श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ माऊलींचा हरिपाठ १.… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
☆
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।
तेणें मुक्ती चारी साधियेल्या ।।१।।
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।
पुण्याची गणना कोण करी।।२।।
असोनि संसारी जिव्हे वेगु करी।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा।।३।।
ज्ञानदेव म्हणें व्यासाचिया खुणा।
द्वारकेचा राणा पांडवा घरी।।४।।
विवरण :-
महाराष्ट्रात भागवतधर्माची मुहर्तमेढ संत ज्ञानेश्वरांनी रोवली आणि म्हणूनच “ज्ञानदेवें रचिला पाया, तुका झालासे कळस” असे म्हटले जाते.
घर बांधताना आधी पाया खणला जातो, मग पाया बांधला जातो. जितकी इमारत उंच त्या प्रमाणात पायाचा आकार ठरवला जातो. मागील ७०० वर्ष ही ‘इमारत’ दिमाखात उभी आहे आणि जगाला ज्ञान देण्याचे, परंपरा टिकविण्याचे असिधारा व्रत चालू आहे, म्हणजे हा पाया बांधणारा अभियंता किती कुशल असेल.
आपल्याकडे सर्व संतांना स्वाभाविकपणेच आईची उपमा दिली गेली आहे. आई इतकेच नव्हे, तर त्यापेक्षा खूप जास्त असे सर्व संतांचे आपल्यावर उपकार आहेत. आई लेकराला एक जन्म सांभाळते, तर सद्गुरू शिष्याला मुक्ती मिळवून देईपर्यंत सांभाळतात.
भक्त आणि देव यांच्यातील ऐक्य साधणारा दुवा असेल तर तो म्हणजे संत. एखादवेळेस देव प्रसन्न होणार नाही,पण संतांना मात्र मायेचा पाझर लगेच फुटतो. सर्व संतांनी समाजाचे कल्याण व्हावे म्हणून अपारकष्ट सोसले, अनेक संतांनी समाजाचे हीत व्हावे म्हणून मानहानी पत्करली, त्यांची समाजाकडून हेटाळणी झाली, कोणाचा संसार विस्कटला, कोणाला वाळीत टाकण्यात आले, कोणाची गाढवावरुन धिंड काढण्यात आली. परंतु या कृतीचे प्रतिबिंब कोणत्याही संतांच्या साहित्यात आपल्याला आढळत नाही आणि पुढेही आढळणार नाही कारण संत म्हणजे अकृत्रिम मातृभाव आणि वात्सल्य यांचे आगर. पंढरपूरच्या पांडुरंग पुरुष देव असूनही त्याला सर्व संतांनी माऊली केले आणि सर्व संत सुद्धा त्या विठूमाऊलीप्रमाणे विश्वाची माऊली झाले…..! अखंड नामस्मरणाने अनेक शिष्यांनी संतत्व प्राप्त करून घेतले. परमार्थ आचरण करायला अत्यंत सुलभ आहे. त्याचे सामान्य सूत्र पुढील प्रमाणे सांगता येईल.
“एकतर समोरच्या मनुष्याला आई माना, संपूर्ण जगाला आपली आई माना, अथवा संपूर्ण जगाची आई व्हा!!”
या पाठात माऊली म्हणतात की देवाच्या दारी क्षणभर उभा राहा म्हणजे तुला चारी अर्थात सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या चार मुक्तींचा सहज लाभ होईल. माऊलींनी सांगितलेल्या चार मुक्ती कशा आहेत हे आपण दासबोधाच्या आधारे थोडक्यात समजून घेऊ.
(संदर्भ: दासबोध दशक ४ समास १०)
“येथें ज्या देवाचें भजन करावें | तेथें ते देवलोकीं राहावें । स्वलोकता मुक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ २३॥”
{या मृत्युलोकात असताना ज्या देवतेची उपासना माणूस करतो, त्या देवतेच्या लोकांत तो मृत्यूनंतर जाऊन सहतो. स्वलोकता मुक्तीचे लक्षण हे असे आहे.}
“लोकीं राहावें ते स्वलोकता । समीप असावें ते समीपता । स्वरूपचि व्हावें ते स्वरूपता । तिसरी मुक्ती ॥ २४॥”
{त्या देवतेच्या लोकांत जाऊन राहणे याला स्वलोकता म्हणतात. समीप असावे यास समीपता मुक्ती म्हणतात. त्या देवतेचे स्वरूप प्रास होऊन सहाणे याला स्वरूपता मुक्ती म्हणतात. ही तिसरी मुक्ती आहे.}
“देवस्वरूप जाला देही । श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाहीं । स्वरूपतेचें लक्षण पाहीं । ऐसें असे ॥ २५॥”
{त्याला विष्णूचे रूप मिळाले तरी त्यास श्रीवत्स, कौस्तुभ मणी व लक्ष्मी यांची प्राप्ती होत नाही. स्वरूपता मुक्तीचे लक्षण हे अशा प्रकारचे आहे.}
“सुकृत आहे तों भोगिती । सुकृत सरतांच ढकलून देती । आपण देव ते असती । जैसे तैसे ॥ २६॥”
{पुण्याचा साठा असेपर्यंत त्या त्या लोकातील भोग भोगावयास मिठ्यात. पुण्याचा पूर्ण क्षय झाला की तेधून ढकलून देतात. मात्र त्या लोकातील देव तेथे तसेच पूर्वीप्रमाणेच असतात.}
“म्हणौनि तिनी मुक्ति नासिवंत । सायोज्यमुक्ती ते शाश्वत । तेहि निरोपिजेल सावचित्त । ऐक आतां ॥ २७॥”
{या तिन्ही मुक्ती नाशिवंत आहेत. सायुज्यमुक्ती ही अविनाशी आहे. ते कसे ते आता सांगतो. चित्त सावध ठेवून ऐकावे.}
*ब्रह्मांड नासेल कल्पांतीं । पर्वतासहित जळेल क्षिती । तेव्हां अवघेच देव जाती । मां मुक्ति कैंच्या तेथें ॥ २८॥”
{कल्पांती ब्रह्मांडाचा नाश होतो. पर्वतासहित भूमी जळून जाईल तेव्हा सगळे देवही जातात. तेव्हा मग तेथल्या मुक्ती कशा राहणार ? }
“तेव्हां निर्गुण परमात्मा निश्चळ । निर्गुण भक्ती तेहि अचळ । सायोज्यमुक्ती ते केवळ । जाणिजे ऐसी ॥ २९॥”
{याप्रमाणे कल्पांत जरी ओढवला तरी निर्गुण निश्चळ परमात्मा जशाच्या तसाच असतो. तो नाहीसा होत नाही. त्याचप्रमाणे निर्गुण भक्तीही अचलच असते. तिचाही नाश होत नाही. सायुज्यमुक्ती ही केवळ शाश्वत असते, हे जाणून घ्यावे.}
“निर्गुणीं अनन्य असतां । तेणें होये सायोज्यता । सायोज्यता म्हणिजे स्वरूपता । निर्गुण भक्ती ॥ ३०॥”
{निर्गुण परमात्म्याशी अनन्य असणे हीच सायुज्यता होय. सायुज्यता म्हणजे स्वस्वरूपता. तिलाच निर्गुण भक्ती म्हणतात.}
हे सर्व वाचून सामान्य मनुष्याला प्रश्न पडतो की मी क्षणभरच काय तासंतास देवळाच्या समोर उभा असतो, कारण माझे घर देवळाच्या समोरच आहे, पण मुक्तीचे सोडा, कणभर देखील मन:शांती प्राप्त होत नाही, याला काय करावे ? याचे उत्तर माऊली आपल्याला पुढे सांगत आहेत.
संतांची वचनांचे अर्थ कळण्यासाठी मनुष्याची त्या विषयातील थोडी तयारी असावी लागते. मूल सकाळी शाळेत गेले आणि संध्याकाळी शिक्षण पूर्ण करून घरी आले असे होत नाही. तद्वतच संत साहित्याचे आहे. माऊली आपल्याला देवाच्या दारी उभे राहायला सांगत आहेत. सामान्य मनुष्य देवाच्या दारी याचा अर्थ देवळाच्या दारी असा घेत असतो. म्हणून अभंग वाचता वाचता तो मनाने देवळाच्या दारी जाऊन उभा राहतो, पुढची ओळ वाचतो आणि त्याला त्वरित देवाचे दर्शन व्हावे अशी अपेक्षा असते, पण तसे होत नाही. याला अनेक कारणे आहेत.
सर्व संतांनी सांगितले आहे की देव सर्वत्र आहे. देव नाही अशी जागाच नाही. जशी हवा नाही अशी जागा नाही, आकाश नाही अशी जागा नाही, तसे देव नाही अशी जागा नाही. थोडक्यात देव सर्वत्र आहे याचे भान ठेवणे, ते निरंतर टिकणे म्हणजे देवाच्या दारी उभे रहाणे. थोडक्यात आपण नित्य देवाच्या दारी उभे आहोत. याची जाणीव देवाला आहेच, परंतु आपल्या डोळ्यांवर मायेचा पडदा असल्याने देव समोर आहे याची जाणीव आपल्याला अत्यंत क्षीण असते. ही जाणीव विकसित करणे महत्वाचे. ते कार्य भगवंत संतांच्या माध्यमातून करीत असतो.
मनुष्य देवळात जातो, तेव्हा तो देवळाबाहेर आपल्या चपला काढून ठेवतो. देवळाचा उंबरठा ओलांडताना आपला मान, अभिमान, प्रपंच बाहेर ठेवून देवाचे दर्शन घ्यावे असे त्यात अभिप्रेत असते, परंतु मनुष्य देवळात एकटा जात नाही, त्यासोबत वरील सर्व सोबती असतात, त्यामुळे देव त्याला दर्शन देत नाही. एक मनुष्य देवळाबाहेर भिक मागतो आणि हा देवळात जाऊन भीक मागतो.
माऊली क्षणभर उभे रहायला सांगतात. कोणतीही गोष्ट क्षणात होत असते. क्षण युगाचा निर्माता आहे असे म्हटले जाते. काळ अनंत आहे, त्यामानाने आपले आयुष्य क्षणभरच!! बर कोणत्या क्षणाला मृत्यू येईल हे मनुष्याला माहीत नसते, तसे कोणत्या क्षणाला सद्गुरू कृपा करतील हे ज्ञात नसते.
उभा असलेला मनुष्य जागा असतो. त्याचे डोळे उघडे असतात, म्हणजे तो नीट पाहू शकतो. उभा मनुष्य सतत सावध असतो. इथे समर्थांची शिकवण आठवते.
“अखंड सावधान असावे | दुश्चित कदापि नसावे ||” थोडक्यात मनुष्याने क्षणोक्षणी अत्यंत सावध राहून सर्वत्र भरून राहिलेल्या देवाची अनुभूती घेण्यासाठी अखंड नामस्मरण करण्याचा प्रयत्न करायला हवा.
माऊलींनी सांगितल्याप्रमाणे वागले तर आपल्याला त्याला चारी मुक्ती नक्कीच लाभतील. हे संत वचन आहे, ते सत्य असणारच. मग आपल्या मनात प्रश्न होतो, आम्हाला त्याचा लाभ होणार की नाही आणि कसा होणार ? सर्व संत उत्तम शिक्षक असतात. माऊलींनी याचे उत्तर पुढील ओळीत दिले आहे.
“हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा।पुण्याची गणना कोण करी।।२।।”
माऊली म्हणतात, तू सतत हरिचे नाम घे. त्याची गणना करू नकोस. मनुष्याला जिवंत राहण्यासाठी श्वसन करावे लागते. मग मनुष्य असे म्हणत नाही की आज मी फक्त पाचवेळाच श्वसन करेन, मला कंटाळा येतो, सारखे श्वसन करण्याचा. तद्वतच मनुष्याने सतत नामस्मरण करावे, हरिचे नाम घ्यावे असे माऊली आपल्याला सांगतात. नामयोगी असलेले माझे सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात,
“नाम सदा बोलावे, गावे, भावे जनासी सांगावे”
मुखात नाम येणे किंवा नामस्मरण करावेसे वाटणे हेच मुळात मोठे पुण्य आहे. मानव देहधारी असलेला जीवच फक्त नाम घेऊ शकतो, बाकी इतर योनींतील जीवांना
ही सुविधा उपलब्ध नाही आणि त्यामुळे नाम घेण्यासाठीच जीवाला मनुष्य देह प्राप्त झाला आहेस असे सर्व संत सांगतात. मनुष्याने हे ध्यानात ठेवून अखंड नाम घेण्याचा प्रयत्न करावा. हेच मोठे पुण्य.
नाम सतत घेतले पाहिजे. वेळ मिळाला की नाम घेतले पाहिजे. असे करता आले तर नामाशिवाय क्षण ही फुकट जाणार नाही. नामस्मरणाला वेळ मिळत नाही ही लंगडी सबब आहे. जेवढा रिकामा वेळ मिळतो तेवढ्या वेळात जरी रोज नामस्मरण केले तरी नामाच्या राशी पडतील. खरोखर आपण रोज किती वेळ फुकट घालवितो.
नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की, नाम उच्चारणारा व ते ऎकणारा दोघेही उध्दरून जातात. भक्ताचे सर्व दोषहरण करुन नाम त्याला दोषमुक्त करते, म्हणून जड-जीवांना तारणारे नामस्मरणच आहे. एकाच नामस्मरणाची शेकडो-हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात. रामाची भक्ती करणारा राम होतो. कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो. म्हणून मनुष्याने पापपुण्याच्या हिशेबात न गुंतता नाम घेणे जास्त हिताचे.
जय जय राम कृष्ण हरी !!!!
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈