सुश्री प्रभा हर्षे
इंद्रधनुष्य
☆ शिवकालीन चमत्कार, ‘ विषपरीक्षा दीप ‘! — लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
तीनशे वर्षे महाराष्ट्र आणि पूर्ण हिंदुस्तान, सर्व प्रकारचे जुलूम,अत्याचार,अन्याय सहन करीत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने या राष्ट्राला एक मोठाच आधार लाभला. शत्रूच्या अत्याचाराविरुद्ध त्याच्याच भाषेत,सज्जड उत्तर देऊ शकणारा एक महान अवतार जन्माला आला. शिवाजी महाराजांचा एकेक पराक्रम म्हणजे शत्रूला धडकी भरवणारा, शत्रूच्या कुटीलपणाच्या चिंध्या उडवणारा आणि इथल्या माणसांना न्याय देणारा होता.
अशा या महापराक्रमी राजाच्या राज्याभिषेकाला येत्या ६ जून २०२४ ( २० जूनला शिवशक ) रोजी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या आयुष्यामध्ये आलेला हा एक सुवर्णामृत योगच म्हणायचा ! माझा यानिमित्ताने शिवराज्यमहोत्सव@३५० या विशेष लेखमालिकेमध्ये, शिवचरित्र आणि कर्तृत्व, किल्ले, वस्तू, वास्तू इत्यादींसंबंधी काही विशेष, वेगळे लेख देण्याचा प्रयत्न आहे. त्यातील हे पहिले पुष्प !
महाराजांच्या कित्येक मोहिमा, लढाया, शिष्टाई, योजना, त्यांची विचारातील अद्भुतता, अभिनवता यावर खरे तर अनेक प्रबंध लिहिला येतील. त्यांची तलवार, शिरस्त्राण, वाघनखे, आग्र्याहून निसटताना वापरलेले पेटारे, अनेक वेगळी शस्त्रे हे सारेच अद्भुत होते. अनेक गोष्टी कालौघामध्ये नष्ट झाल्या, काही फक्त कागदोपत्री उरल्या.तर कांही देशविदेशातील संग्रहालयात आढळतात.
असाच एक आजही अस्तित्वात असलेला आणि कल्पनेत सुद्धा खरा वाटणार नाही असा एक शिवकालीन दिवा म्हणजे विषपरीक्षा दीप ! पूर्वी कुठल्याही राजाला अन्नातून विषप्रयोग करून मारण्याचा सतत धोका असे. असे म्हणतात की मुगल राजे आपले अन्न खाण्याआधी ते एखाद्या नोकराला खायला लावीत असत. नोकराला काही झाले नाही तर मगच तो राजा ते अन्न खात असे. पण हा विषपरीक्षा दीप किंवा जहर मोहरा, हा दिवा खासच आहे. राजाला द्यायच्या अन्नाचा थोडा भाग आधी या दिव्यावर धरला जात असे. अन्नात जर विष असेल तर दिव्याचा आणि ज्योतीचा रंग पालटत असे. ज्योतीच्या बदललेल्या रंगावरून अन्नात कुठले विष मिसळले आहे हे देखील कळत असे.
माझ्या मते हा दिवा जेड या दगडापासून बनलेला असावा. जेडचा दगड काही प्रमाणात विष शोषून घेतो. काही रसायनांच्या संपर्कात आल्यामुळे त्याचा रंग पालटतो. पूर्वी युरोपातील सम्राट याच जेडच्या पेल्यामधून मद्यपान करीत असत. त्यांचे हे पेले विविध वस्तू संग्रहालयातून जपून ठेवलेले आढळतात. मद्यात दगाफ़टक्याने विष मिसळले गेले असले तर ते जेड मध्ये शोषले जात असे.
एखाद्या रसायनाची परीक्षा करण्यासाठी हल्ली प्लॅटिनम वायर फ्लेम टेस्ट केली जाते. रसायनात बुडविलेली प्लॅटिनमची तार, ज्योतीवर धरल्यास ज्योतीचा रंग पालटतो. पालटलेल्या रंगावरून ते रसायन ओळखता येते. विषपरीक्षा दीपाची ज्योत हा याचाच पूर्वीचा अवतार असावा. दिव्याच्या जेड या दगडाचा बदललेला रंगही, अन्नातील विषाचे अस्तित्व सिद्ध करते. माझा असाही कयास आहे की मीराबाईला दिले गेलेले विष हे एखाद्या इमानदार आणि माहितगार सेवकाने या जेडच्या पेल्यातून दिले असावे. जेडच्या गुणधर्मामुळे विष, पेल्यामध्ये शोषले गेले आणि श्रीकृष्णाचे नाव घेत घेत मीराबाई वाचली असावी.
छत्रपती शिवाजी महाराज व श्रीमंत पेशवे यांच्यापाशी असा विषपरीक्षा दीप होता असे म्हटले जाते. मी इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांना या दिव्याबद्दल विचारले. त्यांनी सांगितले की हा दिवा शिवकालीन आहे हे खरे आहे. पण हा दिवा छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरल्याचा कुठेही उल्लेख किंवा पुरावा नाही. याचे कारण महाराजांचे सेवक हे इतके विश्वासू होते की महाराजांवर दगाफटक्याने विषप्रयोग केला जाण्याची शक्यताच नव्हती. राजासाठी इमानदार सैनिक एक वेळ आपला जीव देईल पण महाराजांच्या जीवाला काही होऊ देणार नाही.
आपले सुदैव असे की दंतकथा वाटावी असा हा दीप आजही पुण्याच्या राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालयात मूळ अस्सल स्वरूपात पाहायला मिळतो. या मूळ दिव्याचा मधला खांब अनेक ठिकाणी तुटल्यामुळे तो तारेने एकत्र बांधलेला दिसतो. मी या अस्सल दिव्यापुढे अनेकदा बसून या दिव्याचे चित्र तयार केले. यासाठी अनेकदा मुंबई – पुणे – मुंबई केले. त्याची मापे मोजली. नंतर या चित्रानुरूप हुबेहूब तसाच दिवा बनवून घेतला. ( सोबतचे छायाचित्र पाहावे ). ही एक दुर्मीळ वस्तू माझ्या संग्रहात समाविष्ट झाली.
लेखक : मकरंद करंदीकर.
(महत्वाची सूचना – यातील दिव्याचा फोटो खूपच दुर्मीळ आहे. फोटो पाहण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. म्हणून कृपया आपण हा लेख फॉरवर्ड केल्यास यातील फोटोही जरूर फॉरवर्ड करावा. फोटो व्हॉट्स ॲपवर पाठविताना प्रथम आपल्या फोनवर डाऊनलोड किंवा सेव्ह केल्याशिवाय फॉरवर्ड होत नाहीत.)
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈