श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

 

☆ ‘आनंदवन प्रयोगवन’ – लेखिका : सुश्री सुलभा तांबडे ☆ माहिती प्रस्तुती– सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

डॉ. विकास डॉ. भारती यांच्या सोबत दोन – तीन तास गप्पा मारल्या नंतर त्यांची खरी ओळख होते. बाबा आमटे यांच्यासारखा वाटवृक्ष असल्यामुळे विकास यांच्या कार्याची ओळख फारशी समाजाला झाली नाही. याची सल त्यांच्या बोलण्यातून जाणवली. पण आनंदवन व सोमनाथ प्रकल्पातील सर्व कल्पकता ही विकास यांची आहे. ते स्वतः अभियंता आहेत.

आनंदवन बाबा आमटेनी सुरु केले ते कुष्ठरोग्यासाठी तिथे त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध प्रकल्प राबविले जातात. प्रचंड मोठा आणि विस्तीर्ण आवार तोही प्लास्टिक मुक्त. कुठेही कसलाही केरकचरा नाही. असं हे आनंदवन आणि तिथे जे जे प्रकल्प राबविले ते समजून घ्यायचे असतील तर “आनंदवन प्रयोगवन “ हे पुस्तक वाचलंच पाहिजे.

पुस्तकाच्या नावाप्रमाणेच इथे अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत, तेही माफक खर्चात व भविष्यातही इतर खर्च करावा लागणार नाही हा दृष्टीकोण ठेवून. स्वयंपाक घरातील बाहेर पडणाऱ्या कचऱ्यापासून गोबर गॅस चालवला जातो. त्यामुळे गॅस खर्च वाचतो. शिवाय त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. स्वयंपाकघर एकच सर्वांनी तिथेच वेळेत येऊन जेवायचे असा नियम आहे. सर्वच हातांना काम करण्याची संधी असल्यामुळे त्या प्रोजेक्ट चे नाव संधीनिकेतन असे आहे. इथे काम करणाऱ्या लोकांना कुणाला हात नाही, पाय नाही, हात आहे तर बोटं नाहीत, डोळे असून कमी दिसते, कान असून ऐकायला येत नाही तरीही हे सर्व निरंतर कार्यमग्न. अनेक प्रकारच्या वस्तू इथे बनविल्या जातात त्याची विक्रीही केली जाते.

५० भाग माती, ४०भाग वाळू, १०भाग सिमेंट अशा मिश्रणापासुन विटा तयार करून त्या सावलीत वाळवून नंतर ४ ते ५ दिवस पाणी मारून त्या बांधकामाला वापरल्या आहेत. त्यामुळे आजतागायत गळती नाही, पंखा लागत नाही. अगदी कमी खर्चात घरं बांधली आहेत.

सोमनाथ २५० एकराचा शेती प्रकल्प. इतक्या मोठया क्षेत्रात केवळ एकच विजेची मोटार. सभोवताली जंगल असल्यामुळे जमिनीत पाण्याचे प्रमाण आहे. थोड्याश्या उंचवट्यावर पाणी अडवले आहे आणि तिथे बंधारा घातला आहे. हा बंधारा बांधण्यासाठी शेजारच्या खेड्यापाड्यातील सहा महिने प्लास्टिक कचरा, खराब ट्रकच्या मोठ्या टायर  असे गोळा केले. सिमेंट काँक्रीटच्या मिश्रणामध्ये  गोळा केलेला प्लास्टिक कचरा क्रश करून बंधाऱ्यावर ठेवलेल्या टायरमध्ये  भरला. टायरची मांडणी तीन पायऱ्यांप्रमाणे केल्याने पर्यटकांना झऱ्याचा अनुभव घेता येतो. या बंधाऱ्यातील पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून सिमेंटच्या बांधलेल्या पाठामधून संपूर्ण शेतीवर फिरवले जाते. या जमिनीचाच 21 एकराचा भाग उंचावर असल्यामुळे तिथे फक्त विजेची मोटर वापरली जाते. या प्रकल्पावरती पोस्ट ऑफिस आहे. इथे कुणाचे पत्र  येत नाही. पण पोस्टात अनेक कष्ट करणाऱ्या लोकांच्या ठेवी   आहेत. शेती कसायला दिली जाते. वाट्याला आलेल्या जमिनीवर आतल्या बाजूला भातशेती व बाहेर तूर लावली जाते. तुरीचे उत्पन्न त्या राबणाऱ्या शेतकऱ्याला. जेव्हा हा प्रकल्प सुरू केला त्या वेळेला या प्रकल्पातील धान्य भाजीपाला लोक घ्यायला कचरत होते. आज तिथे तिथल्या पिकाला प्रचंड मागणी आहे. हेमलकसा व आनंदवन इथली गरज भागल्यानंतर राहिलेला उत्पादित माल विकला जातो.

इथल्या अर्ध्या भागावर जंगल निर्माण केले आहे. दरवर्षी १ मे ते १५ मे उन्हाळी शिबिर घेतले जाते. या शिबिरातील मुलं-मुली नवीन झाडे लावणे, जंगलाची साफसफाई करणे या सर्व गोष्टी करत असतात. त्यामुळे तिथे घनदाट जंगल तयार झाले असून या जंगलात आपल्याला प्राणी देखील आढळतात.

‘गोकुळ‘ हे अनाथ बालकांसाठी चालवले जाते. अंध व मूकबधिरांसाठी देखील येथे शाळा आहेत.

२०० लोकांचा वाद्यवृंद आहे. या वाद्यवृंदाचे अनेक ठिकाणी कार्यक्रम झालेले आहेत. हे सर्व कलाकार कुष्ठरोग बाधित आहेत.

आनंदवन मध्ये सूतकताई, विणकाम, लाकूड काम, पत्र्यापासून विविध वस्तू तयार करणे, संगीत यांचेही शिक्षण दिले जाते. आज तिथे शास्त्र, कला, वाणिज्य व कृषी या चार शाखांचे महाविद्यालय असल्याने आसपासच्या खेड्यातील असंख्य मुलं आनंदवनशी जोडली आहेत.

मुक्तीसदन बरेच रोगी बरे होऊन जातात पण काही तिथेच रेंगाळतात अशांसाठी मुक्तीसदन मध्ये त्यांची राहण्याची सोय केली आहे.

उत्तरायण वृद्धांसाठी वानप्रस्थाश्रम यालाच ज्ञानपेढी असे नाव आहे. मृत व्यक्तीला दफन केले जाते आणि त्यावरती लगेच एक झाड लावले जाते. त्यामुळे तिथे बगीचाच तयार झाला आहे.

 ‘Give them a chance not a charity’ या तत्वानुसार इथे काम सुरु आहे.

हे पुस्तक तर वाचण्यासारखे आहेच पण त्याहीपेक्षा तिथे जाऊन पहाणं हे भारीच आहे.

(..या पुस्तकाचे लेखक आहेत स्वतः श्री. विकास आमटे)

लेखिका : सुश्री सुलभा तांबडे

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments