श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

सर… माघारी या ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

 

हाताशी आलेला एकुलता एक मुलगा अकाली दगावला आणि कमल जीत सिंग उर्फ केजे सर सैरभैर झाले! ज्याच्यासाठी कमवायचं तोच आता या जगात नाही तर मग नोकरी करायची तरी कशाला? असा प्रश्न साहजिकच उभा राहिला!

भारतीय वायुसेनेत Warrant Officer म्हणून केलेली कित्येक वर्षांची सेवा अशी तडकाफडकी संपुष्टात आणायचा निर्णय त्यांनी काळजावर दगड ठेवून घेतला आणि वरिष्ठांना तसं कळवून टाकले!

केजे सरांशिवाय नव्या रंगरुटांचे (Recruits) पाय हलेनात! त्यांची passing out parade अगदी तोंडावर आलेली होती. पंचेचाळीस मुला- मुलींची बॅच होती. परेड काही कुणाच्या मनासारखी होईना. नवे instructor आले होते, मात्र पोरा पोरींना केजे पापाजींचा लळा लागला होता. खरं केजे म्हणजे प्रशिक्षणार्थी वायूसैनिकांचा कर्दनकाळ म्हणून कुप्रसिद्ध होते. मैदानात असा रगडा देत की आईचे दूध आठवावे. पण त्यांचे काळीज आईचे होते. जितके उत्तम प्रशिक्षण तेवढी उत्तम कारकीर्द यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे पद कवायत, व्यायाम, पथ संचलन यात जराही चूक त्यांना खपत नसे. तुम्ही भले नंतर माझ्यापेक्षा वरच्या पदावर जाल पण आता तुम्ही माझ्या आज्ञेत आहात.. मी सांगेन तीच पूर्व! असा त्यांचा खाक्या होता. मी तुम्हाला तुम्ही ऑफिसर झाल्यावर कडक salute ठोकेन की… असंही ते सैनिकांना सांगायचे. कुणाला दुखापत झाली, कुणी मनाने खचला की मग मात्र केजे काळजीवाहू आई होत. त्यांच्या तालमीत तयार झालेले अधिकारी याची साक्ष देत असत!

आता के जे सर शिकवायला येणार नाहीत हे समजल्यावर recruits मनातून खट्टू झाले. त्यांनी के जे सरांना एक पत्र धाडले..

प्रिय सर,

सत् श्री अकाल!

तुमच्या विना परेड नीट होत नाहीये. पासिंग आऊट जवळ आली आहे. तुमच्या पोरांची परेड वाईट झालेली तुम्हाला चालेल?

तुमचा एक मुलगा देवाघरी गेला… पण आम्ही पंचेचाळीस जण तुमची मुलेच आहोत की!

सर… please come back… soon!

पत्र वाचून के जे ढसाढसा रडले. आणि तडक परेड मैदानावर हजर झाले. नेहमीच्या पहाडी आवाजात पोरांना order दिली…. आज पोरांची पावलं नेहमीपेक्षा जास्त शिस्तबध्द पडत होती… सबंध संघ डौलात march करू लागला होता!

त्याचवेळी के जे सिंग सरांनी ठरवलं.. पुढील सर्व नोकरी या आपल्या लेकरांसाठी द्यायची… देवाने एक पोरगा हिरावून घेतला पण ही शेकडो पोरं पदरात घातली.. यांना पंखाखाली घेतलं तर त्यांना पंख फुटतील… ते उंच भरारी घेतील… देशाच्या सेवेसाठी सज्ज होतील. एका शिक्षकाला आणखी काय पाहिजे असतं?

(हैद्राबाद येथील भारतीय वायू सेना प्रशिक्षण केंद्रात warrant officer म्हणून कार्यरत असणाऱ्या कमलजीत सिंग यांची ही कहाणी.. आजच्या शिक्षक दिनानिमित्त. ) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments