सुश्री विनिता तेलंग
इंद्रधनुष्य
☆ काय आहे सावित्री ? ☆ सुश्री विनिता तेलंग ☆
सावित्री आहे भारतीय स्त्रीच्या प्रखर आत्मभानाचे,भारतीय युवतीच्या अपार संघर्षशील वृत्तीचे प्रतीक.
सावित्री आहे आपल्या इतिहासातील एक लखलखती तेजस्विनी,जी स्वतःच्या ईप्सितापासून तसूभरही ढळली नाही.सावित्री माणसाच्या मनातली ती तीव्र अभीप्सा आहे जी आपले उच्च ध्येय प्राप्त करण्याकरता मृत्यूवरही मात करते.
मानवजातीच्या कल्याणाकरता पित्याने केलेली तपश्चर्या, त्याचे तेजस्वी फलित असलेल्या कन्येचे डोळस संगोपन, तिच्या मनात त्याच उदात्त ध्येयाची रुजवण आणि तिच्याकडून त्याला मिळालेला उत्कट प्रतिसाद म्हणजे सावित्री.
सावित्री दैवी गुणसंपदेचा अविष्कार.
सावित्री स्वयंनिर्णयाचा अधिकार.
सावित्री स्वातंत्र्याचा उद्गार.
सावित्री ईश्वरदत्त प्रेमाचा स्वीकार.
सावित्री क्रूर नियतीचा अस्वीकार.
सावित्री तडजोडीला नकार.
सावित्री कठोर कर्माचा आचार.
सावित्री अतूट निष्ठेचा व्यवहार.
सावित्री योगाचा ओंकार.
सावित्री मानवी प्रगतीचा विचार.
सावित्री साहचर्याचा उच्चार.
सावित्री निसर्गस्नेहाचा प्रचार.
सावित्री मानवी पूर्णतेला होकार.
सावित्री आदिमायेचा अवतार.
सावित्री उत्क्रांतीचा आधार.
भारतातील प्रगत विचारांचा पुरावा आहे सावित्री.कन्येला पुत्राप्रमाणेच सुशिक्षित करून,तिला वर निवडीचे स्वातंत्र्य देऊन एकटीला वर संशोधनाला पाठवणारे मातापिता..
तिच्या निवडीचे आयुष्य केवळ एक वर्ष आहे हे कळल्यावरही तिच्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहणारे..
तिच्या वनात रहाण्याला आक्षेप न घेता,ढवळाढवळ न करता तिच्या संघर्षाला दुरून पाठबळ देणारे.
सावित्रीच्या मनातही काही केवळ सुस्वरूप तरुणाशी विवाह करून सुखाने राहण्याची मर्यादित इच्छा नव्हती.तिच्या मनात होते एक भव्य,अमर्याद स्वप्न. ते साकार करण्यात तिला साह्य करेल असा जोडीदार तिने डोळसपणे निवडला. त्याचे भविष्य समजल्यानंतरही तिने प्रत्यक्ष नियतीशी लढायचे ठरवले
आणि ती जिंकली !
काय केलं तिनं त्यासाठी?
तिनं जे केलं ते पतिसेवा,व्रतवैकल्ये, उपासतापास, वडाखालचा ऑक्सिजन याच्यापार पलीकडचं आहे.
Women empowerment,
liberal thoughts,
manifestation,
law of attraction,
goal setting,
parenting…… अशा अनेक आधुनिक संकल्पनांच्या पार पुढे गेली आहे सावित्री.
मानवाकरता तिनं दीर्घायुष्याचं वरदान मिळवलं यमाकडून.आणि त्याकरता यमाकडून मानवजातीकरता आणला योग..महायोगी श्रीअरविंद यांना या कथेतील दिव्यत्व जाणवले आणि त्यांनी या कथेला एका उच्च आध्यात्मिक दृष्टीने आपल्या सावित्री या इंग्रजी महाकाव्यातून मांडले.
ही नवी दृष्टी स्त्रियांनाच नव्हे समस्त मानवजातीला आत्मभान देणारी आहे.
लेखिका : विनिता तेलंग
© सुश्री विनिता तेलंग
सांगली.
मो ९८९०९२८४११
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈