सौ. सुचित्रा पवार
इंद्रधनुष्य
☆ पानिपत -हृदय द्रावक शोकांतिका – भाग – 2 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
(श्री. विश्वास पाटील यांच्या “ पानिपत “ या गाजलेल्या कादंबरीचा परामर्श )
(पण प्रचंड नामुष्की, मानहानीही पत्करावी लागली ) इथून पुढे —–
खरेतर दत्ताजी शिंदेच्या पराभवापासूनच पानिपतच्या युद्धाची ठिणगी पडली आणि हा हा म्हणत तिने उग्र वणव्याचे रौद्र अक्राळविक्राळ रूप धारण करत लाखो बळी घेतले. कोणतेही युद्ध जिंकायला प्राणांची बाजी लावणारे शूरवीर लढवय्ये हवेतच, पण युद्धनीतीही तितकीच महत्वाची असतेच. युद्धभूमीची आणि आसपासच्या भौगोलिक परिस्थिती आणि हवामानाची सुद्धा बिनचूक माहिती हवी असते. शत्रूच्या शस्त्रास्त्राच्या तोडीची हत्यारे हवीत, ती चालवणारे प्रशिक्षित सैनिकही हवेत. आणीबाणीच्या प्रसंगी अचूक निर्णय क्षमता हवी. दत्ताजी शिंदेंच्या बाबतीत हेच झाले. गिलच्यांच्या फौजांकडे आधुनिक बंदुका होत्या. याउलट मराठी फौजेकडे पारंपारिक हत्यारे होती. काटेरी दाट जंगलात गिलचे लपून बसायचे आणि गोळ्यांचा मारा करायचे. बोचरी थंडी आणि परका मुलुख, त्यात महिनाभर तळ देऊन बसलेल्या सैनिकांना ऐनवेळी कुठून रसदच मिळाली नाही. तरीही उपाशी पोटी ‘करू वा मरू’ म्हणत चिवटपणे झुंज देत दत्ताजीने प्राणांची बाजी लावली. दत्ताजीचे मुंडके छाटून तलवारीवर लटकवण्यात आले. लपून जीव वाचलेले मूठभर सैनिक सैरावैरा धावले.
पानिपतचा खरा सूत्रधार खलनायक नजीबखान साधा वजीर, पण त्याने मराठ्यांचा कायमचा बिमोड करून, दिल्लीचे तख्त बादशहाच्या अमलाखाली आणून, स्वतःस एखादी बक्षिसी मिळवायच्या स्वार्थी महत्त्वाकांक्षी इच्छेला कोणी भीक घालणार नाही म्हणून त्याला ‘जिहादचा’ रंग देऊन स्वतःची इच्छा तृप्त केली. त्यासाठी त्याने अफगाणहून अब्दालीला बोलवले. खरे तर मराठ्यांच्या मेहेरबानीवर जगलेला तो एक अस्तनीतला निखारा आणि विषारी सापाचे पिलू होते. बऱ्याच सरदारांना त्याची कुरापतखोर वृत्ती माहीत झाली आणि या जहरी सापाला वेळीच ठेचायचे ठरवले. पण मल्हारराव होळकरांसारख्या जुन्या जाणत्या नेत्याने सतत अभय देऊन हा साप मोठा केला आणि एके दिवशी उपकारकर्त्यालाच तो डसला. नुसता डसलाच नाही, तर त्याने विषारी गरळ ओकून मराठेशाही गिळंकृत केली आणि मराठी सत्तेचं पानिपत केलं.
दिल्ली काबीज केल्यानंतर खरे तर अब्दालीला भिडायचे असे पक्के झाल्यावर मोर्चेबांधणीस सुरुवात केली. त्यासाठी रसद आणि वेगवेगळ्या सरदारांना पाठिंब्यासाठी, हातमिळवणीसाठी विनंती केली. पण नजीबने शुजाउद्दौलासारख्या नेत्याविरुद्ध अब्दालीचे कान भरून जिहादची शपथ घालून, अब्दालीला मिळण्यास भाग पाडले. जाटासारख्या नेत्यांना कधी गोड बोलून तर कधी धमकी देऊन, तर कुणाला पदांची आमिषे दाखवून मराठयांना मदत वा कुमक मिळू दिली नाही. रसदीचे ओघ मधेच अडवले, लुटले गेले. महत्वाचे पत्रव्यवहार मध्येच अडवून स्वारांना मारले गेले. अशा तऱ्हेने मराठ्यांचे नाक तोंड दाबून त्यांना गुदमरायला लावले. त्यातच लढणारे कमी आणि हौसे नवसे गवसे, बायका मुले ,यात्रेकरू, खायला कहार आणि धरणीला भार अश्या लुंग्यासुंग्यांची फौज भाऊसाहेबांच्या पदरी जास्त होती.( जे शिवरायांनी त्यांच्या कारकिर्दीत कधीच केले नाही) त्यामुळं तातडीचे निर्णय भाऊसाहेबाना घेणे अवघड झाले. बऱ्याचदा महत्वाचे निर्णय घेतल्यावर जेरे-जोशीसारख्या पंचांगकर्त्यांनी मुहूर्त, वेळ वगैरेची प्रतिकुलता दाखवून भिववले. युद्धात महत्त्वाचे निर्णय मुहूर्त बघून घेत नसतात, तर सभोवतालची परिस्थिती पाहून घ्यायचे असतात. संधी साधून डाव टाकायचा असतो. त्यातच जेष्ठ श्रेष्ठत्वाचे अंतर्गत वाद, यामुळं भाऊसाहेबाना विवश केले. कोणतेच निर्णय त्यांना ठोसपणे घेता येईनात. एकीकडे उपासमार आणि एकीकडे सगळीकडूनच जखडलेपणा,अन्नधान्य- चारा टंचाई, हे कमी की काय म्हणून निसर्गाची प्रतिकुलता ! यमुनेला दुथडी भरून आलेला पूर. पानिपतच्या पराभवाचे हे जणू संकेत होते. कुंजपुऱ्याचा पाडाव आणि त्यातून मिळालेले थोडेसे धन ही एक बाब दिलासा देणारी आणि मराठ्यांचा उत्साह वाढवणारी होती. पण एवढ्या प्रचंड समुदायास आणि जनावरांस जगवणे मुश्किल होते. जनावरे मरू लागली माणसे उपासमारीने विव्हळू लागली. त्यांचे हाल पाहून भाऊसाहेबांचे मन तडफडू लागले. जवळचे सोने नाणे सर्व विकून झाले. सड्या फौजा कुणीकडून कशाही माळरानाने, आडवाटेने तुकड्या तुकड्याने बाहेर पडून शत्रूवर तुटून पडल्या असत्या, पण बायका मुलांसह असल्यामुळे कुठलाच ठोस निर्णय घेता येईना आणि मार्ग निघेना. म्हणून शेवटी करू वा मरू म्हणून गिलच्याला तोंड देतच दिल्ली गाठू असा निर्णय झाला. त्यासाठी ‘गोलाई’ची व्यूहरचना करण्यात आली. कारण पानिपतच्या त्या उघड्या विस्तीर्ण मैदानावर गनिमी कावा उपयोगी नव्हता. पण इब्राहिम गारदीच्या व्यूहरचनेला विंचूरकर आणि मल्हारराव होळकरांसारख्या जेष्ठ श्रेष्ठ नेत्यांचा विरोध तर होताच, पण कालच्या मिसरूड फुटलेल्यांचे आम्ही ऐकायचे? ही ’अहं श्रेष्ठवादी ‘ असूया देखील ! एकीकडे नजीबसारख्या विषारी पिल्लाला मानसपुत्र मानून त्याला सहानुभूती देणारे होळकर, इब्राहिम गारदीच्या प्रामाणिकपणावर मात्र साशंक होते. आतून धुमसत होते. खरे तर कुंजपुरा इब्राहिम गारदीच्या व्यूहरचनेने आणि तिथल्या भूप्रदेशाच्या त्याच्या अचूक माहितीमुळेच जिंकला होता. म्हणूनच गोलाईच्या व्यूहाने गिलच्याला कापत कापत पुढे सहज जाऊ अशी अटकळ आणि खात्रीही होती. पण युद्धाला जसे तोंड फुटले आणि मराठ्यांच्या बाजूने विजयश्रीचा कौल पडू लागला, तेव्हा होळकरांच्याच मेहेरबानीवर पदरी असलेल्या कॅडम्याड पथकाने हुल्लडबाजी केली, आणि ‘ मराठे हरले,’ असा कांगावा सुरू केला.
क्रमशः……
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈