इंद्रधनुष्य
☆ कुबेरकाठी — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
महादेवराव शिर्के सरकार म्हणजे सातार जवळच्या एका गावातलं बडं प्रस्थ. स्वभावाने अगदी लाख मोलाचा माणूस. दहा गावाचं वतन असलं तरी बोलण्यात काडीचाही माज नाही की अहंकार नाही. तालेवारापासून गोरगरिबांपर्यंत प्रत्येकाला आदराने वागवणार, म्हारामांगाच्या पोरींबाळींनाही ताई-माई असं आदरार्थी संबोधणार, आदराने अदबीने चौकशी करणार.
त्यामुळे सरकारांबद्दलही गावच्या पंचक्रोशीत सगळ्यांना माया होती, जिव्हाळा होता. एकदा असंच कुठंसं वाचलं नी सरकारांच्या डोक्यात नर्मदा परिक्रमा करायचं खुळ घुसलं, अहो ही कथा आहे सत्तरऐंशी वर्षापूर्वीची, तेव्हा ना गाड्या ना बस अशा वेळी नर्मदा परिक्रमा करायची म्हणजे खुळच नव्हे तर काय. पण आलं सरकारांच्या मना तिथं देवाचं चालंना अशातली गत होती.
मग काय एकदा मनात आलं आणि महिनाभरात सरकारांनी प्रस्थान केलं. पार अगदी मुंडन वगैरे करुन, यथासांग अकरा महिन्यात त्यांनी परिक्रमा पूर्ण करुन गावी आले देखील… छान पारणं करायचं ठरवलं. गावाच्या शेजारच्या परिसरातील ब्राह्मणांना भोजन द्यावं असं सरकारांच्या मनी आलं….
विष्णुशास्त्री अभ्यंकरांना बोलावणं धाडलं गेलं…. विष्णुशास्त्री म्हणजे वेदपारंगत, प्रचंड बुध्दीमान आणि करारी ब्राह्मण होते. गावात कुठेही रुद्रावर्तन, महारुद्र, दूर्गापाठ असला की विष्णुशास्त्रींशिवाय चालत नसे. शास्त्रीबुवा आले सरकारांना भेटायला….
“बोला सरकार…” शास्त्रीबुवा म्हणाले.
शिर्केसरकारांनी सदरेवरुन उठून शास्त्रीबुवांना साष्टांग नमस्कार केला…
“सरकार, तुमच्या परिक्रमेविषयी समजलं. मी येणारच होतो तुम्हाला भेटायला आणि वृत्तांत ऐकायला. अहो कठीण असते हो परिक्रमा… तुमचं कौतुक वाटतं सरकार. संपत्तीच्या रुपाने प्रत्यक्ष लक्ष्मीमाता तुमच्या घरी पाणी भरत असतानाही तुम्ही सरस्वती मातेशी सख्य जपून ठेवलं आहे. तुमचा आध्यात्माचा, धर्माचा व्यासंग उत्तम आहे. आणि त्यात तुम्ही परिक्रमेसारखी दिव्य गोष्टही तितक्याच सुरेखपणे करता हे विशेष आहे. असा ज्ञान, विद्वत्ता आणि धनाचा संगम क्वचितच बघायला मिळतो. बरं बोला…काय काम काढलंत मजकडे?” शास्त्रीबुवांनी विषयालाच हात घातला.
“त्याचं असं शास्त्रीबुवा, मला परिक्रमेवरुन सुखरुप आल्यानं पारणं करायचंय, गंगापूजनही करायचं आहेच. ते झाल्यावर दुसऱ्या दिवशी ब्राह्मणभोजन घालायचं आहे. त्याची नियोजनाची जबाबदारी मी तुमचेवर सोपवतो…कितीही माणसं येऊ देत…”
“ठीक आहे…” इतकं बोलुन शास्त्रीबुवा निघाले.
तिथून निघून घरी येत असताना महारवाड्यावरुनच वाट जात होती. त्याकाळी विष्णुशास्त्री हे जितके बुध्दीमान ब्राह्मण होते, ज्ञानी होते हे सत्य असलं तरी ते जातपात आणि शिवाशिव मानत नसत. ही बाब अनेकांना खटकायची, दोन वेळा तिथल्या ब्रह्मवृदांनी त्यांना सहा सहा महिने वाळीत टाकलंही होतं… पण ते नसले की अनेक धर्माकर्माची कामं अडून रहायची. आणि विष्णूशास्त्री काही सुधारण्यातले नव्हते त्यामुळे आता त्यांच्या या मोकळ्याचाकळ्या वागणूकीकडे सोयिस्कर दुर्लक्ष करण्याची लोकांना सवय झाली होती.
महारवाड्यात सुमसाम शांतता होती. पारावर गोपाळ, शनवाऱ्या, बापू असे चारपाच लोक बसलेले होते. शास्त्रीबुवांना बघून ते जागेवरुन उठले, नमस्कार केला… परिसरात या वर्षी दुष्काळ पडला होता. प्रत्येकाचे खायचे वांधे झाले होते, पोरं उपाशीच होती. कशीबशी पेज पिऊन दिवस कंठणं सुरु होतं… काय करावं ते समजत नव्हतं. शास्त्रीबुवांनी सगळं ऐकलं…
”बापू, एकूण किती डोकी आहेत रे महारवाड्यात तुमच्या… धाकली, कडेवरची, धावती आणि म्हातारी कोतारी पकडून सगळी सांग…” शास्त्रीबुवा विचारते झाले.
बापूने माणसं मोजायला सुरुवात केली. तो नावं घेत होता, शास्त्रीबुवा माणसं मोजत होते… तब्बल ९६ लोक झाले…घरी जाण्याऐवजी शास्त्रीबुवा पुन्हा वाड्याच्या दिशेने उलट फिरले…
***
“पण…पण शास्त्रीबुवा… हे कसं शक्य आहे” सरकार म्हणाले, “लक्षात घ्या, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. पण मला ब्राह्मणभोजन घालायचं आहे… गावजेवण मी देईन की सवडीने… त्यात काय मोठंसं…? पण…..”
“सरकार, तुम्ही बोललात की तुम्ही माझ्या शब्दाबाहेर नाहीत… बरोबर… बघा श्रीमद्भग्वद्गीतेत उल्लेख आहे प्रत्यक्ष भगवानच म्हणतात की _“अहं वैश्वानरो भुत्वा, प्राणिनां देहमाश्रिता:… म्हणजे समस्त जीवांच्या पोटी भुकेच्या रुपाने असणारा वैश्वानर नावाचा अग्नि म्हणजेच मी… सरकार, हे बघा तुम्ही ब्राह्मणभोजनाची जबाबदारी मजवर सोपवलीत म्हणजे मी काय करणार तर साताऱ्यापासून वडूजपर्यंत सगळ्या गावातली ब्राह्मणमंडळी गोळा करुन आणणार… चारशे ब्राह्मण होतील… जे ते घरी जेवणार ते इथे येऊन जेवतील. बरोबर आहे? तर जिथे खरी जिवंत भूक आहे त्या पोटांना चार चांगले घास द्यायला हवेत तर तुम्हाला शतपटीने पुण्य लाभेल महादेवराव…
“आणि अहो ब्राह्मण म्हणजे कोण हो? चार वेद येतात तो ब्राह्मण नाही… ब्रह्म जानाति इति ब्राह्मण:… जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण… आणि ही गावकुसाबाहेरची उपाशी जनता आहे ना, ती नुसतं ब्रह्म जाणत नाही तर पोटातली आग, तो वैश्वानर म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वर ती आग जागी ठेवतो. या भयाण दुष्काळातही ती मंडळी पेजपाणी पिऊन दिवस ढकलतात पण चोरीमारी करत नाहीत… तेच खरं जिवंत ब्रह्म हो…!”
सरकार निरुत्तर झाले, त्यांचे डोळे ओले झाले. विष्णुशास्त्रींना साष्टांग नमस्कार केला…
***
पुढच्या गुरुवारी पंगत बसली… सदरेवर चारशे ब्राह्मण आणि अंगणात शंभरेक महार असा सोहळा पार पडला…सगळ्यांना एकच वागणूक होती, तसेच सारखेच पदार्थ होते… जिथे ब्रह्मवृदांना केशरीभात होता तिथे महारांनाही केशरीभात, पुऱ्या, भात, आणि इतर पक्वान्नांचं साग्रसंगीत भोजन होतं. भोजनोत्तर प्रत्येकाला दक्षिणा दिली गेली. बायकांना साडीचोळी दिली गेली… ब्राह्मणांसोबत महारही तृप्त होऊन निघू लागले…
सरकार आणि विष्णुशास्त्री सदरेच्या जवळ अंगणात उभे राहून हा अन्नपूर्णेचा तृप्त सोहळा भरल्या डोळ्यांनी बघत होते. इतक्यात एक वृध्द महार जवळ आला, दोघांनाही त्याने खाली लवून नमस्कार केला…
”बोला आजोबा…काय म्हणताय? झालं का जेवण?” सरकारांनी विचारलं.
“व्हय…झालं जी… मन तृप्त झालं… लई दिसांनी आसं ग्वाड जेवान मिळाळं खायला… दक्षिणा बी मिळाली”
“मग… अजून काही हवंय का?” शास्त्रीबुवा विचारते झाले.
“न्हाई… पण या बदल्यात मला तुम्हाला काही द्यायचंय… ते स्विकार करा…”
सरकार आणि शास्त्रीबुवा एक क्षण स्तिमित झाले… डोकं जड झाल्यागत झालं दोघांचं…
त्या म्हातारबुवांनी खांद्यावरच्या झोळीतून हात घालून दोन फुटभर लांबीच्या काठ्या काढल्या… काळ्याकभिन्न, शिसवी आणि चकचकीत पॉलिश कराव्यात तशा… दोघांच्या हातात दिल्या… खरं म्हणजे आता शिवायचं नाही वगैरे दोघे क्षणभर विसरुन गेले… कसल्यातरी संमोहनाचा असर होता की काय देव जाणे?
“याला कुबेरकाठी म्हणतात… आत जंगलात गावते… ही अशीच ठेवायची… तिजोरीत, जपून ठेवायची… काही करायचं नाही. फक्त वर्षातून एकदा रामनवमीला बाहेर काढायची, पूजा अर्चा करायची. शक्य होईल तसं गावजेवण किंवा गरीबांना भोजन घालायचं आणि सूर्यास्ताला परत ठेऊन द्यायची आत, ती पुन्हा पुढच्या रामनवमीलाच काढायची… तुम्हा दोघांना काही कमी पडणार नाही… तुमच्या पुढच्या जितक्या पिढ्या हा नियम पाळतील तेवढे दिवस तेवढी वर्षे ही काठी तुमच्याकडे असेल… नावासारखीच आहे ही कुबेरकाठी… कुबेराची धनसंपत्ती देणारी…” इतकं बोलून तो म्हातारबा निघून गेला…
पुढच्याच क्षणी दोघे भानावर आले… काय झालं ते समजायला मार्गच नव्हता… आसपास धावाधाव करुन शोध घेतला तर समजलं असा कोणी म्हातारबा महारवाड्यात नाहीच आहे मुळात… तो काठी टेकत टेकत असा कितीसा दूर गेला असेल? पण आठी दिशांना माणसं पाठवून कोणी दिसलं नाही तेव्हा हा चमत्कार आहे हे दोघांच्याही ध्यानात आलं…!
***
आज सत्तरऐंशी वर्षे झाली या घटनेला तरीही रामनवमी असली की शिर्के आणि अभ्यंकर घराण्याचे सध्याचे वंशज एकत्र येतात. दोन्ही कुबेरकाठ्या अत्यंत गुप्तपणे बाहेर काढल्या जातात…
दोन्ही काठ्यांचे यथसांग पूजन होते, विष्णूसहस्त्रनामाचा अभिषेक होतो…
ही पूजा अतिशय गुप्तपणे कोणालाही समजणार नाही अशाप्रकारे होते. आणि मग गावजेवण, भंडारा होतो… शेकडो माणसं आजही जेवून जातात…
दोन्ही घराण्याचे आजचे वंशज एकमेकांशी मैत्री टिकवून आहेत…
दोन्ही घराण्यात या कुबेरकाठीच्या निमित्ताने एक विशेष प्रेमाचे स्नेहबंध निर्माण झाले आहेत.
एकत्र “कॉलेबरेशन” मध्ये काही प्रोजेक्ट्सही सुरु आहेत… दरवर्षी भंडारा झाला की सध्याचे वंशज दुपारी १ वाजता एकत्र येतात, प्रवेशद्वाराकडे नजर ठेवून असतात…
तिथे एक ते सव्वाच्या दरम्यान एक वृध्द व्यक्ती दिसते… त्याचं दर्शन लांबूनच घ्यायचं असा संकेत आजही पाळला जातो… तो वयोवृध्द आजोबा जेवून निघालेला असतो… तो मागे वळतो या दोघांकडे कटाक्ष टाकतो, त्यांनी लांबूनच केलेल्या नमस्काराचा सस्मित चेहऱ्याने स्विकार करतो आणि काठी टेकत निघून जातो. संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत काठ्यांना घरातील मंडळी साष्टांग नमस्कार करतात… आणि दोन्ही कुबेरकाठ्या आपापल्या तिजोरीत बंदिस्त होतात… त्या पुढच्या रामनवमीला तिजोरीबाहेर येण्यासाठीच…!!!
(कथा सत्य आहे. तपशील, गावाची नावे, आडनावे यात बदल केले आहेत… अधिक सविस्तर डिटेल्स विचारु नयेत. कथेचा आनंद घ्यावा आणि कथा सत्य की असत्य? हे ठरविण्याचा अधिकार वाचकांनाच आहे )
लेखक/संकलक : अनामिक
प्रस्तुती – श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈