श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ नारायण ठोसर ते समर्थ रामदास… भाग-२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
(‘विश्वाची चिंता करायची म्हणजे काय करायचे असते हे समाजाला दाखवून द्यायचे होते आणि तसे करण्यासाठी हजारो तरुणांना तयार करायचे होते, तसेच त्यांची संघटना बांधून पुढेही अशी व्यवस्था चालू राहील याची रचना करायची होती.) – इथून पुढे —-
“शक्तीने मिळती राज्ये | युक्तीने येत्न होतसे |l शक्ती युक्ती जये ठाई | तेथे श्रीमंत धावती ||३०||”
अध्यात्म सार. – समर्थ रामदास
या उक्तीनुसार स्वतः शक्ती सामर्थ्य कमविणे गरजेचे वाटले म्हणून हा मुलगा आपल्या घरापासून कोसोमैल दूर असलेल्या टाकळीला गेला. टाकळीत पाय ठेवलेल्या दिवसापासून त्याच्या तपश्चर्येला सुरुवात झाली. ‘केल्याने होत आहे रे आधी या केलेची पाहिजे, नव्हे ! आपणच केले पाहिजे’ असे ठरवून त्याने स्वतः रोज सुमारे हजार सूर्यनमस्कार, नंतर सद्ग्रंथाचे वाचन, चिंतन, भिक्षेच्या निमित्ताने समाजमनाचे सूक्ष्म अवलोकन, असे विविध उपक्रम चालू केले.
साधारण बारा वर्षांनी साधनेचा अर्थात जीवीतकार्याच्या पूर्वतयारीचा एक टप्पा पूर्ण केल्यावर हा तरुण देशाटन करण्याकरिता टाकळीतून बाहेर पडला. अंदाजे चोवीस वर्षाचे वय. स्वयंप्रेरित होऊन स्वतःहून निवडलेला .. एका अर्थाने जगावेगळं संकल्प !!
“बहुत लोक मेळवावे| एक विचारे भरावे| कष्ट करोनी घसरावे| म्लेंच्छांवरी||१४||”
(श्रीसमर्थांचे संभाजी राजांना पत्र)
हा एकमेव उद्देश मनात ठेऊन संपूर्ण देशभर प्रवास केला. या मुलाने भारताच्या कानाकोपऱ्यात प्रवास करून देश काल परिस्थितीचा अभ्यास केला आणि तो या अनुमानापर्यंत पोचला की आपल्याकडे भारतात कसलीच कमतरता नाही. कमतरता एकाच गोष्टीची आहे ती म्हणजे असलेल्या साधनसंपत्तीचा उपयोग करुन, नीट योजना करून कार्य सिद्धीस नेणाऱ्या ‘योजकाची’. एका शब्दात सांगायचे तर संघटनेची आणि सक्षम, लोकोत्तर नेतृत्वाची. हिंदू मनुष्य पराक्रमात, सामर्थ्यात कुठेच कमी नव्हता. कमतरता एकाच गोष्टीत होती ती म्हणजे ‘मी जिंकू शकतो’ या वृत्तीची. आणि सर्वात महत्वाचा अभाव होता ‘राष्ट्रीय’ दृष्टिकोनाचा!! संघटनेच्या माध्यमातून समाज आपल्याला हवे ते सर्व करू शकतो हे सिद्ध करण्याची गरज होती. बारा वर्षांच्या देशाटनात श्रीसमर्थानी अशी हुकमी माणसे हेरून देशाच्या विविध भागात शेकडो मठ स्थापन केले. प्रत्येक मठात महंत नेमून मुख्य हनुमान भक्ती आणि बलोपासना ही कार्य सांगितलीच, पण सामान्य मनुष्यात स्वाभिमान जागृत करण्याचे महत्कार्य या तरुणांकरवी करायला सुरुवात केली.
“मुख्य हरिकथा निरुपण। दुसरे ते राजकारण।। तिसरे ते सावधपण। सर्वा विषई।।” ( दा.११.०५.०४)
त्या काळात दळणवळणाची अल्पस्वल्प साधने असताना देखील या सर्व मठातील संपर्क, सुसंवाद आणि सुसूत्रता उत्तम होती. याचा उपयोग छत्रपतींना ‘स्वराज्य’ संस्थापनेसाठी झाला हे सर्वज्ञात आहे. अलौकिक जीवनदृष्टीने कार्य करणाऱ्या आणि आपल्या असामान्य कर्तृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्या या तरुणास समाजाने उस्फूर्तपणे ‘समर्थ’ ही उपाधी बहाल केली. रोज हजार सूर्यनमस्कार घालणारा आणि प्रचलित पद्धतीने मठ स्थापन करुन राजाश्रयावर मठ न चालविणारा हा आगळा संत लोकांना आकर्षित करीत होता. तरुण पिढी हनुमान आणि बलोपासनेमुळे धष्टपुष्ट होत होती आणि संकुचित विचार सोडून समाजाचा म्हणजेच समष्टीचा विचार अंगी बाणवत होती.
छत्रपतींनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला हे खरेच. पण कोणीही एकटा मनुष्य राज्य तोपर्यंत निर्माण करू शकत नाही, जोपर्यंत तत्कालीन समाज ते मनापासून स्वीकारीत नाही. राज्य व्हावे ही श्रींची इच्छा !! ह्या उद्गारांना विशेष मूल्य नक्कीच आहे. पण हे वाक्य त्याकाळातील समाजातील प्रत्येक मनुष्याचे ‘ब्रीदवाक्य’ झाले होते, याचीही आपण दखल घेतली पाहिजे. जेव्हा समाज एका विशिष्ठ ध्येयाने प्रेरित होतो तेंव्हाच शिवाजी महाराजांसारखे असामान्य नेतृत्व आणि कर्तृत्व घडते. शिवाजी महाराजांचे भौगोलिक साम्राज्य आजच्या दोन-तीन जिल्ह्याइतके मर्यादित असले तरी भावनिकरित्या ते राज्य इथे राहणाऱ्या प्रत्येक मावळ्याचे होते. दिल्लीश्वराने स्वराज्य बुडविण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्याला त्यात कधीही यश मिळाले नाही. शेवटी त्याला स्वतःला दिल्ली सोडून महाराष्ट्रात यावे लागले आणि स्वतःला इथेच गाडून घ्यावे लागले तरीही स्वराज्य जिंकणे त्यास शक्य झाले नाही. ह्याला एकमेव कारण म्हणजे छत्रपतींच्या मागे असलेली समाजाची सात्विक शक्ती आणि विजिगीषू वृत्ती. ही वृत्ती प्रज्वलीत करण्याचे काम ह्या मठातून अखंड चालू राहिले.
त्या काळात युद्ध होतं होतीच, माणसे मरत होती, मारीत होती, जगत होती. फक्त कशासाठी जगायचे ? कशासाठी मरायचे ? कशासाठी मारायचे? हे सांगणार कोणी नव्हते. ते सांगण्याचे काम कोणी केले असेल तर त्या समर्थांनी. ह्यामुळेच जिवा महाला, बाजीप्रभू तानाजी, येसाजी मरायला तयार झाले. हे जेव्हा मरायला तयार झाले तेव्हा त्यांची पत्नी विधवा होणारच होती, त्यांच्या मुलांचे पितृछत्र हरपणारच होते. पण त्यांनी आपल्या कुटुंबापुरता संकुचित विचार न करता देशाचा, थोडक्यात कर्तव्याचा विचार केला आणि ही शिकवण समर्थांमुळेच शक्य झाली.
आपण संकल्पित केलेलं कार्य ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला मिळण्याचे भाग्य फार थोड्या लोकांना मिळते. श्रीसमर्थ रामदास स्वामी या बाबतीत भाग्यवान ठरले. श्रीसमर्थांच्या चरित्राचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की श्रीसमर्थ कर्मयोगी होते. शके १७५२ (इसवीसन 1674) ला शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला. हिंदूना सार्वभौम राजा मिळाला. सुमारे सातशे वर्षांची गुलामी नष्ट झाली. ही फक्त राजकीय गुलामी नव्हती तर सांस्कृतिक गुलामी देखील होती. छत्रपतींनी ही गुलामी झिडकारून टाकली आणि नवी हिंदू राज्यव्यवस्था निर्माण केली. अनेक बाटलेल्या हिंदूंना त्यांनी नवीन विधिविधान निर्माण करुन शुद्धीकरण करुन स्वधर्मात घेतले. छत्रपतींनी समर्थाना आपले गुरु मानले होते. सद्गुरुंची सेवा घडावी म्हणून शिवाजी महाराजांनी आपले सर्व राज्य समर्थांच्या झोळीत टाकले आणि समर्थानी निःस्पृहपणे ते परत देऊन टाकले. त्याकाळात आणि आजही असा संत महात्मा बघायला मिळणे अति दुर्मिळ! अशा या समर्थांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर ‘आनंदवनभुवनी’ हे काव्य लिहिले.
“उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करायला।”
एका सामान्य कुटुंबातील मुलगा मनाशी संकल्प करून प्रतिकूल परिस्थिती असतानाही स्वतःच्या बुद्धिकौशल्याचा उपयोग करून, रामावर प्रचंड श्रद्धा ठेवून सामान्य मनुष्यातील सात्विक शक्तीचे जागरण करून हिंदू सिंहासन निर्माण करु शकतो. हे मराठवाड्यातील जांब गावच्या ठोसरांच्या नारायणाने सिध्द करून दाखविले. फक्त त्यासाठी त्याला ‘नारायणा’चे ‘रामदास’ व्हावे लागले. ‘नारायण ठोसर ते समर्थ रामदास’ हा प्रवास विलक्षण आहे, तो मुळातून अभ्यासायला हवा, खास करून तरूणांनी! आजची समाजाची परिस्थिती फार वेगळी आहे असे नाही. ‘संघशक्ती कलींयुगे’ हेच खरे.
दासनवमी म्हणजे श्रीसमर्थांचा निर्वाणदिन. संत सूक्ष्मातून जास्त कार्य करतात असे म्हटले जाते. धर्मजागृती चे त्यांचे कार्य चालू असेलच, त्याला आपला हातभार कसा लागेल याचा विचार आपण सर्वांनी करावा असे +नम्रपणे सुचवावेसे वाटते. बलोपासना आणि सगुणभक्ती या दोन गोष्टी सर्वांनी कराव्यात असा त्याचा प्रयत्न असे. प्रयत्न, विवेक आणि वैराग्य अशी त्यांची त्रिसूत्री होती. आजच्या पावनदिनी आपण सर्वांनी त्यांच्या चरित्राचे चिंतन करावे, रामनाम स्मरण करावे आणि राष्ट्रीय विचारसरणीने कार्य करणाऱ्या एखाद्या संघटनेत सक्रीय सहभागी व्हावे. *’समर्थ’ होण्याचा प्रयत्न जरूर करावा पण त्यासाठी आधी ‘दास’ होऊन दाखवावे. आपण प्रयत्न करू.
।।जय जय रघुवीर समर्थ।।
– समाप्त –
© श्री संदीप रामचंद्र सुंकले
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈