श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ १९४७ मधली गोष्ट – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

– डॉ. आर. एच. कुलकर्णी व कुटुंबीय 

डाॅ. आर्. एच्. कुलकर्णी नामक २२ वर्षाच्या तरूणाला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या चंदगढ़ गावी दवाखान्यात नोकरी मिळाली. दवाखान्यात तुरळक पेशंटस् असायचे.

जुलै महिन्यात रात्री तुफान पाऊस पडत होता. आर्. एच्. के. चा दरवाजा कोणीतरी जोरजोराने वाजवत होतं.

बाहेर दोन गाड्या घोंगडी पांघरलेली, हातात लाठ्या -काठ्या घेतलेली सात – आठ माणसं उभी होती. काही कळायच्या आतच त्यांना गाडीत ढकलण्यात आलं. सुमारे दीडेक तासात गाडी थांबली. काळाकुट्ट अंधार! लाठीधार्‍यांनी डॉक्टरांना एका खोलीत ढकललं. खोलीत एक चिमणी मिणमिणत होती. खाटेवर एक तरुण मुलगी, बाजूला एक म्हातारी स्त्री बसली होती.

डाॅक्टरांना तिचं बाळंतपण करण्यासाठी फर्मावण्यात आलं. ती मुलगी म्हणाली, “डाॅक्टर, मला जगायचं नाही. माझे पिताजी खूप श्रीमंत जमीनदार आहेत. मुलगी असल्यामुळे मला शाळेत पाठवलं नाही. घरी शिकवायला एक शिक्षक ठेवला. मला या नरकात ढकलून तो पळून गेला. गावाच्या बाहेर या घरात या दाईबरोबर मला गुपचूप ठेवण्यात आलं.

त्या मुलीनं एका कन्येला जन्म दिला, पण बाळ रडलं नाही. ती म्हणाली, “मुलगीच आहे ना? मरू दे तिला. माझ्यासारखे भोग नशिबी येतील. ” कुलकर्णी डाॅक्टरांनी आपल्या ज्ञानाचा वापर करून बाळाला रडायला लावले. डाॅक्टर बाहेर येताच त्यांना १०० रु. देण्यात आले, त्या काळी ही रक्कम मोठी होती. आपलं सामान घेण्याच्या मिषानी डाॅक्टर खोलीत आले. त्या मुलीच्या हातावर शंभराची नोट ठेवत म्हणाले, “आक्का, आपल्या किंवा मुलीच्या जीवाचं बरं-वाईट करून घेऊ नको. संधी मिळेल तेव्हा पुण्याच्या नर्सिंग काॅलेजला जा, आपटे नावाच्या माझ्या मित्राला डाॅ. आर्. एच्. कुलकर्णीनी पाठवलंय सांग, ते तुला नक्की मदत करतील. भावाची विनंती समज. “

नंतर आर्. एच्. नी स्त्री-प्रसूतीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले. अनेक वर्षांनंतर औरंगाबादला एका काँन्फरन्स्ला गेले असता अत्यंत उत्साही आणि तडफदार अशा डाॅ. चंद्राच्या भाषणानी खूप प्रभावित झाले.

डाॅक्टर चंद्राशी बोलत असताना कोणीतरी त्यांना हाक मारली. डाॅ. आर्. एच्. कुलकर्णी असं ऐकताच चंद्रानं चमकून पाह्यलं. “सर, तुम्ही कधी चंदगढ़ला होतात?”

“हो, पण बरीच वर्ष झाली या गोष्टीला… “

“तर मग तुम्हाला माझ्या घरी यावंच लागेल. “

“चंद्रा, मी तुला आज पहिल्यांदा बघतोय, तुझं भाषण खूप आवडलं म्हणून तुझं कौतुक करायला भेटलो. असं घरी यायचं म्हणजे……. “

“सर प्लीज…. “

“आई बघितलंस का कोण आलंय?”

चंद्राच्या आईने डाॅक्टरांचे पायच धरले.

“तुमच्या सांगण्यावरून मी पुण्याला गेले, स्टाफ नर्स झाले. माझ्या मुलीला मी खूप शिकवलं, तुमचा आदर्श ठेवून स्त्री विशेषज्ञ डाॅक्टर बनवलं. “

“कुठंय ती मुलगी?”

चंद्रा चटकन पुढे झाली.

आता आश्चर्यचकित व्हायची वेळ डाॅक्टरांची होती.

“चंद्रा, तू मला कसं ओळखलंस?”

“तुमच्या नावामुळे. सतत जप चाललेला असतो आईचा… “

“तुमचं नाव रामचंद्र म्हणून हिचं नाव ‘चंद्रा’ ठेवलं. तुम्हीच आम्हाला जीवदान दिलंय. चंद्रा गरीब स्त्रियांना निःशुल्क तपासते, तुमचा आदर्श ठेवून… “

डाॅ. आर्. एच्. कुलकर्णी म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या, सुप्रसिद्ध लेखिका, इन्फोसिसच्या सुधा मूर्तींचे वडील…!!!

प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments