श्री मिलिंद जोशी
इंद्रधनुष्य
☆ डार्क वेब : भाग – 2 ☆ श्री मिलिंद जोशी ☆
(ही अतिशय महत्वपूर्ण माहिती देणारी लेखमाला दर सोमवारी आणि मंगळवारी प्रकाशित होईल)
इंटरनेटची दुनिया खूप मोठी आहे. ज्यावेळी आपण टेलिफोन प्रोव्हायडर किंवा सॅटेलाईटच्या माध्यमातून आपल्या कॉम्प्युटर / मोबाईल / किंवा अन्य कोणत्या गोष्टींना इतर कॉम्प्युटरसोबत कनेक्ट करतो त्यावेळी आपणही इंटरनेटचा एक भाग बनतो. हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण ज्यावेळी आपण त्यात अजून थोडी माहिती मिळवतो त्यावेळी त्यातही प्रकार आहेत हे आपल्याला समजते. ते प्रकार म्हणजे सर्फेस वेब, डीप वेब आणि डार्क वेब.
असे म्हणतात की सर्फेस वेब हे १०% वापरले जाते तर इतर दोन प्रकार मिळून ९०% वापर होतो. सर्फेस वेब तसेच डीप वेब वरील साईट आपण आपल्या रेग्युलर ब्राउजर मध्ये बघू शकतो. पण डार्क वेब वरील साईट बघण्यासाठी आपल्याला एका खास ब्राउजरची गरज लागते. ज्याला टोर ( TOR ) ब्राउजर असे म्हणतात. डार्क वेबच्या साईट आपल्याला नॉर्मल ब्राउजरमध्ये बघता येत नसल्याने ते काहीतरी वेगळे आहे असे वाटू लागते आणि उरलेली कसर युट्युबवरील अनेक युट्युबर भरून काढतात.
युट्युबवर तुम्ही फक्त ‘डार्क वेब’ हा शब्द शोधला तर आपल्या समोर जे चित्र विचित्र पोस्टर येतात ते बघून आपली उत्सुकता चाळवते. आपण तो व्हिडिओ बघायला लागतो आणि त्याबद्दल माहिती देणारी व्यक्ती सांगते, “डार्कवेबपर बहोत भयंकर कांड होते है | आप भूल से भी उसे देखने की कोशिश ना करे |” आणि आपल्या मनात भीती तयार होते. पण खरच का हे असेच आहे?
एक गोष्ट लक्षात घ्या. इंटरनेटचा प्रकार कोणताही असो. त्याचे कार्य सारखेच असते. एका कॉम्प्युटरवरील माहिती दुसऱ्या कॉम्प्युटरवर दाखवणे. मग ती टेक्स्ट / पिक्चर / ऑडिओ किंवा व्हिडिओ यापैकी कोणत्याही स्वरूपात असो. मग यात वेगळेपण काय आहे?
वेगळेपण आहे फक्त आपल्याला हवी ती माहिती तत्काळ मिळू शकेल किंवा नाही यात. यातील वेगळेपण एका वाक्यात सांगायचे तर ते खालील प्रमाणे सांगता येईल.
सर्फेस वेब : जे वेबपेज गुगल किंवा कोणतेही सर्चइंजिन शोधू शकते त्याला सर्फेस वेब म्हणतात.
डीप वेब : जे वेबपेज गुगल किंवा कोणतेही सर्चइंजिन शोधू शकत नाही. तसेच जे वेबपेज इंडेक्स नसते. पण आपले रेग्युलर ब्राऊजरमध्ये दिसू शकते. ( उदा. एखाद्या कंपनीचे / बँकेचे वेबबेस अप्लिकेशन किंवा ERP Software ) त्याला डीप वेब म्हणतात.
डार्क वेब : जे वेबपेज इंडेक्स नसल्याने गुगल किंवा इतर कोणतेही सर्चइंजिन शोधू शकत नाही. त्याच सोबत ते रेग्युलर ब्राउजर मध्येही दिसू शकत नाही. त्यासाठी वेगळ्या ब्राउजरची गरज असते, त्याला डार्क वेब म्हणतात.
एखाद्या ठिकाणी जाणे अवघड असेल तर त्याबद्दल अनेक अफवा उठतात. लोकांना त्या खऱ्याही वाटतात. पण ज्याचे स्वरूप जितके वाढवून सांगितले जाते तितके ते खचितच नसते. डार्क वेबच्या बाबतीतही ही गोष्ट प्रामुख्याने दिसून येते. डार्क वेबचा वापर मुख्यतः आपली ओळख लपवून कोणत्याही माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी केला जातो.
डार्कवेबला कोणती गोष्ट घातक बनवते? ते आपल्याला वापरता येऊ शकते का? ते वापरणे गुन्हा आहे का? त्याचा वापर करणारा माणूस तिथून बाहेर पडू शकत नाही यात कितपत तथ्य आहे? कोणतेही सरकार यावर नियंत्रण का ठेऊ शकत नाही? या आणि अशा काही प्रश्नांची उत्तरे मात्र पुढील भागात.
— क्रमशः भाग दुसरा
© श्री मिलिंद जोशी
वेब डेव्हलपर
नाशिक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈