श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘मेड इन इंडिया’ लिहिण्यासाठी… – लेखक : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर  ☆

स्व.अर्देशिर गोदरेज

गोदरेज या भारतीय कंपनीने उत्पादनावर ‘मेड इन इंडिया’ लिहिण्यासाठी साठी  इंग्रजांशी पंगा घेतला.  गोदरेज कंपनी माहीत नाही अशी एकही व्यक्ती असणे शक्य नाही. भारतीय व्यापाराला उंचीवर नेऊन ठेवण्यात या कंपनीचा मोठा हात आहे. या कंपनीच्या संस्थापकांनी आपल्या प्रॉडक्टवर ‘मेड इन इंडिया’ लिहिण्यासाठी इंग्रजांशी पंगा घेतला. त्याची कहाणी :-

१८९४ मध्ये मुंबईच्या दोन तरुण वकिलांनी खळबळ माजवली होती. एकाने साउथ आफ्रिकेत तर एकाने ईस्ट आफ्रिकेत. दोघांचे विचारही एकच होते. वकिली पेशातं असलो तरी अजिबात खोटं बोलायचं नाही. त्यातील एक होते महात्मा गांधी व दुसरे होते अर्देशिर गोदरेज. ज्यांनी  गोदरेज समूह  बनवला. सत्यवचनी असणारे आर्देशीर आपल्या या स्वभावामुळे वकिली पासून लवकरच दूर झाले. व १८९४ मध्ये ते मुंबई येथे परत आले. एका फार्मासिटीकल कंपनीत केमिकल असिस्टंटची नोकरी सुरू केली. परंतु पारसी बाणा असल्यामुळे आपणही आपला स्वतःचा काही व्यवसाय करावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती. काम केमिस्ट चे असल्यामुळे त्यांना एक कल्पना सुचली. आपण शस्त्रक्रियेसाठी लागणारी कात्री आणि ब्लेड तयार करूया. ही उत्पादने फक्त ब्रिटिश कंपन्याच तयार करत होती. म्हणून त्यांचा हा विचार पक्का झाला. 

सुरुवातीच्या भांडवलासाठी त्यांनी पारसी समाजातील एक हितचिंतक श्री मेरवानी यांच्या कडून ३००० रुपये कर्ज घेतले. आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधनं एका ब्रिटीश कंपनीसाठी तयार करायला सुरुवात केली. हे प्रॉडक्ट विकण्याची जबाबदारी त्या कंपनीची होती. गोदरेज यांचे म्हणणे असे होते की, ते त्यांच्या प्रोडक्टवर ‘मेड इन इंडिया’ असे  लिहितील. पण ब्रिटिश कंपनीचे म्हणणे होते की जर प्रोडक्टवर ‘मेड इन इंडिया’ असं लिहिलं तर उत्पादनाची विक्री होणार नाही. म्हणजे प्रॉडक्ट तर गोदरेज यांनी तयार करायचे पण विकणार मात्र ब्रिटिशांच्या नावाने. 

दोन्ही पक्ष आपापल्या बाजूला ठाम राहिल्याने त्याचा परिणाम असा झाला की गोदरेज यांना त्यांचा पहिला वहिला धंदा बंद करावा लागला. त्यांचं प्रोडक्ट चांगलं नव्हतं म्हणून नाही, तर माझ्या देशात तयार झालेल्या वस्तूला मी दुसर्‍या देशाचं नाव का देऊ? या तत्त्वाशी ठाम राहिल्यामुळे. 

पहिलि व्यवसाय बंद पडल्यानंतर आर्देशीर निराश झाले. त्यांनी आपली नोकरी चालूच ठेवली. पण डोक्यातून व्यवसाय जात नव्हता. एक दिवस वर्तमानपत्रातील एका बातमीने त्यावर त्यांची नजर गेली. मुंबईतील चोरीची घटना होती ती आणि त्या बरोबर मुंबई पोलीस आयुक्तांकडून एक निवेदन पण देण्यात आलं होतं की, “सर्व लोकांनी त्यांच्या घराच्या आणि कार्यालयाची सुरक्षा सुधारावी.” आर्देशीर च्या डोक्यात व्यवसायाचा किडा पुन्हा वळवळू लागला. कुलूप तयार करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. त्या वेळी भारतातील सर्व कुलपं हाताने तयार केली जात. ती सुरक्षित नव्हती. त्यांनी अशी कुलपं बनवायचं ठरवलं की, जे तोडणं कठीण असलं पाहिजे. कुलपं तयार करण्याच्या कल्पनेसह ते पुन्हा मेरवानजी कडे गेले. पहिले कर्ज न फेडल्याबद्दल त्यांनी त्यांची माफी मागितली आणि मग त्यांच्या समोर कुलपाची नवी योजना मांडली.

मेरवानी स्वत: एक व्यापारी होते. त्यांनी पण वर्तमान पत्रातील ती बातमी वाचली होती. थोड्या चर्चे नंतर मेरवानींनी त्यांना मदत करण्याचे कबूल केले. सक्सेस हाय वे पुस्तकात मेरवानी आणि त्यांच्यातील संवाद असा लिहिला आहे की, जेव्हा मेरवानींनी त्यांना विचारले, ‘‘मुला, तुमच्या जातीत किंवा घरात असं कोणी आहे का? की ज्यांनी कुलूप तयार केलं आहे?’’ त्यावर त्यांनी उत्तर दिलं, ‘‘मी पहिला आहे की नाही हे मला माहीत नाही, पण तुमच्या सारख्या महान माणसाच्या मदतीनं मी नक्कीच सर्वश्रेष्ठ बनून दाखवीन.’’

जिद्द आणि आत्मविश्‍वास याचं हे उत्तम उदाहरण आहे. तर अशा रितीने मेरवानी कडून आर्देशीर यांना परत कर्ज मिळाले. ७ मे १८५७ गोदरेज यांनी कामाला सुरुवात केली. बॉम्बे गॅस वर्क्सच्या बाजूला कुलपं बनवण्याचं काम सुरू केलं. गुजरात आणि मालबार हून १२ शिकलेले कारागीर आणले गेले. ‘अँकर’ या नावाने कुलपं बाजारात आली. या सगळ्यात महत्त्वाचं होतं ते एक वर्षाच्या गॅरेंटीचं पत्र ज्यामुळे त्याच्या विक्रीला मागणी आली. तेव्हा कोणत्याही कुलपाला गॅरेंटी नव्हती. गोदरेजचं कुलूप दुसर्‍या कोणत्याही चावीने उघडू शकत नव्हते.

अशा तर्‍हेने गोदरेजचं ताळं म्हणजेच कुलूप भारताच्या लोकांचं विश्‍वासाचं स्थान बनलं आणि आर्देशीर गोदरेज यांचा बिझनेस चांगला चालू लागला. आता त्यांना नवीनवीन उद्योगांची कल्पना सुचू लागली. मग गोदरेजचं कपाट बनवलं गेलं. कुलपं आणि कपाट हे गोदरेजचे ब्रँड झाले तरीही आर्देशीर गोदरेज यांना अजून काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती. १९०६ मध्ये ते टिळकांच्या संपर्कात आले आणि स्वदेशी सिद्धांत अवलंबण्याची शपथ घेतली. आत्ता पर्यंत त्यांचा धाकटा भाऊ फिरोजशाह हाही त्यांच्या व्यवसायात सामील झाला. दोन्ही भावांचा कुलूप आणि कपाट व्यवसाय वाढत होता. भारतीयांवर ब्रिटिशांचे राज्य होते. त्यामुळे भारतीयांवर विविध प्रकारचे कर लागू होते.

आर्देशीर गोदरेज त्यामुळे खूप विचलित होते. १९१० मध्ये त्यांच्या आयुष्यात आणखी एक वळण आले. ज्यांच्याकडून त्यांनी कर्ज घेऊन व्यापार सुरू केला होता, त्याला एक भगिनी होती, तिचे नाव बॉयस होते. सीएच्या सल्ल्यानुसार गोदरेजनी बॉयसला आपला पार्टनर बनवले. मग कंपनीचे नाव ठेवले गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. काही दिवसांनी बॉयसने कंपनी सोडली, परंतु आर्देशीरने आजही कंपनीचे नाव तेच ठेवले, ‘गोदरेज अँड बॉयस’.

नंतर आर्देशीर लोकांच्या थेट संपर्कात आले. मग त्यांनी आंघोळीच्या साबणाचे उत्पादन सुरू केले. तेव्हा भारतात असलेल्या साबणात पशूंची चरबी वापरली जात असे. त्यामुळे हिंदूंची मन दुखावली जात म्हणून साबण तयार करण्याची व्यावसायिक संधीचा विचार त्यांनी केला. १९१८ साली गोदरेज कंपनीने दोन साबण तयार केले. असे एकेक उत्पादन वाढू लागली आणि गोदरेजचा कारभार वाढू लागला. हळूहळू कुटुंबातील मेंबर या बिझनेस मध्ये सामील झाले. मग वॉशिंग मशीन, फ्रीज, हेअर डाय, फर्निचर अशी उत्पादनं वाढू लागली आणि गोदरेज कंपनी नावारूपास आली आणि ‘मेड इन इंडिया’ हे वाक्य लिहायला नकार देणार्‍या ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून गादरेज कंपनीने आपला व्यवसाय दिवसेंदिवस वाढवला. मनात तत्त्व होतं, एक सचोटी होती आणि देशाबद्दल प्रखर अभिमान होता. म्हणूनच हे सगळं शक्य झालं. व्यवसायात पाऊल ठेवलं आणि तो व्यवसाय नावारूपाला आणला, इतका की, आज इतकी वर्षं झाली तरी गोदरेजचं स्थान अढळ आहे. 

संकलन – मिलिंद पंडित

कल्याण

प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments