
“कुणी घर देता का घर..”
आणि..”जंगलातील जनावरं मोकाट सुटली आहेत..”
पण याही वेळी डॉ.लागूंनी तो भाग हट्टाने नाटकात ठेवायला भाग पाडले.
नाटकाचा पहिला प्रयोग २३ डिसेबल १९७० ला बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.रंगमंदिर जाणकार प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. नाटकाचा पडदा वर उचलल्यापासुन शेवटपर्यंत नाटक रंगत गेले. प्रयोग सुरेख झाला, आणि…
दुसऱ्याच मिनीटाला विठोबाचे काम करणारे नट..बाबुराव सावंत अचानक कोसळले.. बेशुद्ध झाले लगेचच त्यांना जवळीक बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.. पण तासादोन तासात त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
खरंतर पहिल्या अंकानंतरच बाबुरावांच्या छातीत दुखु लागले होते..घाम येत होता.अधुनमधून झोपून रहात.. गोळ्या घेतला ते कसेबसे काम करत होते.तिसऱ्या अंकातील शेवटच्या प्रवेशात ते म्हणाले देखील.. मी स्टेजवर गेलो नाही तर चालणार नाही का?
पण नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगात अशी परवानगी कोण देणार?
शेवटचा प्रवेश संपेपर्यंत त्यांनी मृत्युला थोपवून धरले आणि मग मात्र त्यापुढे शरणागती पत्करली.
सुरुवातीला नाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद फारसा नव्हता. पण हळूहळू प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल होऊ लागला.
दिल्लीतील एका प्रयोगाच्या वेळी दुसऱ्या अंकानंतर अचानक पं.रवीशंकर पडद्यामागे आले आणि त्यांनी डॉ.लागूंना मिठीच मारली. गदगदल्या स्वरात ते म्हणाले..”you are killing me”
डॉ. श्रीराम लागू म्हणतात..
“या नाटकाने मला खूप काही भरभरून दिले माझ्या लायकीपेक्षा खुपच जास्त दिले माझ्या फाटक्या झोळीला ते सारे पेलले की नाही.. माहीत नाही. मराठी नाट्यरसिकांच्या मानसात,कोपऱ्यात का होईना, एक पाट बसायला दिला आणि कलावंत म्हणून आत्माविष्काराला एक विस्तीर्ण, मुक्त आनंदाने भरलेले अंगण दिले .. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे माझी जीवनाची जण अधिक विस्तीर्ण करणारा सखोल संस्कार दिला. भाषेचे सौंदर्य, तिची अफाट ताकद, शब्दाशब्दाला फुटणारे आशयाचे धुमारे आणि ह्या साऱ्यांनी जीवनाला मिळणारा भरभक्कम आधार दिला.’नटसम्राट’ करण्याच्या आधीचा मी जो होतो त्यापेक्षा नंतरचा मी अधिक बरा ‘माणूस’ झालो.एका नाटकाने माणसाला यापेक्षा जास्त काय द्यावे?कलावंताचे आपण जन्मभर ऋणी रहायचे ते याकरिताच.”
आणि म्हणूनच मराठी नाट्यस्रुष्टीत ‘नटसम्राट’ चे स्थान अत्युच्च आणि अतुलनीय आहे पाश्चात्य रंगभूमीवर प्रत्येक नटाचे अंतिम स्वप्न हे ‘हँम्लेट’ ची भुमिका करण्याचे असते. त्याचप्रमाणे मराठी रंगभूमीवरील नटाचे स्वप्न ‘नटसम्राट’;ची भुमिका करण्याचे असते डॉ.लागु यांच्यानंतर दत्ता भट,सतिष दुभाषी पासून अगदी अलीकडे मोहन जोशींपर्यंत प्रत्येकाने ही भूमिका पेलण्याचे शिवधनुष्य उचलले आहे
‘नटसम्राट’ हे नाटक आता केवळ वि.वा.शिरवाडकरांचे राहिले नाही.. तर अवघ्या मराठी जनांचे झाले आहे ज्याप्रमाणे नानासाहेब फाटक म्हणाले होते..
“हे नाटक माझे आहे”
त्याचप्रमाणे प्रत्येक मराठी माणुस, मग तो कलावंत असो की रसिक.. नेहमीच म्हणत राहील…
” हे नाटक माझे आहे ” – – –
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈