श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ आणखी एक कोवळा अभिमन्यू ! – भाग-२ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
परमवीर अरूण खेतरपाल !
(आणि लढाईत सर्वांत महत्त्वाचे असते ते सैनिकांचे मनोबल….शस्त्रांपेक्षा ती शस्त्रे चालवणारी मने मजबूत असावी लागतात.) इथून पुढे. —
हनुतसिंग साहेबांनी मैदानातील सर्वांना आदेश बजावला…कुणीही कोणत्याही परिस्थितीत माघारी फिरायचे नाही! जेथे आणि ज्या स्थितीत असाल तेथूनच लढा…एक तसूभरही मागे सरायचे नाही! प्रमुखांचा आदेश सर्वांनच शिरसावंद्य होता. अरूण साहेबांनीही हा संदेश ऐकला आणि मनात साठवून ठेवला!
त्यांनी आपल्या रणगाड्यामधील साथीदारांना सांगितलं…सी.ओ.साहब का आदेश सुना है? उन्होंने कहा है..यही रूककर लडना है!
पाकिस्तानचा हल्ला सूरूच होता…अरूण साहेबांच्या शेजारीच लढत असलेले लेफ़्टनंट अवतार अहलावत साहेब जखमी झाले. त्यांचा रणगाडाही निकामी झाल. मल्होत्रा साहेबांच्या रणगाड्याची तोफ निकामी झाल्याने ते काहीही करू शकत नव्हते…फक्त पाकिस्तानचा मारा सहन करीत युद्धक्षेत्रात निश्चलपणे उभे होते…सेनापतींचा आदेश शिरावर घेऊन…साक्षात मृत्यूच्या डोळ्यांत पहात!
आता फक्त अरूण साहेबांचा रणगाडा युद्ध करू शकत होता. परंतू तोही आगीने वेढला गेला…मल्होत्रासाहेबांनी अरूणसाहेबांना मागे जावे असे सुचवले…त्यावर अरूण साहेब गरजले…नाही,साहेब! आता माघार नाही….मी शत्रूचा समाचार घेण्यास समर्थ आहे…जीवात जीव असेतोवर!
प्राकसिंग अरूण साहेबांच्या रणगाड्याचे चालक होते…ते म्हणाले…साहेब…थोडं मागे सरकू…रणगाड्याला लागलेली आग विझवू आणि पुन्हा पुढे येऊ! त्यावर अरूणसाहेबांनी त्याला स्पष्ट नकार दिला…सेनापतींचा आदेश आहे…न मागुती तुवा कधी फिरायचे…सदैव सैनिका पुढेच जायचे!
याच क्षेत्राच्या आसपास भारतीय रणगाड्यांच्या ब्राव्हो,चार्ली या अन्य तुकड्याही कार्यरत होत्या. पण त्यांच्यावरही पाकिस्तानने तुफान हल्ला चढवला होता. अरूण साहेबांच्या क्षेत्रात आता ते स्वत:च फक्त लढू शकत होते. महाभारत….अभिमन्यू उभा ठाकलेला आहे…त्याने चक्रव्युह भेदला आहे…पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला गवसत नाहीय…संधी पाहताच कौरवांनी जणू सिंहाच्या बछड्याला घेरलं…शिकारी कुत्र्यांसारखं. .. भारताचे तेथे उपलब्ध असलेले सर्वच रणगाडे आता युद्धात होते. मागून कुमक येण्याची शक्यता नव्हती. परिस्थिती भयावह होती…पराभव समोर होता…आपण हरण्याची शक्यता जास्त होती.
अरूण साहेबांनी समोर येईल त्या रणगाड्याला अचूक टिपायला आरंभ केला. आपल्या तोफचालकाला, नथूसिंग यांना ते सतत प्रोत्साहन देत राहिले…मार्गदर्शन करीत राहिले. एक स्थिती अशी आली की, पाकिस्तानचे सर्वच्या सर्व रणगाडे नेस्तनाबूत झाले…फक्त एक सोडून. हा रणगाडा होता….पाकिस्तानच्या स्क्वाड्रन कमांडर मेजर निसार याचा. निसार थेट अरूण साहेबांच्या रणगाड्याच्या अगदी समोर आला…केवळ दोनशे मीटर्सचे अंतर. ही रणगाड्यांची लढाई आहे…हे अंतर दिसायला जास्त दिसत असले तरी रणगाड्यांसाठी अत्यंत कमी…अगदी डोळ्यांत डोळे घालून पाहण्याएवढे.
अरूण साहेब आणि निसार यांनी एकाच वेळी एकमेकांवर गोळा डागला. निसारचा रणगाडा निकामी होऊन जागीच थांबला. दिवसभर निसार आणि त्याचे सैनिक त्या रणगाड्यामागे लपून राहिले आणि रात्री आपल्या हद्दीत पलायन करते झाले. इकडे अरूण साहेबांच्या रणगाड्यावर पडलेल्या तोफगोळ्याने रणगाडा ऑपरेटर सवार नंदसिंग धारातीर्थी पडले. आणि अरूणसाहेब प्राणघातक जखमी झाले होते…पण त्यांनी पाकिस्तानचा निकराचा हल्ला प्राणपणाने परतवून लावला होता. अन्यथा आपले खूप नुकसान झाले असते.
ती रात्र उलटली…पहाटेची महाभयानक थंडी पडली..थोडंसं उजाडलं होतं. जखमी झालेले सवार प्रयाग सिंग आणि नथू सिंग यांनी हा धडधडून पेटून राखरांगोळी होण्याच्या स्थितीत असलेला रणगाडा मागे घेतला…या सेंचुरीयन रणगाड्याचे नाव होते फॅमगस्टा-JX 202.!
अरूण साहेबांच्या कुडीत काही प्राण शिल्लक होता…त्यांनी पिण्यास पाणी मागितले. या थंडीत थंड पाणी प्यायला दिले तर आहेत ते प्राण उडून जातील म्हणून त्यांनी ताबडतोब एक कप चहा उकळून घेतला…तो कप अरूण साहेबांच्या ओठांपाशी नेला….पण साहेबांनी नथूसिंग यांच्या मांडीवर प्राण सोडला…अरूण साहेब आपल्यातून निघून गेले होते….दिगंताच्या प्रवासाला…आपले कर्तव्य पार पाडून. क्षेत्राचं प्राणपणाने रक्षण करून आपले खेतरपाल हे आडनाव सार्थ करून आणि अरूण हे आपले सूर्याशी आणि सूर्यवंशाशी नाते सांगणारे नाव अमर करून… आणखी एक अभिमन्यू अमर झाला होता !
“The sand of the desert is sodden red, —
Red with the wreck of a square that broke; —
The Gatling’s jammed and the Colonel dead,
And the regiment blind with dust and smoke.
The river of death has brimmed his banks,
And England’s far, and Honour a name,
But the voice of a schoolboy rallies the ranks:
‘Play up! play up! and play the game!”
― Henry Newbolt
‘वाळवंटातली वाळू लाल झालेली आहे रक्ताने….
शस्त्र तुटून पडलं आहे…सैन्याधिकारी धारातीर्थी पडला आहे.
सैन्यदल धुराने आणि धुळीने आंधळ्यासारखं झालं आहे.
मृत्यूच्या नदीत दुथडी भरून रक्त वाहतं आहे….
त्या गदारोळातून एका शाळकरी मुलाचा आवाज स्पष्ट उमटतो आहे…
खेळत रहा..खेळत रहा….हा मरणाचा खेळ खेळत रहा….याशिवाय विजय कसा मिळेल?’
सेकंड लेफ्टनंट अरूण खेतरपाल परमवीर ठरले. मरणोपरांत परमवीर चक्र मिळवणारे सर्वांत कमी वयाचे सैन्य अधिकारी ठरले. खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मधील कवायत मैदानाला अरूण खेतरपाल परेड ग्राऊंड म्हणून ओळखले जाते. त्यांच्या नावाने एक सभागृहसुद्धा असून एका प्रवेशद्वाराला यांचे नाव देण्यात आलेले आहे. नॅशनल वॉर मेमोरिअल मध्ये परमवीर सेकंड लेफ्टनंट अरूण खेतरपाल साहेबांचा अर्धपुतळा उभारण्यात आलेला आहे. इथे येणा-या प्रत्येकाला हुतात्मा अरूण खेतरपाल साहेबांच्या अविस्मरणीय शौर्यामुळे नवी प्रेरणा मिळत राहते. अरूण साहेबांच्या स्मृतींना दंडवत.
युद्धाची शक्यता निर्माण झाली तेंव्हा अरूण आपल्या घरी सुट्टीवर होते. त्यांना तातडीने रेजिमेंटमध्ये बोलावले गेले. निघण्याच्या दिवशी त्यांच्या मातोश्री त्यांना म्हणाल्या होत्या,” वाघासारखं लढायचं,अरूण. भेकडासारखं पराभूत होऊन परत फिरायचं नाही!” अरूण साहेब विजयी होऊन परतले पण तिरंग्यात लपेटूनच. खरं तर १६ डिसेंबर,१९७१ रोजीच युद्धविराम झाला होता. पण याच दिवशी अरूण साहेब हुतात्मा झाले होते. पण याची बातमी त्यांच्या घरी पोहोचली नव्हती. मात्र युद्ध थांबल्याची बातमी त्यांना रेडिओवरून समजली होती. आपला लेक बसंतरच्या लढाईत आहे, हेही त्यांना ठाऊक होतं. लढाई संपली….अरूण साहेबांच्या मातोश्रींना वाटलं होतं….आपला लेक आता घरी येईल. त्यांनी अरूण साहेबांची खोलीही व्यवस्थित करून ठेवली होती…पण…!
पुढे काही वर्षांनी घडलेली घटना तर आपल्यला व्यथित करून जाईल….अरूण साहेबांचे वडील निवृत्त ब्रिगेडीअर होते. त्यांचे मूळ घर पाकिस्तानात आहे. त्या घराला एकदा भेट द्यावी म्हणून ते पाकिस्तानात गेले असता त्यांचे यजमान एक ब्रिगेडीअरच होते…त्यांचे नाव नासिर….हो तेच नासिर ज्यांनी अरूण साहेबांच्या रणगाड्यावर गोळा डागला होता….नासिर यांनीच ही गोष्ट अरूणसाहेबांच्या वडीलांना सांगितली…तेंव्हा या बापाच्या मनाची काय अवस्था झाली असेल? कल्पना करवत नाही. मात्र ब्रिगेडीअर नासिर यांनी जेंव्हा त्यांना सांगितले की, तुमचा मुलगा खूप शौर्याने लढला आणि शहीद झाला…तेंव्हा या बापाचा ऊर अभिमनाने भरून आला ! This is Indian Army!
(लेफ्टनंट जनरल हनुत सिंग साहेबांच्या एका विडीओ मुलाखतीवर तसेच इतर बातम्या,लेख,विडीओस इत्यादींवर आधारीत हा लेख लिहिला आहे. लेखात वापरलेल्या हेंरी न्यूबोल्ट यांच्या कवितेचा स्वैर मराठी अनुवाद कथेच्या संदर्भात केला आहे. परमवीर अरूण खेतरपाल यांच्या रणगाड्याचे चालक श्री.प्रयाग सिंग आणि तोफ डागणारे नथू सिंग या धामधुमीत पाकिस्तानचे युद्धकैदी झाले होते. पाकिस्तानी सैन्याने या दोघांनाही वैद्यकीय उपचार दिले आणि नंतर भारताकडे सोपवले. पुढे हे दोघेही ऑनररी कॅप्टन म्हणून सेवानिवृत्त झाले. प्रयाग सिंग हे आता आपल्यात नाहीत. परमवीर खेतरपाल साहेबांचा मृतदेह आणि त्यांचा फॅमागस्टा रणगाडाही पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात घेतला होता. पण काही वेळातच पाकिस्तानला साहेबांचा देह आणि रणगाडा भारताच्या स्वाधीन करावाच लागला.. )
– समाप्त –
– क्रमशः भाग पहिला
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈