श्री सुनील शिरवाडकर
इंद्रधनुष्य
☆ “शांतीनिकेतन” ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
शिक्षण क्षेत्रात आपण काहीतरी करावे असे रविंद्रनाथ टागोरांना नेमके केव्हा वाटु लागले? का वाटु लागले?तो काळ इंग्रजीच्या शिक्षणाला अवास्तव महत्त्व देणारा होता. अगदी आजच्या सारखाच. इंग्रजी भाषा आली की आपल्याला सर्व काही आलेच..असे मानणार्या बुध्दिजीवी वर्गाचा.
बंगालमधील शहरी समाजात बंगाली भाषेविषयी एक प्रकारची तिरस्काराची भावना निर्माण झाली होती. दुरगावी गेलेल्या मुलांना पत्र लिहायचे म्हटले तरी वडील ते मात्रुभाषेतुन न लिहीता इंग्रजीत लिहीत.
त्या काळात कॉंग्रेसचे अखिल भारतीय अधिवेशन बंगालमध्ये झाले होते. त्यावेळी रविंद्रनाथांनी भाषण केले ते बंगालीत.तत्कालीन राष्ट्रप्रेमींनी त्यांच्यावर त्याबद्दल टीकाही केली होती.. चेष्टाहि केली. साधारण त्याच काळात रविंद्रनाथांनी ठरवले की, या भाषेच्या गुलामगिरीतून सुटण्यासाठी आपण काहीतरी करावयास हवे. आपली सगळी बुद्धी, प्रतिभा या कामासाठीच वापरण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
सर्व शहरी सुखसोयींचा,सुविधांचा त्याग करून आपल्या कुटुंबासह ते बाहेर पडले. फार पूर्वी म्हणजे जेव्हा रविंद्रनाथ ११-१२ वर्षाचे होते.. तेव्हा त्यांच्या वडिलांसह ते वीरभुम मध्ये आले होते. या जागेपासून जवळच एका दरोडेखोरांची वस्ती होती. तेथील निवांतपणा.. निसर्गाचे वैभव मनात साठवत त्यांचे वडील देवेंद्रनाथ तेथे ध्यान लावून बसत.तेथील दरोडेखोरांच्या मनात त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले. ते पण जवळ येऊन बसत.त्यातील कित्येकांनी वाटमारीचा व्यवसाय सोडला. देवेंद्रनाथांना आपल्या व्यथा, अडचणी सांगत.
आणि आता रविंद्रनाथ पुन्हा त्या माळावर आले .त्यांना जाणीव झाली.. हिच..होय हिच जागा योग्य आहे. आत्मचिंतन करण्यासाठी.. ध्यान करण्यासाठी. त्यांनी तो माळ विकत घेतला.त्यावेळी एक लहान टुमदार बंगली बांधली. त्या सुंदर बंगल्याचेच नाव…’शांती निकेतन’.
१९०१ साली रविंद्रनाथांनी शांतीनिकेतनमध्ये प्रथमच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्या सोबतीला होती त्यांची पत्नी आणि दोन मुले. तेच त्यांचे पहिले विद्यार्थी. येथे मुलांना शिकवण्यासाठी पाठवणे म्हणजे सर्वसाधारण बंगाल्यांच्या द्रुष्टीने धाडसाचेच होते.
खुद्द इंग्रज या शाळेकडे संशयाने पाहत होते. भारतीयांमध्ये आपली भाषा..आपली संस्कृती याबद्दल अभिमान निर्माण करणे म्हणजे राजद्रोह होता. त्यामुळे रविंद्रनाथांनांकडे शिकवण्यासाठी मुले पाठवणे तर जाऊ द्या.. त्यांच्याशी संपर्क ठेवणे सुध्दा लोक टाळत होते. सरकारी नोकरीत असलेल्या उच्चवर्गीय बंगाल्यांनी आपली मुले शांतीनिकेतनमध्ये पाठवु नये असा गुप्त आदेशच इंग्रज सरकारने काढला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत सुध्दा काहींनी आपली मुले रविंद्रनाथांनांच्या स्वाधीन केली होती.
कशी होती ही शांतिनिकेतन शाळा? ऋतुमानानुसार बदलणारी.. निसर्गाचे रुप..सौंदर्य मुलांना समजले पाहिजे म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक आश्रमपध्दती स्वीकारली होती. जीवनातील आनंदाची नानाविध क्षेत्रे मुलांना मोकळी करून द्यायला हवी. त्यासाठी त्यांनी त्या विस्तीर्ण माळरानावर तपोवनाची उभारणी केली. त्या मुक्त छत्राखाली नांदणारे ते छात्र..आणि त्यांना गौरवाची दिशा देणारे हे गुरु. गुरु शिष्यांनी एकत्र येऊन केलेली ती आनंद साधना होती.
तत्कालीन ब्रिटीशांच्या शिक्षण पध्दतीपेक्षा सर्वार्थाने वेगळी ही शाळा होती.
रविंद्रनाथ म्हणतात.. मी स्वतः शाळेतून पळून आलेला मुलगा. शिकवावं कसं हे मला ठाऊक नव्हतं.मला मुलांनी जसं शिकावं असं वाटत होतं ,त्याला योग्य अशी पाठ्यपुस्तके देखील नव्हती. अभ्यासक्रमही नव्हता. शहरातल्या सुखसोयींपासुन दुर अशा शाळेत तर सुरुवातीला कोणी येतही नव्हते.
मग रविंद्रनाथ या मुलांना काय शिकवायचे? नृत्य.. गायन..कविता.. निसर्गाशी एकरूप होऊन रहावे.. मुसळधार पावसात त्या पर्जन्यधारांखाली चिंब भिजायला मुलांना उत्तेजन मिळत होते. आश्रमाजवळुन वाहणारी नदी पावसाळ्यात फुगुन वाहु लागली की गुरु आणि शिष्य बरोबरीनेच त्यात उड्या मारुन पोहोण्याचा आनंद लुटत.भूगोलाच्या पुस्तकातील ही हवा.. ते वारे..याचा आनंद वार्याबरोबर गात गात गाणी म्हणत लुटत.तो वारा पुस्तकाच्या पानापानातुन नव्हे तर मनामनातुन गुंजत राही.मुलांनी मुक्तपणे हे सर्व शिकावे हीच त्यांची खरी धडपड होती.
त्यांच्या मते दडपण आणि विकास या दोन गोष्टी एकत्र राहुच शकत नाही. त्यामुळे मुलांनी मुक्तपणे शिकावे यासाठी त्यांनी संगीताचा मार्ग निवडला. सर्व काही.. म्हणजेच कामे.. शिक्षण गात गात झाले तर त्यात असलेला रस टिकून राहील हे त्यांना जाणवले. निरनिराळे सण..उत्सव.. जत्रा यातून भारतीय संस्कृती टिकून आहे हे त्यांना माहित होते. त्यांनी शांतीनिकेतनमध्ये पौष जत्रा भरवण्यास सुरुवात केली. निसर्गाशी नाते जोडण्यासाठी मग छोटी छोटी रोपे पालखीत घालून त्यांची मिरवणूक काढण्यास सुरुवात केली. आणि त्यांच्या जोडीला सुंदर सुंदर गाणी. झाडांशी.. वेलींशी मुलांचे नाते जडण्यास सुरुवात झाली.
इथल्या वातावरणात साधेपणा होता. पण त्यात रुक्षपणा त्यांनी कधीही येऊ दिला नाही. प्रसन्नता.. सौंदर्य.. आनंद यापासुन विद्यार्थ्यांची ताटातूट कधी होऊ दिली नाही. शिक्षकांना पोटापुरते मिळत होते, पण मानसिक श्रीमंती खुपच मोठी होती. बाजारात मिळणाऱ्या छानशौकिच्या गोष्टींची, ऐश्वर्याची विद्यार्थ्यांनांच काय, पण शिक्षकांनाही कधी आठवण होत नव्हती. बंगाली विणकरांकडुन विणुन घेतलेली सुती वस्त्र रविंद्रनाथांपासुन सर्व जण वापरत.पण त्यात कलात्मकता कशी येईल याकडे लक्ष दिले जाई.
बाराखडींची,शब्दांची ओळख होण्यासाठी ‘सहजपाठ’ या नावाने त्यांनी इतक्या सुबोध शब्दात सुंदर सुंदर कविता रचल्या की गाता गाता मुलांना अक्षर ओळख होऊन जात असे. हे ‘सहजपाठ’ अजूनही बंगालमधील पाठ्यपुस्तकांत आजही आपले स्थान टिकवून आहे. बंगाली लोकांमध्ये असलेले कलेचे.. संगीताचे प्रेम वाढीस लागण्याचे खरे कारण म्हणजे हे ‘सहजपाठ’.
७ मे…. रविंद्रनाथांची जयंती…. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही एक आदरांजली !
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈