इंद्रधनुष्य
☆ सुखी व्हायचं आहे का ? मग — लेखक – श्री धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
“कर्मा रिटर्न्स” हे विसरू नका !
एका सुंदर शहरात छान बंगल्याची एक कॉलनी होती. त्या कॉलनीत एक बंगला बरेच दिवस रिकामा असतो. त्यामुळे शेजारच्या बंगल्यातील मंडळी त्यांच्या बागेतला कचरा रात्री हळूच या बंद असलेल्या बंगल्याच्या आवारात टाकून देत असत. त्यामुळे तिथं कचऱ्याचा भला मोठा ढीग साचलेला.
अशातच एक दिवस त्या बंद बंगल्यात एक तरुण जोडपं राहायला येत. कंपाउंड दार उघडून ते आत येताच समोर हा कचऱ्याचा ढीग दिसतो. ती चिडते, वैतागते. हे असं कुणी केलं असेल यावर तडफड व्यक्त करते. तो मात्र शांत असतो. तिला “आधी आत तर जाऊया” असं हसून म्हणत तिला आत घेऊन येतो. येतानाच बाहेरून जेवून आल्याने आता हाताशी वेळ असतो. तर तो तिला म्हणतो, “गॅलरी त्यातल्या त्यात स्वच्छ दिसतेय तर तू तिथं थोडा आराम कर” असं म्हणून तिला तिथं बसवून हा पठया हातात झाडू घेऊन आधी पूर्ण घर साफ करतो. नंतर बागेत येतो. तिथला कचऱ्याचा ढीग नीट एका कोपऱ्यात नेतो. बागकामासाठी लागणारी हत्यारे तिथेच बागेत एका छोट्या कपाटात असतात. त्यातून तो कुदळ फावडे घेऊन एक छोटा खड्डा तयार करतो. त्यात हा कचरा टाकून वरती थोडी माती व पाणी शिंपडून खड्डा बंद करतो.
नंतर पाईप घेऊन त्याने पूर्ण बागेच्या परिसरात मस्त पाणी मारतो. मरगळलेली ती झाडे आता एकदम तरारून येतात. जमिनीवरची हिरवळ देखील जणू खुश होऊन डोलू लागते. एक प्रकारचं चैतन्य तिथं अवतरत. अन त्याच्या लक्षात येतं की बागेत मस्त आंब्याचे, चिकूचे, पेरूचे झाडे आहेत. त्या झाडाला मग तो थोडं पाणी टाकून ठेवतो.
*
हे करता करता संध्याकाळ होते. तोही थकून गेलेला असतो. तोवर ती हि आतून बाहेर येते. म्हणते, “मी आतलं सामान बऱ्यापैकी लावलं आहे. मात्र आता किचनचा कंटाळा आलाय रे”
तो म्हणतो, “हरकत नाही, आपण बाहेर जाऊया. थोडं फिरणं पण होईल अन येताना खाऊन येऊ”
त्याप्रमाणे दोघे तयार होऊन बाहेर जातात.
त्या दरम्यान शेजारच्या त्या बंगल्यातले लोक तोवर हे सगळं पाहत असतात. मात्र रोजच्या सवयीने रात्रीच्या अंधारात ते स्वतःचा कचरा या स्वच्छ केलेल्या बंगल्यात टाकतात. अन दार बंद करून आत बसतात.
हे तरुण जोडपं जेव्हा फिरून खाऊन घरी येत तर दिसत की पुन्हा शेजारच्यांनी कचरा टाकला आहे. ती आता मात्र खवळते. “मी बघतेच त्यांच्याकडे” असं म्हणून ती शेजारी जायला निघणार इतक्यात तो तिला थांबवतो अन हसून म्हणतो, “तू आत जा. बाकी सोड माझ्यावर”
असं म्हणून तिला आत पाठवून तो पुन्हा खराटा घेऊन तो कचरा गोळा करून त्या दुपारी केलेल्या खड्ड्यात टाकून पाणी टाकून ठेवतो.
*
असे रोजच होऊ लागते. शेजारचे अंधाऱ्या रात्री कचरा टाकून जात अन हा खराटा घेऊन तो खड्ड्यात टाकून ठेवत असे. हळूहळू त्या खड्ड्यातील कचऱ्याचे मस्त सेंद्रिय खत तयार होते. ते खत तो बागेतल्या फळझाडांना टाकत राहतो. त्यामुळे लवकरच त्या झाडाला मस्त फळे येतात.
अन त्या दिवशी तो एक धमाल निर्णय घेतो.
नेहमीप्रमाणे रात्री शेजारचे कचरा टाकून जातात. तो हा कचरा गोळा करून शोष खड्ड्यात टाकतो. अन सकाळी उठल्यावर त्या बागेतली झकास अशी तयार झालेली फळे तोडून एका टोपलीत भरून ती टोपली घेऊन शेजारच्या घरी जातो. बेल वाजवतो. आतून तिथली मंडळी पिप होलमधून पाहतात तर हा तरुण दिसतो. ते शेजारी गडबडतात की आता भांडायला आला की काय ? असं म्हणून ते भांडणाच्या तयारीत दार उघडतात तर समोर हा तरुण हसतमुखाने हातातली फळाची टोपली त्या शेजार्याला देतो.
शेजारी चकित होतो. शेवटी ओशाळून तोच म्हणतो की, “आम्ही रोज कचरा टाकत होतो तरी तुम्ही भांडण करत नाहीत तर उलट आम्हालाच फळे द्यायला आलात. हे कसे काय?”
तर तो तरुण म्हणाला,
ज्याच्याकडे जे असते ते तो देत असतो.
तुमच्याकडे कचरा होता तो तुम्ही दिला. माझ्याकडे फळे होती ती मी दिली,
उलट यामध्ये पण तुमचेच आभार मानेल की तुम्ही दिलेल्या कचऱ्यामुळे माझ्या झाडाला लवकर फळे आली. थँक्स”
असं बोलून शांतपणे तो तरुण निघून येतो.
*
डीडी क्लास : मित्रमैत्रिणींनो, एक नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला सुखी व्हायच असेल तर एकच गोष्ट विसरू नका. कर्मा रिटर्न्स हे तर असतंच. तुम्ही चांगले केले तर त्याचे फळ चांगले मिळणार, मात्र त्याचवेळी समोरच्याने वाईट कृत्य केले तरी त्याला माफ करून त्याच कृत्यातून पॉजिटीव्ह असे काहीतरी काय करता येईल हे पहा. (जसे त्या तरुणाने कचऱ्याचे खत केले) मग तुमच्या मनाला शांतता लाभेल. चिडचिड होणार नाही.
“अमुकने माझ्या आयुष्याचे वाट्टोळे केले”
असं काहीजण म्हणतात. पण त्यात तथ्य नसते. कुणीच कुणाचे असे वाट्टोळे करत नसतो तर तुम्हीच काहीतरी वाईट कर्म केलेले असते तर तेच रिटर्न तुमच्याकडे आलेले असते. हे कळले तर जीवन सुखकर होईल.
कर्म हे असे एक हॉटेल आहे, जिथे ऑर्डर द्यावी लागत नाही.
तिथे तुम्हाला तेच मिळते जे तुम्ही शिजवलेले असते.
कुठेतरी मस्त ऐकण्यात आलेलं ते शेवटी सांगतो अन थांबतो.
“दाग तेरे दामन के धुले न धुले
नेकी तेरी कही तुले न तुले
मांग ले गलतियो की माफी
कभी तो खुद से ही
क्या पता ये आँखे
कल खुले न खुले !
लेखक : श्री धनंजय देशपांडे
प्रस्तुती – श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈