श्री मिलिंद जोशी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ डार्क वेब : भाग – 3 ☆ श्री मिलिंद जोशी ☆ 

(ही अतिशय महत्वपूर्ण माहिती देणारी लेखमाला दर सोमवारी आणि मंगळवारी प्रकाशित होईल) 

इंटरनेटचा वापर करणाऱ्या जवळपास ६०% लोकांनी डार्कवेबचे नावही ऐकलेले नसते. उरलेल्या ४०% लोकांपैकी जवळपास ८०% लोकांच्या मनात डार्कवेब बद्दल अनेक गैरसमज आहेत. माझ्याच क्षेत्रातील एका मित्राशी बोलताना डार्कवेब बद्दलचा विषय निघाला.

“तुला डार्कवेब बद्दल काय माहिती आहे?” त्याने मला विचारले.

“अगदी जुजबी माहिती आहे.” मी उत्तर दिले.

“बरंय… याबाबतीत जितकी कमी माहिती, तितके चांगले.” त्याने सांगितले.

“का?”

“अरे खूप भयंकर जागा आहे ती. मी तुला सांगू नाही शकत, मला काय काय अनुभव आले तिथे.” त्याने चेहरा गंभीर करत सांगितले.

“ओह… तरीही सांगच तू. बघू तरी मलाही तसाच अनुभव येतोय का.” मी म्हटले.

“म्हणजे? मी खोटे बोलतोय असे वाटते का तुला?”

“नाही यार… पण मला जाणून घेण्याची इच्छा आहे.”

“तुला सांगतो मिल्या… दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. मी नवीनच डार्कवेब बद्दल ऐकले होते. नेटवर अजून माहिती मिळवली आणि केले ना टोर ब्राउजर डाउनलोड. लगेच इंस्टाल मारलं. पण ते काय गुगल नसतं. आपण एखादी साईट सर्च केली आणि लगेच ती समोर आली.” इतके बोलून त्याने थोडा पॉज घेतला.

“आयला… मग रे?”

“मग काय? जवळपास अर्धा पाऊण तास घालवला, आणि मिळवले काही साईटचे पत्ते.”

“क्या बात है यार… एक नंबर.” मी त्याला दाद दिली.

“तुला सांगतो, कधी कधी तिथे कोणती भाषा असते तेच आपल्याला समजत नाही. आणि आपल्या समोर जी लिंक असते त्यावर क्लिक केल्यानंतर काय होईल हेही आपल्याला समजत नाही.” त्याने सांगितले.

“बापरे…”

“पण आपल्यात एक मुंगळा असतो, तो काय शांत थोडाच बसू देतो? मी त्या लिंकवर क्लिक केले मात्र, माझ्यासमोर काही विंडो ओपन झाल्या. त्या सगळ्या विंडोमध्ये वेगवेगळे माणसं दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर काहीही भाव नव्हते. सगळे अगदी हिप्नोटाईझ केल्यासारखे दिसत होते. आणि तुला खोटे वाटेल, त्यातील एका विंडोमध्ये मीही दिसत होतो.” त्याने सांगितले.

“आयला… डेंजरच…”

“तुला सांगतो… इतका घाबरलो मी, लगेच विंडो बंद केली. पण काही केल्या ती बंद होत नव्हती. मग हळूहळू त्यातून विचित्र आवाज येऊ लागला. माझी तर हालत पतली झाली. माझ्या चेहऱ्यावर घाम आला. आणि मग त्या माणसांच्या चेहऱ्यावर विचित्र हसू होते. मी लगेच लॅपटॉपचे पावर बटन दाबले. तरी तो बंद होईना. मग पावर बटन ५ सेकंद दाबून तो डायरेक्ट बंद केला.” त्याने सांगितले.

“बापरे… मग रे?”

“त्यानंतर एक दीड तास मी लॅपटॉपला हातच लावला नाही. पण जसा मी तो चालू केला, माझ्या समोर परत तीच स्क्रीन होती. तेच लोकं होते आणि मेसेज आला, ‘नाऊ यु आर ट्रॅपड्’…” हे सांगून तो माझ्या चेहऱ्याकडे बारकाईने बघू लागला. माझ्या चेहऱ्यावर थोडे हसू आले.

“तुला खोटे वाटते म्हणजे…” त्याने माझ्या चेहऱ्यावरील भाव ओळखले.

“नाही रे… खोटे वाटत नाही पण तू एक गोष्ट करायची ना… तुझ्या लॅपटॉपच्या कॅमेऱ्यावर बोट ठेवायचे. त्यांना काही दिसले नसते मग…”

“अबे येडे, पण माझा लॅपटॉप तर हॅक झाला ना…”

“होय… बरोबर…”

“म्हणून तुला सांगतो, कधीही तिकडे फिरकू नकोस…” त्याने सांगितले आणि मी मान हलवली.

आता अनेकांना वाटेल, खरेच का असे होऊ शकते? तर उत्तर आहे, ‘होय’… हे असे नक्कीच होऊ शकते. पण… अशी हॅकिंग आपल्या सर्फेस वेबवरही होऊ शकतेच की. म्हणून काय आपण सर्फेस वेब वापरायला घाबरतो का? नाही ना… बरे माझ्या मित्राने सांगितलेल्या कोणत्या गोष्टी आपल्या सर्फेस वेबवर होऊ शकत नाहीत? सगळ्याच होऊ शकतात. आपण झूम किंवा गुगल मिटिंग करतो त्यावेळी आपल्यासमोर अशाच अनेक विंडो येतात, ज्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक जोडले गेलेले असतात. आपण ज्यावेळी ती मिटिंग अटेंड करतो त्यावेळी आपला माईक, आपला कॅमेरा वापरण्याची परवानगी आपण त्या सॉफ्टवेअरला दिलेली असते. इथे फक्त एक गोष्ट जास्तीची झाली. आपण दिलेल्या परवानगीसोबत आपल्या सिस्टीमचा जास्तीचा अॅक्सेस ही वापरला गेला. थोडक्यात इथे सावधानी गरजेची आहे, भीती नाही.

अंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ज्यावेळी ताशी १४५ किलोमीटरच्या स्पीडने येणाऱ्या बॉलचा सामना करतात त्यावेळी त्यांच्या मनात भीती असेल तर त्यांना खेळता येईल का? पण त्यांच्या मनात भीती नसते याचा अर्थ ते गार्ड / पॅड / ग्लोज / हेल्मेटचा वापर करत नाहीत का? करतात ना? तसेच या बाबतीतही असते.

डार्कवेब हा प्रकार जरी आपल्याला वेगळा वाटत असला तरी तो फारसा वेगळा नाही हेच या लेखातून मला सांगायचे आहे. बाकी गोष्टी पुढील भागात.

– क्रमशः भाग तिसरा  

©  श्री मिलिंद जोशी

वेब डेव्हलपर

नाशिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments